STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract Children Stories

4  

शुभांगी कोतवाल

Abstract Children Stories

बालपणीच्या गमती जमती - 2

बालपणीच्या गमती जमती - 2

3 mins
2

आज बरेच दिवसांनी बालपणीची एक मैत्रीण भेटली. अगदी शालेय जीवनाच्या सुरुवातीपासूनची मैत्रीण. जेव्हा आम्ही बाहुला बाहुलीचा खेळ खेळत असू. बाहुलीला अंघोळ घालून तिचे केस कोरडे करायचे. घरातच कोणाच्या ड्रेस, फ्रॉक शिवल्यानंतर कापड उरतं त्यात बाहुलीचा पण छान चुण्या घेतलेला फ्रॉक मोठ्या बहिणीकडून , आईकडून शिवून घेत असू. मग ते नवीन ड्रेस बाहुलीला घालून तिची वेणी घालून, टिकली लावून आणि असतील तर तिच्या हातात छोट्या बांगड्या घालत असू. बाहुला असेल तर त्याचा पोशाख लेंगा - झब्बा आणि केस विंचरून भांग पाडून द्यायचा.

आणि क्वचित कधी बाहुला - बाहुलीचं लग्न लावत असू. काही जणं, मुलिकडचे म्हणजे बाहुलीच्या बाजूचे आणि काही बाहुल्यांच्या बाजूंनी. अगदी विधी प्रमाणे आंतरपाट धरून , मंगलाष्टके म्हणून , माळ वगैरे घालून लग्न संपन्न होत असे. 

जेवणाची पंगत म्हणजे त्यात प्रत्येकाने घरून आणलेले वेगवेगळे पदार्थ वाढून जेवण होत असे.अशी ही लहानपणीची गंमत तुमच्याही आठवणीत असेलच.

थोडे मोठे झालो, शाळेत जायला लागलो , तेव्हा त्यात थोडा बदल झाला. औदुंबर, आंब्याच्या झाडाची जाडसर पाने तोडून त्याची अशी पिपाणी करून मुले वाजवत असत. दुपारच्या वेळी आपल्या किव्वा शेजारच्या बागेत काही भाज्या जसं की तोंडली, चवळीच्या कोवळ्या शेंगा लागल्या असतील त्या तोडून खायच्या. तर कोणाकडून पेरू, कैरी, शेतुर अशी फळे तोडून आम्ही सर्व वाटून घेवून खात असू.

शाळेतून येताना वाटेत कुठल्या ऑफिसच्या बागेत मोठी बकुळीच्या फुलाची झाडं लागत ती टपोरी पांढरी  - पिवळी - तपकिरी अशी फुले वेचून दप्तरात घेवून येत होतो आणि मोठाले गजरे करून केसात माळत होतो, स्वतः आणि आई, काकू, बहिणींना पण बनवून देत असू. आणि त्यात कोणाचा गजरा मोठा ते एकमेकांना लावून पहायचं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाताना गजरा लावायचा असल्यास तो ओल्या कापडात गुंडाळून माठ , कळशी भरलेली असेल तिथे ठेवून देत असू म्हणजे फुले ताजी राहत, जाई - जुई चे कळ्यांचे गजरे असल्यास ते सकाळी उमलून जात असत, फुलांचे असेल तर ते सकाळी अगदी टवटवीत दिसत. 

मुलं - मुली मिळून विटी - दांडू हा खेळ खेळता - खेळता कुठल्या काय दूर अगदी कॉलोनीतले घरं संपेपर्यंत खेळत - खेळत निघून जात असू. उन्हाची परवा नाही, घरचे आपल्याला शोधत असतील याचीही परवा नसे. 

पावसाळ्यात एल नवीन खेळ खेळता येत असे. तळ्यात की मळ्यात ? म्हणजे जिथे पाणी साठल असेल ते तळ्यात आणि जिथे गवत - झाडी उगवली असतील ते मळ्यात. तसेच उन - सावलीचा खेळ. नकळत तेव्हाच आपण जीवनाशी निगडित खेळ खेळत असतो ते तेव्हा लक्षात येत नाही पण प्रत्येक खेळ आपल्याला बरेच काही शिकवून जात असतो.  लगडीचा खेळ, सागरगोट्याचा खेळ तर मुले गोटया म्हणजे कंचे खेळत , लगोर खेळत व आम्ही मुलीही ते शिकायचा प्रयत्न करत.

दोरीच्या उड्या मारणे , कोण जास्त उड्या मारू शकते ते मोजायच , दोघी जणी दोन टोकं धरून तीसरीने उड्या मारणे, कधी कधी दोन जणी एकाच वेळेला उड्या मारत आणि दोघी त्या दोन टोकांना धरून दोरी फिरवत. 

आमच्या बालपणी वाढदिवस फक्त घरच्या घरी साजरे होत असत. मैत्रिणी वगैरे बोलावणं, केक कापून वाढदिवस साजरे करणं हा प्रकार नव्हता. पण नवीन ड्रेस मिळत असे तो घालून घरचे आणि शेजार - पाजारचे मोठे असतील त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेत होतो.

कोणी दहावी - बारावी ची परीक्षा चांगल्या मार्क्सने पास झाले तर शेजारी - पाजारी पेढे वाटून मोठ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळवत. मग आता पुढे काय शिकणार, कोणत्या स्ट्रीमला ऍडमिशन घेणार वगैरे विचारपूस होत असे. मोठे , आणि ताई - दादा जे कॉलेज पास करून नोकरीला लागले असतील ते चांगला सल्ला देत असत .सगळे आपला आनंद व्यक्त करत असत, द्वेष किव्वा इर्षा भाव कुणामध्ये नसे.

आज ते सर्व आठवणीत आहे, आपण मोठे होतो, जुन्या जागेतून नवीन जागी राहायला जातो, जुन्या मित्र मैत्रिणी, शेजारी सगळ्यां पासून दूर जातो. पुन्हा नविन ओळखी, नवीन शेजारी नवीन मैत्रिणी . 

आपणही मोठे होतो, आपापल्या नोकरी मध्ये, घरात व्यस्त होवून जातो. जबाबदाऱ्या येतात , स्वतःला सिद्ध करून दाखवायची जिद्द येते. जरी आपण कितीही पुढे गेलो तरी बालपणीच्या माहितीतले कोणी भेटले की आनंदच होतो. 








साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract