भाग ३ .निर्णय !!
भाग ३ .निर्णय !!
बाबा घरी आल्यापासून शांतच होते .त्यांना मुलीची काळजी वाटत होती . विशालची पाहिलेली नाराजी त्यांना एका वेगळ्याच संकटाची चाहूल देत होती . आपण त्याचे ऐकून घेत जास्त काही बोललो नाही याचे त्यांना समाधान वाटत होते , त्यामुळे तरी विशालचा त्रागा त्यांना पाहायला मिळाला . कसा मार्ग काढावा त्यांना कळत नव्हते. ते विशालला चांगले ओळखत होते . समजदार मुलगा होता तो . शांत झाला की घेईल सांभाळून याची त्यांना खात्री होती .पण गीताचं काय करावं त्यांना कळत नव्हतं . ती तिची चूक सहजासहजी मान्य करणारी नाही हे त्यांना कळत होते . पण तिच्या मनात नक्की काय आहे ? का असे वागते आहे हे कळायला काही मार्ग नव्हता .तिच्याशी बोलावं तर लागणार होतं पण शांततेने .
त्यांना त्यांच्या एका समुपदेशक मित्राची आठवण झाली , ते तडक त्याच्याकडे गेले .तो निवांत होता. मग दोघेही बराच वेळ बोलत राहिले .सगळी परिस्थिती समजून घेतल्यावर त्यांनी दोघांना बोलावून घ्यायला सांगितले . दोघांची भेटण्याची वेळ घेवून ते तिथून घरी आले .
पहिलं बायकोसोबत बोलून मग दोघांना सांगावं असा विचार करून त्यांनी बायकोला बोलावून घेतले त्यांच्या रुममध्ये .
" काय म्हणतीये कन्या ? जायचं की नाही परत नवऱ्याकडे ?" विलासराव म्हणाले .
" काय म्हणणार ती ? ती तरी किती सहन करणार ? बायको काय पायातली वहाण आहे का कसही वागवायला ?" विलासराव विचारात पडले . नेमकं झालंय तरी काय ?
मग राधाबाईंनी गीताने त्यांना जे काही सांगितलं ते सगळ विलासरावांना सांगितलं .
सगळं ऐकून घेतल्यावर विशाल काही चुकीचं बोलत नाही याची त्यांना खात्री पटली. त्याबरोबरच त्यांना ह्या सगळ्यामध्ये हे वीणा प्रकरण कारणीभूत असल्याचे लक्षात आले .
समुपदेशन नंतर घेवू , पहिलं हे वीणा प्रकरण निपटावं असा त्यांनी निर्णय घेतला . ते राधाबाईंना काही बोलले नाही . आईच ती , मुलीसारखीच भोळी भाबडी . पटकन कुणाच्याही कह्यात येणारी . ते मनातच हसले .
" म्हणजे प्रकरण वाटते तेवढे अवघड नाही .वीणा नामक अडसर दूर झाला की मुलीचा संसार सुखाचाच होणार. " याची त्यांना खात्री पटली .
बायकोला सगळं नीट होईल असे आश्वासन देवून त्यांनी आपला मोर्चा वीणा कडे वळवला .ते तिला भेटायला तिच्या घरी गेले . नशिबाने त्यावेळी विशाल घरी नव्हता .
त्यांनी दार वाजवले , " कोण हवे आहे ? "
दार उघडून वीणाने दारातच उभे राहून विचारले .
" मी गीताचा बाबा ." विलासराव म्हणाले .
"ओह ,या आत या ना ! " वीणाने त्यांना आत यायला सांगितले .
विलासराव आत आले . ते घराचे निरीक्षण करत होते .घर छान होतं .एकटी रहात होती तरी सगळ्या सुख सुविधा युक्त असे होते .
पाणी देत वीणा त्यांना येण्याचे कारण विचारू लागली , सोबतच गीता कशी आहे हे पण विचारले .
" गीता ठीक आहे .मूळ मुद्द्यावर येतो . तू जे काही विष कालवते आहेस ना त्या दोघांच्या वैवाहिक जीवनात ते बंद कर आता . तू तुझा संसार तर नाही सांभाळू शकली आणि आता माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली आहेस . काय मिळतं तुला हे असं वागून ? का त्या दोघांच्या निष्पाप आयुष्यात तू मध्ये येत आहेस !"
वीणा चिडून म्हणाली ," काय वाट्टेल ते बोलता आहात ? मला दोष देण्याआधी तुमच्या जावयाला सांभाळा , फसवतो आहे तुमच्या मुलीला .खुप भोळी आहे ती .माझ्यासारखी एखाद्यदिवशी रडत रडत माहेरी येवून बसेन ना मग कळेल तुम्हाला .आत्ता पासूनच सावध करते आहे मी .गीता मला माझ्या बहिणीसारखी आहे .तिची काळजी वाटते म्हणून मी तिला वेळोवेळी सावध करत असते आणि तुम्ही मला या सगळ्याला जबाबदार धरता ? चूक करता आहात काका तुम्ही , विशालच्या नावाची कंप्लेंट करा मग बघा कसा सरळ होतोय ते ."
अरेरावी होत शेवटी आता ती जर मध्ये पडली तर तिलाच पोलिसात नेईल अशी समज देत शेवटी विलासराव तिथून बाहेर पडले .
त्यांनी विशालचे ऑफिस गाठले. बाबांना पाहून तो जरा चकित झाला . त्यांनी विशालला बाहेर बोलावून घेतले .दोघे जवळच्या बागेत जावून बसले .त्यांनी विशालला वीणा प्रकरण सांगितले . विशाल एकदम चकित झाला , म्हणाला , " बाबा , ही वीणा तर माझ्या लग्ना आधीपासून माझ्या मागे लागली आहे . तिने खुप वेळा प्रयत्न केला मला तिच्या जाळ्यात अडकवायचा , मी तिला दाद देत नाही म्हणून हिने हा प्रकार केला असेल . पण बाबा मला एकदा सुध्दा असे वाटले नाही की गीता तिच्या फासात अडकली असेल म्हणून .तिने कधीच मला जाणवू नाही दिले की तिची वीणा सोबत मैत्री असेल म्हणून . बाबा अहो मी आजच वकीलाकडे जाणार होतो . मला गीताला माझ्या बंधनातून मुक्त करायचं होतं .ती आनंदी रहावी यासाठी . अरे देवा ! काय करत होतो मी हे ? बाबा मला माफ करा . आज जर तुम्ही इथे आला नसता तर उद्याचा दिवस मला माहित नाही कसा असला असता ! "
तो डोक्याला हात लावून बसला .काय घडत होतं हे ? वीणा शेजारीच तर रहात होती .पण त्याला पुसटशी देखील शंका आली नाही की या सगळ्याच्या मागे वीणा असू शकते म्हणून !
विलासराव मग विशालला जे झालं ते सगळं सांगून म्हणाले , " माझी मुलगी भोळी भाबडी आहे .तिला फक्त एकदा सांभाळून घ्या . परत असे काही होणार नाही याची मी खात्री देतो .तिने परत अशी चूक करू नये म्हणून तिला घरातच गुंतवून टाका ."
विशाल काहीच न कळून म्हणाला , " म्हणजे ? "
बाबा हसले आणि म्हणाले , " दोन वर्ष झाली आता लग्नाला , एकमेकांना बांधून ठेवायला आता तिसरा पाहुणा आणा ."
विशाल विचार करून म्हणाला . " बाबा माझं ठीक आहे पण गीताची काय शाश्वती आहे ? "
" नको काळजी करू बेटा . आपण दोघेही तिला समजावून सांगू ."
ते दोघेही घरी आले .विशालला सोबत पाहून गीताची कळी खुलली .पटकन पाणी आणून देत ती चहा करायला पळाली .
चहा पाणी झाल्यावर मग बाबा आणि विशालने , गीताला विणाचे कारस्थान सांगितले . सगळं ऐकून तिलाही धक्काच बसला . आपल्या जवळच्या माणसावर विश्वास न ठेवता , दुसऱ्यावर विश्वास ठेवून आपण आपला सुखी संसार मोडत होतो याची तिला जाणीव झाली .
गीताला तिची चूक लक्षात आली .विशालची माफी मागून तिने आई बाबांची पण क्षमा मागितली .
जोडीने नमस्कार करून दोघेही शांत मनाने घरी पोहोचले .वीणाने त्यांना पाहिले .तिने गीताला खुणावले पण गीता तिच्याकडे दुर्लक्ष करत विशालच्या हातात हात देवून घरात गेली आणि दार लावून घेतले .
गैरसमज करून घेत तुटणारे एक नाते योग्य वेळी योग्य काळजी घेतल्याने अतूट बंधनात पुन्हा एकदा घट्ट बांधले गेले .
विलासरावांच्या सल्ल्याने मग दोघांनी त्यांच्या समुपदेशक मित्राकडे समुपदेशन करून घेतले आणि सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा नव्याने आपल्या संसाराला आनंदाने सुरवात केली .
समाप्त !!

