Suhas Bokare

Children

3.3  

Suhas Bokare

Children

एकांकिका - "अनलॉक चिरंजीवी".

एकांकिका - "अनलॉक चिरंजीवी".

32 mins
12.3K


(अगदी मोठे आणि लहान सोबत बसून प्रत्येक क्षण एन्जॉय करतील अशे हे नाटक )

पात्रं -

[2020 च्या काळातील वेशभूषा ]

1) बंडू - सुतार, वय 35-36, शहरी व गावाकडील अशी मिश्रीत भाषा. 

2) सोन्या - बारा ते पंधरा वयोगटातील बंडू चा मुलगा, भाषा, बंडू सारखीच मिश्रित. 

3) बुध्दीनाथ कुत्रा - बंडूनाथ चा पाळीव कुत्रा. 

4)"म्हातारा"- 40 ते 50 वयोगटातील पांढऱ्या केसाचा दणकट माणूस.

5) पाटील- 50-60 ह्या वयोगटातील बंडू च्या दुकानाचा मालक. 

6) बारीक डोळे - चेहरा चिनी सारखा, पण उंच.      

[2090 च्या काळातील वेशभूषा, कल्पित.]

7) रंभाड - तडफदार, उंच, अत्याधुनिक व्यक्ती. 

8) अयाप्पो - रंभाड चा रोबोट. 

[वैशयन, रंभाड चा साथीदार, ह्याचा वावर रंगमंचावर कधीच नाही. तो फक्त प्रकाशयोजना नि बॅकग्राऊंड आवाजातूनच दर्शवल्या गेलेला आहे]


[सुरुवातीला निवेदन - " 24 मार्च 2020, सकाळची वेळ. आऊटर मुंबई. बंडू आपल्या पाळीव कुत्र्याला जवळ बसवून आपल्या दुकानात सुतार काम करत होता. ते बघा... बंडू ची करवत कशी भराभर चालतेय... बंडू चे वर्णन करायचे झाले, तर तो एक कष्टाळू नि उच्च कोटी चे कोरीव काम करणारा पण भोळा माणूस. असा हा आपला बंडू सुतार त्याची तुम्हाला एक गम्मत सांगायचीय, ते बघा...(रंगमंचावर निवेदक जे सांगतोय ते घडायला सुरुवात होते ) ती एक मागे सावली बघितली? (पांढऱ्या पडद्या वर भल्या मोठया सावली चा वावर )... बंडू ची करवत ज्या वेगाने फिरते (करवती चा आवाज वाढतो ) त्याच वेगाने ती सावली सुद्धा हालचाली करते! अं हं.. मित्रांनो हे भूत अजिबात नाही ! ही आहे निसर्गाची किमया. एक गुपित सांगू? बंडू ला ह्या सावली बद्दल काहीच कल्पना नाही ! मग कोणाला माहीत आहे ह्या सावली बद्दल ? ते कळेलच पुढे आपल्याला. पण ही सावली आहे अमर माणसाची. म्हणजेच चिरंजीवी ची. कधीच न मरणारा माणूस! आणि या चिरंजीवी चे नि आपल्या बंडू च्या करवती चे निसर्गाने हे अजब नातं ठरवलंय, (निवेदक गोड हासतो ).आता पुढची गम्मत बघा, सोन्या, बंडू चा मुलगा, आपल्या मित्रांकडे, खेळायला गेलेला असतांना ,चोवीस मार्च च्या सकाळी, एक चमत्कारीक, परग्रहांतून यावे, तसे एक यान, बंडू च्या दुकानासमोर येऊन धडकलं. बघूया कसं घडलं ते. "]


[रंगमंचावर - बंडूची करवत थांबते. सुंदर असे त्यानेच कोरलेल्या मंदीरावर तो एक नजर टाकतो . "जय श्री हनुमान !" म्हणत घाम पुसतो. मागची मोठी सावली करवतीचं काम थांबल्या वर हळू हळू अंतर्धान पावते तेव्हा बुध्दीनाथ कुत्रा सावली कडे बघत जोर जोरात भुंकतो. बंडू चे लक्ष सावली कडे नसल्यामुळे तो बुध्दीनाथ ला गप्प करतो. तेवढ्यात बंडू चा मोबाईल वाजतो. ]

बंडू - हालू... कोन पायजे? 


[मोबाईलमधून आवाज येतो - " प्रिय ग्राहक...]  

बंडू - "आमी लय प्रिय, बोला !",  

[मोबाईल मधून आवाज येतो- "...आपल्यला सूचित केलं जातय की आमच्यकडे सुरक्षित असलेल्या तुमच्या डेटा वरून तुमचा मोबाईल नंबर "लकी ट्रॅव्हल स्कीम" साठी निवडण्यात आलेला आहे . तुम्हाला तुमच्या गावाला जायचे तिकीट आमच्या तर्फे गिफ्ट देण्यात येत आहे. तिकिटीत बदल पाहिजे असल्यास आम्हाला सपंर्क करावा. आमचा प्रतिनिधी लवकरच तुमच्या संपर्कात येईल. "]


बंडू (खूष होत, कुत्र्याकडे वळून )- अरे बुद्धीनाथ! हनुमंताने ऐकलं बघ आपलं. (हनुमानाच्या फोटो ला नमस्कार करतो) सोन्याची आई गेलीय गावाला, लवकरच जात येईल आपल्याला तिथं. (बुध्दीनाथ जोरजोरात भुंकतो, रागाने बंडू त्याला हटकतो, पण दुकाना समोर एक दणकट पांढरे केस असलेला, "म्हातारा", रंगमंचाच्या अंधारलेल्या भागात उभा आहे. बंडू चे लक्ष त्याच्याकडे जाते )

बंडू (म्हाताऱ्याला )- काय पाहिजे? 

म्हातारा - मोबाईल कम्पनी तर्फे तुमचं तिकीट तुम्हाला द्यायला आलोय. 

बंडू- आता ! आताच तर बोलली ती बाई फोन वर आणि लगेच तुमी हजर !

म्हातारा - आमची सर्विस फास्ट आहे. नक्की ठरवा गावाला जायचं नि मला ह्या मोबाईल नंबरवर सूचित करा. (कार्ड देतो )

(तिकीट सुपूर्द करून म्हातारा जातो )


[रंगमंचावर अंधार, अचानक मोठा आवाज, वीज कडाडल्यागत ध्वनी आणि संमिश्र आवाज. अंतराळात फिरणारे अजब यंत्र पृथ्वी वर येऊन धडकेल तसा भास होतो . एका मोठ्या नळीतून, एक, तल्लख नि तडफदार व्यक्ती बाहेर येते . त्याच्या मागे अगम्य, चमकदार, निळ्या आभेत नाहलेली अशी आकृती बाहेर येते. त्याच्या पाठीवर, ती व्यक्ती, लुकलुकणारी छोटी डबी चिकटवते . काही इशारे करताच ती आकृती त्याला पाहिजे तसे हावभाव नि हालचाली करते.]

व्यक्ती - (स्वगत ) बघूया टाइम्स क्यूब मधे, कुठले वर्ष सांगतेय आपलं क्यूब ? (मोठ्या क्यूब कडे बघत ) अयाप्पो , अरे आपण 'दोन हजार वीस' मधे आहोत.

(ती आकृती, 'अयाप्पो', रोबोट सारख्या हालचाली करत " दोन हजार वीस ", "रंभाड, आपण दोन हजार वीस मधे आहोत "असं पालुपद मांडते )

रंभाड - (हासतो ) अयाप्पो , आपण सत्तर वर्ष मागे पोचलो आहोत. हाहाहा...(हसतो ), अयाप्पो, मी तुला 2020 मधे सोडणार आहे. (खूष होत ) आणि बघ ! आपण आता कसे चुटदिशीं बोलतोय इथली भाषा ! (टाइम क्यूब मधे डोकावत ).... थांब ही कोणती जागा आहे हे तपासतो... मुंबई ! आपण मुंबईत आहोत. आणि आपण बोलतोय 2020 ची भाषा - "म-रा-ठी" आहे की नाही ह्या टाइम्स क्यूब ची कमाल.

(अयाप्पो ला हळूहळू रंभाड पायऱ्यांवरून खाली आणतो )

रंभाड - (स्वगत ) (अयाप्पो चं निरीक्षण करत ) आता तूला 2020 मधे सोडायचं नि तुझ्या तर्फे आपलं गुपित कार्य करायचं, म्हटल्यावर इथली भाषा बोलावीच लागेल, अयाप्पो.

( बंडू च्या करवती चा आवाज वाढत जातोय , तेवढ्यात मागे, पांढऱ्या पडद्यावर भली मोठी सावली परत वावरतांना दिसते, पण रंभाड चे तिकडे लक्ष नाही. जशी बंडू च्या करवती चा आवाज वाढतो त्याच वेगाने सावलीच्या आकार आणि हालचाली वाढतात )

रंभाड - आपल्या स्कॅन प्रमाणे, तो 'चिरंजीवी' इथेच कुठेतरी लपलाय. अयाप्पो! (लगेच अयाप्पो प्रतिक्रिया देत त्याच्या कडे वळतो ) तुझ्या चिप मधे चिरंजीवीचा सर्व डेटा शाबूत आहे? 

(अयाप्पो मान डोलवतो. नि त्या सावली कडे धाव घेतो )

रंभाड -अरे... अरे... अयाप्पो कुठे चाललास ! (स्वगत ) ह्याच्यात काही बिघाड झाला का ? (त्याला 'रिमोट' ने नियंत्रणात आणतो ) (काळजी च्या स्वरात ) (लगेच त्याच्या जवळ असलेल्या मोबाईल सारख्या यंत्रातून तो आकाशा कडे बघत बोलतो ). वैशयन! मला ह्या अयाप्पो ला एकटं सोडावं लागणार आहे, तू ह्याला आकाशमार्गे कंट्रोल कर. (आकाशातून प्रकाशाची उघडझाप होते )

वैशयन (बॅकग्राऊंड मधून आवाज ) - त्याला कंट्रोल केलाय आता मी रंभाड, डोन्ट वरी !

 रंभाड - वैशयन , ह्याला ह्या काळा मधे सोडून, आपल्या काळात परतायची वेळ आलेली आहें. आपण आता ह्याची फायनल टेस्ट लवकर करूयात. 

वैशयन (बॅकग्राऊंड मधून आवाज ) - गेट सेट गो ! आपले टार्गेट पलीकडच्या दुकानात आहेच. ते कुत्रं, नि त्याचा मालक ! तू तिथे जा! (रंभाड बंडू च्या दुकानाकडे बोट दाखवतो नि वैशयन ला आकाशा कडे बघत होकार देतो ) 

[वैशयन अयाप्पो चे निरीक्षण आकाशातूनच करतोय, नेपथ्यातून तशी प्रकाशयोजना, वरतून थेट अयाप्पो वर प्रकाश. ]

वैशयन (बॅकग्राऊंड आवाज )- तू बंडू च्या दुकानात जा ! तो पर्यंत आकाशातून माझी नजर आहेच अयाप्पो वर. 

(रंभाड अयाप्पो ला थोपटतो, गालातल्या गालात हासतो, बेल्ट जवळ ची कळ फिरवतो, तसे वातावरण बदलत जाते )

[रंगमंचावर विविध प्रकाशयोजना तरळतात, संगीतस्पर्श होतो, नि दोघेही संगीतावर ठेका धरतात, रंभाड रंगात येतो. वैशयन, (खरे तर फक्त आकाश मार्गे येणारा नेपथ्य प्रकाश), त्याला नृत्यात साथ देतो. अयाप्पो मात्र रंभाड ने इशारा केल्या नंतरच त्यांच्या सोबत नाचतो.]

गाणे - (रंभाड आकाशा कडे बघत, सोबत वैशयन चा ही बॅकग्राऊंड मधे आवाज )

"दोन हजार नव्वद चे आम्ही !

ह्या धरती चे स्वामी, आम्ही !

जुन्या पिढी च्या धरती वर. 

नाचतोय आमच्याच तालावर. 

हाहाहाहा... 

 दोन हजार नव्वद चे आम्ही !

[गाण्याचा ठेका चालूच आहे.]

[मात्रं रंभाड रंगमंचावरून हळूच काढता पाय घेतो. अयाप्पो आणि वैशयन / नेपथ्य प्रकाश जागेवरच नाचत आहेत ]

[तेवढ्यात बंडू, नि बुद्धीनाथ कुत्रा, दुसऱ्या कोपऱ्यात, रंगमंचावर प्रकाशझोतात येतात. गाणे तसेच सुरु आहे. अयाप्पो प्रकाशात नाचत आहे . बंडू आपल्या सुतार कामाच्या दुकानातून बाहेर डोकावतो, त्याच्या हातात त्याची करवत नि लहान लाकडी ओंडका आणि सोबत बुध्दीनाथ ]

बंडू (बुध्दीनाथ कडे बघत त्या गाण्याच्या तालातच बोलतो )-

"बुध्दीनाथ बुध्दीनाथ, 

तू बघितलेस? अरे कोण ही ब्याद?

(गाण्याच्या चालीत )

"बुध्दीना...थ, बुद्धिना... थ "

(बुध्दीनाथ डुलत डुलत बंडू च्या सामोरी जातो )

"कोण ही ब्याद , कोण ही ब्याद !"

[वैशयन आणि अयाप्पो नाचण्यात मग्न आहेत.]

(त्याच वेळी रंभाड मात्र बंडू च्या दुकानासमोर येतो )

(बुध्दीनाथ गुरकावतो )

(बुध्दीनाथ ला वेडावत) [बंडू चं गाणं सुरूच आहे. ]

"बुद्धी , करतोस नुसता 'भ्याव भ्याव ' "

अरे ही लोकं कोण? काय ही ट्यावं ट्यावं"

[जीभ बाहेर काढून बुद्धिराज त्याच्या पुढे उड्या घेतो  नि रंभाड कडे त्याला ओढायचा प्रयत्न करतो ]

(बुध्दीनाथ आपला मालक आपलं ऐकत नाही बघून रंभाड वर भुंकतो, बंडू अयाप्पोकडे स्थिर नजरेने बघत असतो, बुध्दीनाथ च्या भुंकण्या मुळे पार त्याची बोबडीच वळते. कसाबसा स्वतः ला सावरत अयाप्पो कडेच निरखित बुध्दीनाथ ला गप्प करतो. तो खाली बसलेला आहे नि ज्या तालात अयाप्पो हालचाली करतोय त्याच तालात त्याची करवत ओंडक्यावर नाचते )

(तेवढ्यात ती सावली परत मागच्या पडद्या वर हालत पुढे सरकते . ह्या वेळी रंभाड त्या सावलीला हेरतो. पलीकडे, अयाप्पोही सावली कडे बघून अस्वस्थ हालचाली करतो पण वैशयन ला त्याच्या हालचाली खपत नाही (प्रकाशाची उघडझाप ) त्याला परत नियंत्रणात आणतो. ते बघून रंभाड वैतागतो नि वैशयन ला सावली बद्दल आकाशाकडे हातवारे करून सांगायचा प्रयत्न करतो )

रंभाड (दबक्या आवाजात, सावली कडे हात दाखवत, आकाशाशी बोलतो ) - वैशयन, तो बघ चिरंजीवी फिरतोय इथं !

( त्या गडबडीत बंडू आणि रंभाड एकमेकांसमोर येतात )

बंडू - (आधी घाबरलेला ) तुमी कोन?...(स्वतः ला सावरत ) ते येडं (अयाप्पो कडे बोट दाखवत ) तिकडे नाचतंय, आणि तुम्ही (रंभाड ला वेडावत ) वर बघून काय बोलताय, काका बसलाय तिथं? 

रंभाड (अचानक बंडू सामोरा आलाय, म्हणून थोडा गोंधळलेला )- हो ना ! सॉरी ! (ओशाळलेलं हास्य करत ) अ..... आपलं...इकडे आलेलो, तेव्हा तुमचं दुकान बघितलं...छान आहे !

बंडू - ते तिथं काय गोंधळ चाललाय, बघितलं? 

रंभाड- बघितलं ना.. बघितलं !

बंडू - आता!...बघून काही वाटलं नाही आगळं?

रंभाड - त्यात काय नवल? असं तर घडतच राहतं. 

(बंडू या अनपेक्षित उत्तराने पार उडतोच, रडवेला होतो, हातवारे करत म्हणतो "असं घडतच राहतं, नाही? " नि नंतर आकाशा कडे बघत , रंभाड चा मघाचा आकाशाकडे बघून बोलण्याच्या उद्योगाची आठवण करून देत,"तसही घडतच राहतं , नाही? " )

रंभाड (आळोखे पिळोखे घेत ) ते...आपलं...कधी कधी !

बंडू - (स्वतः ला सांभाळत ) काय चेष्टा करता का राव आमची ! अरे जगाआगळं घडतंय ! आता कसं सांगू. थे बगा ते कुत्रं कसं बिथरलंय !

(रंभाड नकारार्थी खांदे उडवतो )

रंभाड - आत्ता शांत करतो त्याला, डोन्ट वरी ! (बुध्दीनाथ जवळ जातो, तो जोरात भुंकतो )

बंडू - त्याच्या नादी लागू नका. लई डेंजर हाई तो .  

रंभाड (स्वतः जवळ काहीतरी चाचपडतो, नि एक रंगबेरंगी क्यूब बाहेर काढतो )- हे.. असच लाकडाचं तयार करून मिळेल? 

बंडू (संशयानं )- मिळेल. वेळ लागेल...अं... ते कार्टून (अयाप्पो कडे बोट दाखवत ) तुम्ही आणलंय का? 

रंभाड - छ्या ! डोन्ट वरी ! मी बघतो कोण आहे तो . तुम्ही फक्त ह्याचा (क्यूब दाखवत ) आकार तेवढा बनवून आणा. रंगकाम नंतर करा... रंगकाम उद्या करा हवं तर ... कसं?  

(बंडू आत जातो, बुध्दीनाथ तिथेच उभा . रंभाड झटपट बुध्दीनाथ ला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात, पण बुध्दीनाथ भुंकतो )

(तो आवाज ऐकून बंडू धावत बाहेर येतो )

बंडू - (हातात हातोडा ) बुद्धी , काय झालं रे ? (रंभाड ला बघून )...आणि तुमी अजून हितच? त्या कार्टून ची चौकशी करणार होता, त्याचं काय झालं? 

रंभाड - आं... तिकडेच जायला निघालो होतो, पण एक मांजर आडवं गेलं. 

बंडू (रागाने )- मांजर हिथं कुठं? बुकं शिकलेले वाटताय तरी मांजर आडवं गेलं म्हणताय ! जावा, काही होत नाई ! 

रंभाड - जातोय ! तुम्ही तेवढा क्यूब चा आकार दाखवा, प्लीज... लवकर !

बंडू - (संशयानं रंभाड कडे बघत पण बुध्दीनाथ ला उद्देशून ) तू हितच थांब, लक्ष ठिव ! (रंभाड ला ) तुमी जावा, बघा ते कार्टून काय म्हणतंय (अयाप्पो वर नजर टाकतो )

(बंडू परत कामाला लागतो )

(आता, रंभाड परत बुध्दीनाथ च्या मागे लागतो. बुध्दीनाथ भुंकतोय नि रंभाड च्या हाती तो सहजासहजी काही येत नाही . मधेच रंभाड "म्यांव" असा आवाज काढत राहतो , बुध्दीनाथ चं सोबत भुंकणं नि आतून बंडू चा खिळे ठोकण्याचा आवाज -)

बंडू (ओरडून )- अरे हे मांजर कुठून आलं ! बुध्दीनाथ, मांजराशी भांडायचं नाही ! ते साहेब गेले का बघ... 

(तेवढ्यात रंभाड बुध्दीनाथ चा ताबा मिळवून काही लाल प्रकाश किरणं बुध्दीनाथ च्या डोक्यवर पसरवतो )

[बंडू काम संपवून बाहेर येतो नि लाकडात कोरलेला क्यूब बाहेर आणतो. अयाप्पोवर करायची ती प्रक्रिया संपलेली आहे, संगीत थांबतं, मंचावर अयाप्पो उभा आहे . त्याच्यावरच संपूर्ण प्रकाश झोत. दुरूनच बंडू बघतोय. बुध्दीनाथ मात्र रंभाड भोवती गिरक्या घेत आहे .]

अयाप्पो (जाड्या भरड्या आवाजात मोठयाने बरळतो )- ऐक, 2020 च्या मनुष्या ऐक ! आम्ही 2090 चे मनुष्य ! आज येथे, मुंबई जवळ लपून आहे एक चिरंजीवी मनुष्य ! त्याला आम्ही नेणार आमच्या सोबत.त्याच्या अमरत्वाचे गुपित जाणून घेणार! मी 2090 चा रोबोट - अयाप्पो माझे नाव. इथले माझे काम काय? (त्याचा आवाज वाढतो ) चिरंजीवी मनुष्याचा शोध.... चिरंजीवी चा शोध.... जो माणूस कधीच मरू शकत नाही त्याचा शोध.... वेळेच्या परिसीमा ओलांडून... time travel करून आम्ही आलोय... नेणार येथून - चिरंजीवी ! चिरंजीवी !चिरंजीवी ! 

[अयाप्पो चा आवाज विरत जातो.]

वैशयन (बॅकग्राऊंड आवाज ) : शाबास अयाप्पो, तुझा टास्क तुला क्लिअर आहें !

(आवाक झालेला बंड्या, आश्चर्याने बघतोय, बुध्दीनाथ गुरकावतोय, गोंधळलेला आहे )

बंड्या - अरे काय हे, कसला टाइम टीरॅव्हल ? हे कोण रे बुध्दीनाथ? कुठला "चिरंजीव माणूस" हवाय ह्यांना? (हिरमुसून )... तु काय बोलणार म्हणा! देवाने ह्या मुक्या प्राण्यांसोबत बसवलंय, आणि आज सोन्या पण नाही, आणि [समोर जे अघटीत घडतंय त्याला उद्देशून.] ही भयंकर घटना, (नंतर आठवून नि तोंड वेडं वाकडं करत ) परत तो साहेब म्हणतोय असं नेहमीच घडतं ! (वैतागून ) कुठे गेले ते साहेब? ऐकलं का म्हणावं, हे लोकं चिरंजी...वी नेणार म्हणतायत इथनं !

[अचानक बंडू समोर रंभाड येतो.रंभाड चे आक्रमक रूप. ]

रंभाड - (बंडू ला दरडावत )- ए, गप ! ऐकलं नं सर्व तुम्ही बोलणं ? आता, बोथ ऑफ यू , माझं ऐकायचं ! ऐकाल? ए डॉगी ! बोल !

(बंडू गोंधळलाय , विचित्र नजरेने रंभाड कडे बघतोय )

रंभाड - तुला रे काय झालं, बंड्या ! आता तुला समजलंच असेन, ( अयाप्पो कडे बोट दाखवीत ) ते रोबोट माझंच ! (त्याच्या हातातला लाकडी क्यूब हिसकावून फेकतो ). फेक ते, मला काही गरज नाहीय त्याची ! (बुध्दीनाथ ला) सांग ना रे आपली जमाडी जम्मत डॉगी. (बुध्दीनाथ ला गोंजारतो )

बंडू - (आवाक )- तुम... तुम... तुम..तुम्ही ह्या प्राण्याला काय बोलायला सांगताय? ते नाही बोलू शकत ! तुम.. तुम... तुम.. . 

रंभाड - (नक्कल करत ) काय "टूम टूम टूम " गाणं म्हणतोयस ! त्या अयाप्पो ला 'हाय ' म्हण !

(बंडू स्तब्ध, निर्विकार )

(तेवढ्यात बुध्दीनाथ बोलतो )

बुध्दीनाथ - बंडूदादा ऐक रे बाबा ह्यांच, भो !

[बंडू पार उडतोच. ]

बंडू - बुध्दीनाथ तू बोलतोयस !

[अक्षरशः, घाबरत विक्षिप्त नृत्य करत बंडू हालचाली करतोय नि बुध्दीनाथ मान वेडीवाकडी करत त्याला न्यहाळतोय.] 

(रंभाड बुध्दीनाथ जवळ जातो)

( बुध्दीनाथ च्या कानात पुटपुटतो, बुध्दीनाथ मान डोलावतो, आणि बुध्दीनाथ चं मान डोलावणं बघून बंडू चा थयथयाट आणखीनच वाढतो ).

(बंडू बुध्दीनाथ च्या जवळ जाऊन बसतो, त्याच्या नाकाला आपले नाक चिकटवतो, बुध्दीनाथ ला शिंक येते, नि तो जोरजोराने भुंकायला लागतो, बंडू दूर जाऊन पडतो ).

(बुध्दीनाथ, बंडू कडे निरखत त्याच्या ओवतीभोवती गिरक्या घेतोय ).

रंभाड - बुध्दीनाथ नुसता नावाचाच बुध्दीनाथ तू. अरे बंडू ह्याचे नाव बदल, बुद्धुनाथ नाव ठेव, बुद्धु ! भ्याव ! भ्याव ! (हासतो )

(बुध्दीनाथ बावचाळलेल्या अवस्थेत आहे ).

[संगीत परत हवेत तरंगतं, त्या बाजूला वैशयन (प्रकाशयोजना) आणि अयाप्पो परत ठेका धरतात, इकडे सुरेल सांगितला साथ देत रंभाड छान ठेका धरतो , मधल्या स्ट्रॉंग बिट्स वर बंडू मात्र बुध्दीनाथ कडे बघत 'अहो आश्चर्यम ' अवस्थेत !]

(अचानक बुध्दीनाथ जोराने किंचाळतो, नि बोलायला लागतो...)

[बुध्दीनाथ भासड्या आवाजात गाण्याचा ठेका धरतो, त्याला बोलतांना बघताच बंडू चे तीन तेरा वाजतात - "अरे ! हा बोलला ! देवा वाचव !" ]

[बुध्दीनाथ गातो -]

बुध्दीनाथ -"बंडू भाऊ...बंडू भाऊ, 

नमस्कार करा, आपले हे मालक !

आता ह्यांचाच हुकूम, ह्यांचच राज्य. 

जुने मालक, पाटील साहेब !

गेले उडत...गेले उडत. 

आता आपले हेच पालक (2) !"

बंडू - "अरे काय ही ट्यावं ट्यावं? 

कुठे गेली तुझी भू भू? 

कुठे तुझे भ्यावभ्याव ? 

बोलायला कधी शिकला !

(तोंड वाकडं करत )

डोक्यात काही शिरत नाही रयाव. "

वैशयन -( पुढे सरसावतो, बंडू च्या डोक्यावर टपली मारतो , त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडलेला दिसतो) - 

आलं का लक्षात? 

तो तुझा सतत रागवणारा, 

तूझ्या वर हात उगारणारा, 

तरी तुला आवडणारा,  

मालक पाटील !

नाही ऐकायचं त्याचं !

अयाप्पो ला पाहिजे ती, 

मदत आता करायची.

अयाप्पो च्या इशाऱ्यावर,  

चालायचं नि, 

आता फक्त त्याचं ऐकायचं.

ह्याचं ह्याचं ह्याचं !

अयाप्पो चंच ऐकायचं !

(अयाप्पो कडे बोट दाखवतो )

[माना डोलवत दोघेही निमूटपणे उभे. रंभाड आपल्या यानाकडे जातो , यान सुरु होते, प्रचंड प्रकाश, उष्णता नि आवाज! ]

[अयाप्पो, बुध्दीनाथ, बंडू त्यांच्याकडे बघत आहेत. पण उंचावरून, कोणाचंच लक्ष नसताना यान उडतांना बघतो ते सोन्या! रंगमंचावर फक्त त्याच्या वर प्रकाशझोत. तो यान उडतांना अचंब्याने बघत आहे. प्रकाशझोत त्याच्या सम्पूर्ण अंगावर पडत आहेत नि ते तो बघत असतांनाच यान अंतर्धान पावतं. सोन्या चे लक्ष खाली उभे असलेले अयाप्पो , बंडू, नि बुध्दीनाथ कडे जाते . ते सर्व तिथून अयाप्पो च्या पावला वर पाऊल टाकत जात असतात नि त्यांचा कानोसा घ्यावा म्हणून सोनू, उडी घेतो , नि त्यांच्या मागे जातो.]

[रंगमंच - पाटील चे घर. बंडू सर्वांसमवेत आपल्या कामाची पिशवी हातात घेऊन दारात उभा आहे. त्याने रंभाड ने फेकलेला बेरंग क्यूब पण सोबत आणलंय.अयाप्पो, बंडू नि बुद्धिराज आत शिरणार तेवढ्यात पाटील त्यांना दरडावतो नि बाहेरच थांबायला सांगतो. सोन्या मात्र लपून खिडकीतून आत काय घडतंय हे बघतोय.]

[पाटील च्या खिडकी जवळ, सुरुवातीला बंडूशी बोलणारा पांढरे केस असलेला पण अंगाने दणकट म्हातारा आता पाटील शी बोलतोय ]

म्हातारा - पाटील मी तुम्हाला ताकीद देतोय, बंडू कुठे तरी गुंतलाय. 

पाटील - तुम्ही एक तर तुमची ओळख सांगत नाहीय... 

म्हातारा - ते मी तुम्हाला सद्या तरी नाही सांगू शकणार. 

पाटील - तरी एवढेच सांगतो, त्याच्या करवतीच्या नि एका भल्या मोठ्या सावलीचा काहीतरी संबंध आहे... ती सावली ह्याच्या करवतीच्या आवाजाकडे आकृष्ट होते, बस्स !

म्हातारा - बंडू ला माझ्या हवाली करा पाटील... 

पाटील - अशक्य ! मी तुम्हाला ओळखत नाही ! तो तुमच्या सोबत जाण्या अगोदर पोलिसांना सूचना दिली जाईल मगच...

म्हातारा - तुम्ही उगाच हट्ट धरताय...बरं, जर मी तुम्हाला हे सांगितलं की मी CBI कडून आहे तर... (कार्ड काढून दाखवतो )...पाहिजे तर कन्फर्म करा... फोटो पाठवतो तुम्हाला ! गव्हर्नमेंट नि अँपॉइण्ट केलंय मला ह्या आगळ्या कामासाठी. 

पाटील - (हात जोडत, थरथरत्या हाताने सलाम ठोकतो ) तुम्ही मोठे अधिकारी आहात साहेब ! मोठे पोलीस तुम्ही... पण मला थोडा वेळ द्या इचार कराया. गरीब आहे हो आमचा बंडू, त्याला हे जे सावली प्रकरन त्याच्या संग घडतय, त्याला त्याचा काहीच थांगपत्ता नाही हो !

म्हातारा - बंडूला मी भेटलो. त्याला मी मोबाईल कम्पनी चा माणूस आहे म्हणून बतावणी केली. प्रत्येकाला आमची खरी ओळख नाही देऊ शकत पाटील आम्ही cbi वाले. पण, गावाकडचं तिकीट दिलय त्याला. नक्की पाठवा.

(त्वेषाने म्हातारा खिडकीतून बाहेर उडी घेतो ) (पाटील विचारमग्न असतात आणि ते बंडू ला आत यायला सांगतात )

(काही क्षण अंधार, तो वर पाटील सुन्न होऊन खिडकी बाहेर बघत आहेत )

 [पाटील बंडू कडून आजचा हिशोब घेतोय, रागावतोय, पण बंडू त्याला गावी जायचं म्हणून गळ टाकतोय .पाटील चे लक्ष अयाप्पो कडे नाही. ]

बंडू (तिकीट दाखवत )- मालक ! सोन्याची बी भेट होईन, त्याच्या आईला भेटेल लेकरू . जाऊ द्या मला गावाला ! फुकटच तर आहे हे तिकीट !

पाटील - फुकट काही मिळत नसते बंडू ! (खिडकीकडे संशयित स्वरात ). कसा दिसत होता तिकीट देणारा? नाही, कोणी फसवणूक करू नये म्हणून इचारतोय आपलं !

बंडू - अंधारात उभा होता. म्हातारं दिसत होतं . आता मज गरीबाची फसवणूक कोन कशाला करनार मालक ! तुमाला पाठवायचं नाय असं बोला ना !

पाटील - (स्वगत, खिडकी कडे बघत ) बंडू तुला कळत नाय तुझ्यात काहीतरी आगळच गुण हाय ! माहीत नाय कोन कुठं गुंतवेल. तूझ्या भल्या साठीच तुला पाठवत नाय रे बाबा ! (स्वर बदलत ) बंड्या बायकोला गावी पाठवलस परवा, तेव्हा बस भाडे मीच दिले. सोन्या साठी पुस्तकं, पैसे माझेच. आणि धंदा केवढा कमी करतो रे ! दिवस भरात दोन मंदिरं तेवढी कोरलीस नि विकलीस ? लाकूड किती महाग झालंय ! टेबल खुर्च्या चे ग्राहक तर गायबच आहेत ! कसा परवडणार हा सुतारकामाचा धंदा? का नुसता ह्या गोट्या नि बुध्दीनाथ ला खाऊ घालतोस दुकानात ? दुसरा कामगार ठेवू का तुझ्या ऐवजी ? नाय मिळनार सुटी !

(अयाप्पो,उत्साहात येतो, त्याला भांडणं हवीच आहेत, नि तो बुध्दीनाथ ला इशारा करतो )

बुध्दीनाथ  - (अयाप्पो च्या इशाऱ्या वर ) फोडून काढीन !

पाटील - (आश्चर्यचकित ) काय ! काय बोलला बंडू? मला फोडून काढशील? 

(बंडू 'नाय नाय' करतोय तेव्हा पाटील चे लक्ष अयाप्पो कडे जाते )

पाटील - कोण आहे रे हा आडवा तिरपा?

बुध्दीनाथ ( मधेच बोलतो ) - नवीन मित्र आहे.

पाटील (बंड्या वर खेकसतो )- गप गुमान आपल्या आवाजात बोल, कुत्र्या सारखे भसाड्या आवाज का काढतोस?

बंडू - ते कुत्रच बोललंय !

पाटील (सर्रकन वळतो)- काय ! काय म्हणालास?

(अयाप्पो आपला यांत्रिक हात बंडू कडे वळवतो )

बंडू - कुठे काय! काहीच नाही !

(पाटील विचारमग्न, परत त्याची पाठ बंडू कडे )

बुध्दीनाथ - दूध किती लिटर घेतलं आज विकत, पाटील ?

पाटील (हात उंचावून बंडू कडे धावतो)- तुला रे कसल्या चांभार चौकश्या ! दूध? अरे तू पितोस तरी का? (बंडू कावराबावरा, अयाप्पो कडे धाव घेतो )

बुध्दीनाथ - (आळोखे पिळोखे देत )- हाडं आहेंत का खायला?

पाटील- (चांगलाच वैतागलेला, बंडू कडे चवताळून धावतो )- हाडं खाणार ! हाडं खाणार तू? अरे येड लागलाय का? का कोण्या कुत्र्याने चावलय तुला !

बुध्दीनाथ - कुत्र्या बद्दल वाईट नाही बोलायचं !

पाटील (बंडू कडे वळतो )- ए ! आता बस झालं ! डोकं धरून आपटणार तुझं. कुत्र्या ला वाईट बोललो तर तुझ्या काकाचं काय जातय ! टाळकं ठिकाण्यावर आहे का नाही? कसला नशा केलाय? 

[पलीकडच्या खिडकीत सोन्या मात्रं स्तंभित उभा आहे.]

सोन्या - (सवयी प्रमाणे स्वतः शीच बोलतो ) अरे! बुध्दीनाथ कुत्रा चक्क बोलला! पाटीलला हे अजून कळालेलच नाही, बाबांवरच ओरडत आहे पाटील ! 

बंडू (अयाप्पो कडे जातो )- ए बाबा, ह्या बुध्दीनाथ ला कंट्रोल मधी ठिव ना ! हे कुत्रं मधेच बोलतं , माझा मालक चिडतो ना ! त्याला वाटतं मीच बोलतोय ! अरे आमचे कुत्रे बोलू शकत नाही, तुमच्या काळात बोलत असतील रे, बाप्या !

आयोप्पा - बाप्या नाही, अयाप्पो !

(बंडू ओशाळतो )

पाटील (स्वगत ) (अयाप्पो कडे बघत )- बंडू काही सांगत नाही आहे, हा प्राणी आहे तरी कोण ! ह्यांना त्या सावली बद्दल काही सुगावा तर नाही लागला ! त्या cbi officer नं तर नाही पाठवला ह्याला? ( पाटील ला काही सुचतं, स्वतःशीच चुटकी वाजवतो )

(पाटील बंडू कडे वळतो )

पाटील - काय बंडू हातात काय आहे? तो ठोकळा कसला ? 

बंडू - (जड पणे, पण थंडगार स्वर ) एका माणसाला 'कूब' का काय ते बनवून पाहिजे होता. 

पाटील - अस्सं ! दाखव. (लाकडी क्यूब हाताळतो ).बनव की पूर्ण !

(बंडू हळूच अयाप्पो ची परवानगी घेतो )

पाटील (वैतागलेल्या अवस्थेत ) आह ! त्याची परवानगी लागते होय तुला आता? 

(बंडू काही न बोलता आपली करवत पिशवीतून बाहेर काढतो नि कामाला लागतो )

[करवतीच्या आवाज वाढतो मागे असलेल्या सफेद पडद्या वर त्या भल्या मोठ्या 'चिरंजीवी' च्या सावलीचे चित्रं उमटते. ती सावली हळुवार पणे पुढे सरकत आहें. पाटलाचे लक्ष नाही पाहून बुध्दीनाथ अयाप्पो कडे सरकतो.]

(अयाप्पो च्या इशाऱ्याने बंडू सावध होतो)

बुध्दीनाथ - (बंडू ला ) त्या पाटलाचं लक्ष दुसरी कडे वळवा असं सांगतोय हा. सावली बंदिस्त होईस्तोवर पाटील चा अडथळा नको. 

(बंडू आपलं काम सोडून पाटील च्या दिशेला जातो )

[बुध्दीनाथ जोराने म्हणतो, "पाटील !"]

 पाटील (चमकून बंडू कडे बघतो, त्याला दोन चापट्या नरमाईने हाणत )- रे ! तुला किती वेळा सांगितले आवाज बदलून बोलू नकोस ! (पाटील ची नजर मात्र साशंक नि आवाजाची पट्टी ही, मात्र बंडूच्या वागण्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसतेय )

बंडू - मालक, मी कुठे बोललो ! हा बुध्दीनाथ ट्यावं ट्यावं करतोय !

मालक -(आपल्याला आय्प्पोच्या हेतू वर संशय आलेला आहे हे कोणाला कळू नये , म्हणून पूर्वपदावर ) अरे डोकं ठिकाणा वर हाय का ! का सकाळ पासून ढोसलीय? हे कुत्रं बोलतेय? 

बंडू - हां ! तेच तर मी सांगतोय !

बंडू (बुध्दीनाथ कडे वळतो )- बोल रे बुध्दीनाथ, बोल ! कर तुझी ट्यावं ट्यावं !

बुध्दीनाथ - आपण नाही बोलणार !

(बंडू पाटील कडे उत्सुकतेने बघतो )

पाटील (चवताळतो, बंडू ला झोडपत )-तुला मी काय सांगितलं, कळत नाही ! आवाज बदलायचा नाही ! नाही म्हणजे....? 

बुध्दीनाथ - (भासड्या आवाजात ) नाही !

(आता पाटील चा तोल सुटतो, तो अक्षरशः बंडू च्या मागे काठी घेऊन धावतो )

[तिकडे, अयाप्पो ने आपल्या हातात क्यूब घेतलाय, त्यातून प्रकाश झोत बाहेर पडतात नि त्या भल्या मोठ्या व्यक्ती ची सावली लहान लहान होत जाते. जशी ती खूप लहान होते, क्यूब चा प्रकाश आकंचुन पावतो , नि अयाप्पो धाडकन क्यूब चं झाकण बंद करतो, ती सावली क्यूब बंद होते.]

[सोनू, हे सर्व डोळे विस्फारून लपून बघत आहे ].

सोनू - (विस्मयचकित ) (अयाप्पो कडे बोट दाखवत, स्वतःशीच ) हे चिनी खेळणं लई भारी हाय राव ! (तो असे बोलतोय नि तेवढ्यात बारीक डोळे असलेली चिनी सारखी दिसणारी व्यक्ती सोन्याच्या शेजारी पण खालतून बाहेर येते नि त्याला खेटून जवळ बसते , विस्मयचकित सोन्या त्याच्याशी नकळत पणे बोलायला लागतो ) अरे त्याने ती सावली त्या 'कुल्फी' मधे बंद केली ! नाय ! तो भला मोठा माणूसच 'कुल्फी' बंद झालाय!

बारीक डोळे - (जिभल्या चाटत ) कुल्फी? कुठाय? 

सोन्या (नकळत त्याची बडबड सुरूच )- शू ... हळू बोला !. ते नाय का हातात चौकोनी !

बारीक डोळे - हां ! क्यूब !

सोन्या - थेच !... (अचानक त्याला जाणीव होते आपल्या जवळ कोणी बसलंय )..हां! (चमकून ) कोण रे तू !

(बारीक डोळे, एक क्षण त्याच्या कडे बघतो... हास्यास्पद हासतो नि तिथून पळ काढतो )

(हळू आवाजात, "अरे थांब, थांब !" म्हणत सोन्या दबक्या पावलाने त्याच्या मागे धावतो )  

(तेवढ्यात, अयाप्पो पाठीशी असलेली निळी डबी काढतो )

अयाप्पो - वैशयन, रंभाड - काम फत्ते !

[हवेत रंभाड चा दमदार आवाज हवेत घुमतो, " काम फत्ते अयाप्पो? म्हणजे, चिरंजीवी क्यूब मधे बंदिस्त!" ]

अयाप्पो - होय, (त्रिवार म्हणतो -)चिरंजीवी क्यूब मधे बंदिस्त!

पाटील (काठी उगारत )- थांब रे आडव्या तिरप्या, थांब!

(पुढे धावत असलेला बंडू पण थबकतो )

बंडू (पाटील कडे सरसावत )- पाटील त्याला काय नाही म्हणायचं !

पाटील (त्वेषाने )- गप बंडू ! तुला नक्की ह्याने "टिपणो टायपिंग" केलंय !

बुध्दीनाथ - 'टीपणो टायपिंग' नव्हे पाटील, 'हिप्नोटाईस' म्हणतात ! (बंड्या पाटील ला धक्का मारतो, पाटील पडतो )

पाटील (पडल्या पडल्या )- अरे, मी धावत होतो बंडू तुझ्या मागे , पण लक्ष होते माझे. काय चाललंय ते बघितलं! मूर्खांनो, आपल्या देशातलं "चिरंजीव " असं काहीसे बंदिस्त करून नेत आहे हा !

सोन्या (धापा टाकत, आता सरळ तो पाटील च्या घरात शिरतो ) - पळालं ते बारीक डोळं ! पाटील... (समोरचं दृश्य बघून आवाक होतो )

[बंडू यांत्रिक पणे अयाप्पो च्या इशाऱ्या वर, पाटील वर उड्या घेतो , पाटील उठून अयाप्पो कडे झेप घेतो. त्याच्या हातून क्यूब हस्तगत करतो. बंडू पाटील च्या मागावर त्याला मारण्यात, क्यूब हिसकवण्यात गुंतलेले]

सोन्या - बाबा काय करताय हे? 

बंड्या - (खुनशी आवाज ) तू मधे नगं येउस सोन्या !

सोन्या - (बंड्या चा अवतार बघत, धास्तावलेला ) बाबा? पाटील बरोबर सांगतात आहे... 

(सोन्याला बंडू दूर ढकलतो )

(बंडू परत पाटील च्या मागे, नि क्यूब साठी झटापट सुरूच राहते )

 सोन्या या झटापटीत उडी घेत पाटील ला मदत करतो , क्यूब हवेत फेकल्या जातो नि ह्या हातातून त्या हातात झेलल्या जातो. कधी पाटील ची बाजू पक्की, कधी अयाप्पो ची! पाटील, सोन्या यांना सांभाळणे कठीण होत जाते तेव्हा -]

बंड्या -(अयाप्पो चा इशारा ऐकत ) रे बुद्धू तुला जगायचंय ना ! मग नुसता उभा का? तुटून पड ह्या सर्वांवर. (बुध्दीनाथ भुंकत सैरावैरा सर्वांवर धावतो, क्यूब ह्या गोंधळात गहाळ होतो )

सर्व (थबकून )- रे, क्यूब कुठे आहे?

( क्यूब ची शोधाशोध करत सर्व थकतात )

सर्व - क्यूब गायब ! चिरंजीवी गहाळ ! आता काय करावं? 

सोन्या (बंडू ला ) बाबा ! पन हे काई बरोबर नाय झालं. बाबा ! तुमी पाटलांवर हात उचलला. 

(बंडू रागातच, पण उत्तर काही देत नाही )

[तेवढ्यात, पाटील च्या घरच्या टीव्ही वर पंतप्रधानांची घोषणा होते, भारतात Lockdown जाहीर होतो !]

[आणि काही क्षणात अयाप्पो च्या अवती भवती आवाजाचे तरंग येतात. रंभाड चा आवाज -] 

"अयाप्पो भारतात lockdown घोषित झालाय. संपूर्ण भारत स्तब्ध झालाय. तुला याना वर घेणे अशक्य आहें, कारण पुढील काही दिवस आकाश स्वच्छ राहणार, नि आमचं यान 2020 च्या लोकांना दिसणार ! म्हणून आम्ही सद्यपरिस्थितीत तिथे नाही येणार. तू सर्व कंट्रोल मधे आहेस असं सांगितलंस तेव्हा तग धर. आम्ही तुला नि चिरंजीव ला न्यायला नक्की येऊ ! (एक क्षण शांतता ) तो पर्यंत पाटील, बंडू, गोट्या नि बुद्धिनाथ वर नजर ठेव. आपला क्यूब गमावू नकोस. "

सोन्या (नाचत नाचत पाटील कडे येतो)-ह्यांना अजून कळालेलं नाही. ह्याने (अयाप्पो कडे बघत, त्याला चिडवत) क्यूब तर गमावलाय. 

पाटील (त्याला गप्प करत )- ओरडू नकोस! त्यांना ऐकू जात असावं!

(तेवढ्यात अयाप्पो चा आपल्या बॉक्स कडे हात जातो, तो कळ दाबतो )

[परत रंभाड चा आवाज घुमतो, "अयाप्पो ! काय सांगतोस ! क्यूब गहाळ आहें? तू सर्वात आधी स्वतःला डिसइंटिग्रेट कर !"]

 (अयाप्पो आणखी एक कळ ओढतो. अयाप्पो चा अक्षरशः पुतळा होतो, बुद्धिराज भुंकतो ).

[पाटील बंडू कडे धावतो. सोन्या मात्र बुध्दीनाथ चा ताबा घेतात.]

सोन्या - पाटील काका, बुद्धी इसरला बोलायचं आता ! भुंकतंय नुसतं आता (खिदळतो ) . 

पाटील (काळजीत )- सोन्या , अरे पण ह्या बंडू ची वाचा गेली !(पाटीलला गदगदून येतं, तो अयाप्पो कडे धावतो, त्याला जोराने काठीने हलवत किंचाळतो ) अरे नाराधमा, ह्या माझ्या बंडू ची वाचा परत दे ! तो बोलू शकत नाहीय. मला वाटलंच काहीतरी ईपरीत होनार !

[बंडू नि सोन्या स्तब्ध उभे आहेत. ]

[पाटील चा आवाज तीव्र होतो ]

[बाहेरून पोलीस ची गाडी घोषणा करत आहेत, काय गडबड आहें...वगैरे... (पाटील च्या घरून ओरडणं ऐकू येतं तेव्हा ) पाटील ! अहो lockdown सुरु झालाय ! घरात बाहेरच्या लोकांची गर्दी घरात नको, सर्वांना घरी पाठवा ! लवकर !]

पाटील (हताश )- काई उपेग नाय ! बंडू तू थांब हितच . सोन्या जा घरी , वरती जाऊन बाल्कनी मधनं आवाज दे ! ह्या बंडू चा मोबाईल तुझ्या कडं असू दे. त्याला काय उपेग त्या मोबाईल चा आता (डोळे पुसतो ). 

[बंडू पाटलाच्या पायाशी, मुक बसलेला. सोबत बुद्धिनाथ . अयाप्पो निर्जीव उभा आहे . रंगमंच अंधारतो.]

[सर्वीकडे टाळयांचा गजर. पंतप्रधानांनी सांगितल्या प्रमाणे महामारी योद्ध्यांचे कौतुक घरोघरी टाळ्या वाजवून चालले आहे. त्याच दरम्यान सोन्या त्याच्या घरातल्या बाल्कनीत येतो, तिथून पाटील चं घर सरळ दिसतय.]

[टाळ्यांचा गजर हळू हळू कमी होतो. ]

[बाहेर, lockdown च्या घोषणा माईक वर पोलीस त्यांच्या गाडीतून करतच आहेत.]

सोन्या - (सवयीप्रमाणे स्वगत ) थे चिनी खेळणं बघा आता कसं गप गुमान उभं हाय ! चिनी भाई ! चिंता नाई ! माझे बाबा परत बोलतीलच, याम सूर !

(बाल्कनी खाली "बारीक डोळे " येऊन उभा आहे. तो अनायसे, अयाप्पो कडे बघत -)

बारीक डोळे  - याम सूर... म्हणजे? तुला "i am sure" , म्हणायचंय का? 

(तेवढ्यात -)

पाटील  - (सोनू ला खाणाखुणा करत संवाद करतो )- ('क्यूब शेवटी गहाळ झाला खरा पण इथेच कुठेतरी पडला असेल ')

सोनू - ( प्रतिक्रियस्तोवर )- काय म्हणतोय पाटील, काय समजत नाय ? काय म्हनताय... दुधाचं पाकीट फुटलं, नि डायरेक्ट तोंडात गेलं? 

[पाटील वैतागाने "नाही" म्हणून खूण करतो.]

सोन्या (डोकं खाजवत, स्वतः शीच )- काय म्हणतात हाय काई बी कळत नाय !

बारीक डोळे - अरे तो क्यूब नाही का ! तो गहाळ झाला फायनली, पाटील बाबा च्या घरात. शोधत आहेत ते. असं म्हणतायत ?  

सोन्या - पाटील, "चिरंजीव" आहे त्या क्यूब मधे बंद !

पाटील - पण कोण चिरंजीव? 

तिघेही (एकदम )- कोण चिरंजीव?

सोन्या - अरे हो !माझी आजी सांगायची चिरंजीव म्हणजे, हमुमान जी ! जे आज च्या काळात बी हाय !

पाटील - आणखी एक चिरंजीव म्हणजी , अश्वत्थामा !

सोन्या - हे टाइम टीरावेल वाले आपल्या हनुमान जी ना पळवून नेनार का काय ? 

पाटील - (उपरोधाने ) देवाला पळवणार हे लोकं? 

सोन्या - अशक्य ! आमचे हनुमान मोस्ट पॉवरफुल !

बारीक डोळे - पण शोधलं तर पाहिजेच कोणाला बंदिस्त केलंय ह्यांनी क्यूब मधे. 

तिघेही - आमचे हनुमान जी मोस्ट पॉवरफुल, बंदिस्त कोण क्यूब मधे - काढू हुडकून !

[तिघेही चुटकी वाजवत, संगीतमय वातावरणात "हनुमान श्री, हनुमान श्री... जय, जय, जय, जय... हनुमान जी " असा घोषा करतात.]

(तेवढ्यात बंडू तिथे येतो बारीक डोळे ला बघतो. मूकपणे सोन्याला इशारा करतो. सोन्या खाली वाकून बघतो पण त्याला कोणीच दिसत नाही)

[तरी पण सोन्या ला खाली कोणी उभं असल्याची शंका येतेच . तो पाटील ला विचारतो, 'खाली कोणी आहे का? ', पाटील च्या दृष्टीक्षेपात 'बारीक डोळे' नाही, तो नकार देतो ]

सोन्या (स्वतः शी )- हा नक्कीच थो बारीक डोळेच असन ! (प्रेमाने आवाज देतो ) बा - री - क डो -ळे ! 

(बंडू त्याला वाकून बघतोय )

(बारीक डोळे ही अनावधानाने 'ओ...' देतो )

सोन्या (ताडकन उडतो ) अस्सं ! वाटलंच मला ! थांब रे बारीक डोळे, आलोच खाली मी ! आज तर सोडणार नाही ! (धाव घेत ) कोन हाय माहीत नाय ! कुठून येतो माहीत नाही ! जय बजरंग बली - तोड दे बारीक डोळे वाली नली !

(खाली जातो. पण खाली पोहचेपर्यँत परत बारीक डोळे पळ काढतो ) (बंडू नि बुध्दीनाथ त्याच्या मागावर जातात, नंतर सोन्या पण त्याच दिशेला धावतो )

(दमलेला सोन्या घरी परततो, "परत हातातनं निसटला" म्हणत वैताग व्यक्त करतो  )

 [हनुमान श्री, हनुमान श्री !

जय जय जय, हनुमान श्री !

- ह्या वाक्यांनी हळू हळू प्रकाश मंदावत जातो.]

[सोन्या च्या बालकनी मधे अंधार. पाटील च्या घरात दोन भाग आहेत. आधीच्या उल्लेखीत भागात अजूनही बंडू बसलेला आहे. बुध्दीनाथ त्याची पिशवी हुंगतो आहे. बंडूने त्या क्यूब वर रंगकाम सुरु केलेलं आहे. बुध्दीनाथ भुंकतो. बंडू त्याला गोंजारतो. पलीकडच्या भागात पाटील आराम खुर्चीवर पाठमोरा बसलेला आहे. पलीकडच्याच खिडकीतून अचानक एक व्यक्ती आत उडी घेतो. नि पाटीलच्या मुसक्या बांधून, पाटीलवर खुनी हल्ला करते . बुध्दीनाथ जोरजोरात भुंकतोय, अस्वस्थ येऱ्या झाऱ्या मारतोय. अनिभज्ञ बंडू त्याला चूप करतोय. शेवटी पूर्ण रंगवलेला हुबेहूब क्यूब तयार होतो नि बंडू त्याच्याकडे निरखित बसतो. ]

[काही क्षणात म्हाताऱ्या चा प्रवेश. बंडू चं क्यूब चं निरीक्षण सुरूच आहे. म्हातारा बंडू जवळ येतो. बंडू चांगलाच दचकतो ]

(बंडू ची मनस्थिती बिघडलेली आहे. वैताग, दुःखाचा आवेग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय )

म्हातारा - (बंडूच्या दृष्टीत आपली नजर केंद्रित करत ) बंडू बायकोला भेटायला जायचंय ना? 

(बंडू अर्धचेतन अवस्थेत पाटील च्या खोली कडे बघतो )

म्हातारा - पाटलांशी माझं बोलणं झालंय, तू तयारी कर. 

(बंडू तसाच आपल्या घराकडे बघतो )

म्हातारा - सोन्याची काळजी करू नको, बाहेर lockdown आहे, आपण सर्व एका गाडीत जाणं शक्य नाही. पुढच्या गाडीत तुझा कुत्रा नि सोन्या दोघेही येतील. 

(बंडू ला पटतं, तो पाटील ची अनुमती घ्यायला त्याच्या खोली कडे वळतो )

म्हातारा - (कळवळीनं, घड्याळ बघत )- बंडू, मला तुला तुझ्या गावाला हलवायला बरेच प्रयत्न करावे लागलेत. अगदी थोडाच वेळ दिलाय सरकारने ह्या कामासाठी. Lockdown चे दिवस आहेत ना !

(बंडू आपल्या पिशवीतले तिकीट नि म्हाताऱ्याचं कार्ड दाखवतो )

म्हातारा (गालातल्या गालात हासतो) - ते असू दे ! Lockdown आहे. सर्व बसेस बंद आहेत महिनाभर. माझ्या कार मधेच जाणार आपण. 

(कार्ड नि तिकीट तिथेच ठेवतो. बुध्दीनाथ ला गोंजारतो )

(बंडू काहीही न दर्शवता त्याच्या सोबत चालायला लागतो. बुध्दीनाथ ची अवस्था केविलवाणी झालीय )

(म्हातारा वळतो नि खोटा क्यूब सोबत घेतो नि बंडू ची पिशवी आणि अयाप्पो ची निर्जीव मूर्ती ला उचलून नेतो )

(गाडीचा आवाज -बंडू म्हाताऱ्या सोबत निघून जातो )  

(पाटील च्या घरी सोन्या धावत आलाय)

सोन्या (ओरडतच )- पाटील ! पाटील ! कुठे आहात. 

(सोन्या पाटील च्या रूम कडे धावतो. पाटलाची रूम मधे अंधार. थक्क झालेला सोन्या घाम पुशीत पाटीलच्या रूम बाहेर येतो )

(कसबसं स्वतः ला सावरीत नि डोळ्यात अश्रू. तणावग्रस्त चेहरा. बुध्दीनाथ त्याच्या कडे धाव घेतो)

सोन्या - बुध्दीनाथ काय विपरीत घडतय सर्व !

(बुध्दीनाथ त्याचे लक्ष खाली पडलेल्या कार्ड नि तिकिटी कडे वेधतो )

सोन्या - ठयनकु बुद्धी ! (सावध पणे कार्ड उचलतो, नि तिकीट तपासतो )...तु सांगतोय की... (कार्ड कडे बघत ) हा माणूस बाबांना (तिकिटी कडे बघत ) आपल्या गावाकडे नेतोय !

(सोन्या त्याच्या जवळ असलेला बंडू च्या मोबाईल मधे डोकावतो. कार्डावरचा नंबर तपासत -)

सोन्या- ह्या कार्ड वाल्याचं लोकेशन आपल्या गावकडचंच दिसतय. लई भारी बुद्धी ! (थांब थोडा ) पाटलाच्या रूम कडे धावतो (पिशवीत काहीतरी लपवून, बुध्दीनाथ ला घेऊन तो बाहेर जातो )

सोन्या - चल बुद्धी ! गाव गाठलंच पाहिजे लवकर !

(बाहेर lockdown च्या घोषणा सुरूच आहेत )

[रंभाड रस्त्यावर चालतोय, वैशयन त्याच्याशी कनेक्टेड आहे ]

रंभाड - अत्यंत भीषण स्वरूपाचे दृश्य आहे वैशयन इथे ! पथिक कामगार आपल्या गावी परतत आहेत. लहान मुलं कडेवर, रस्त्यावर जे मिळेल ते खायला मिळवत आणि तहानलेले मुलं वाटेत पाणपोई कडे धावत आहेत. कधी शेतीवर घाम गाळत असलेला शेतकरी शहरातून परतणाऱ्या आपल्या नातेवाईकांना साश्रू नयनांनी स्वागत करतांना दिसतात . रक्तात नाहलेले पाय, जमेल त्या कापडाने बांधत, फरफटत पुढे जाणारे लोकं , बंद असलेल्या मंदिरासमोर धायमोकलून रडणारे लोकं, पैसे जवळ नाहीत त्यांना, जमेल ते खायला देणारे लोकं; अशी भेसुर चित्रं उमटली आहेत. शाळा तर बंद आहेत, नि पथिकांची लहान गरीब मुले शाळेकडे त्यांच्या वडिलांचे लक्ष वेधत असतात , तो त्यांना कडेवर घेत किंवा फरफटत पुढे नेतोय रे वैशयन . 

वैशयन, "अहो पुढे काय? जवळचे पैसे संपले. " म्हणणारी बायको, तिला शांत करत, उदास दिशाहीन नवरा मात्र सर्वांना सांत्वना देत आहे, "बघ गावाला पोचलो की बरं होईल सर्व !". "कधी? पंधरा दिवस पायी चालतोच आहे बाबा " म्हणणारी मुलं दिसत आहेत वैशयन. (त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतात)

वैशयन (बॅकग्राऊंड आवाज )- होय रंभाड ! ही पिढी निराळी होती बघ ! रंभाड, अयाप्पो नि तो क्यूब, तिथं राहणं धोक्याचं आहे. 

रंभाड (वैतागलेला )- अरे शोध शोध शोधतोय त्या सोन्याला...कधी दिसतो पण लगेचच नाहीसा होतो. क्यूब चं लोकेशन त्याच्या कडेच दाखवतंय ! तो दिसाला परत तर सोडणार नाही त्याला . 

(रंभाड असाच वैशयनशी संवाद साधता पुढे जातोय. तेवढ्यात सोन्या त्याला वाटेत बघतो. रंभाड ला बघून सोन्या लपतो )

रंभाड - वैशयन, ह्या लोकांच्या न्यूज मधे आपल्या बद्दल उल्लेख नाही नाही ना, हे चेक कर. कदाचित एक्सट्रॅटेररिस्टरीअल मोव्हमेन्टस बद्दल उल्लेख आहे का कुठे बघ !

सोन्या (स्वगत )- एक्सट्रा चिस मोमो ! ह्यांनाही आवडतो? मला बी ! चिनी पदार्थ !

(शेजारी, हळुवार बारीक डोळे त्याच्या बाजूला स्थानापन्न होतो )

बारीक डोळे - काय? 

सोन्या (लक्ष रंभाड कडे, स्वगत )- एक्सट्रा चिस मोमो. 

बारीक डोळे - असं. असं. 

(रंभाड परत येतो -)

रंभाड (वैशयनशी बोलत ) - ह्या सोन्याला quarantine तर नाही केलं कोणी? 

सोन्या - (स्वागत ) कोणती 'वाईन' बोलला हा? 

बारीक डोळे (जरा मोठयाने )- quarantine म्हणाला तो. 

सोन्या (आवाज कमी करण्यास खुणावतो )- शू.. शू 

बारीक डोळे (प्रतिक्रिया देत ) - शू.. शू !

(सोन्याचं आता लक्ष बारीक डोळे कडे जाते )

सोन्या (जागे वरून उठत ) तू ! इथंही ! आता तर नाही सोडणार तुला ! अरे कोन तू? 

(बारीक डोळे पळायला लागतो. सोनू त्याच्या मागे. तेवढ्यात बारीक डोळे वर बुध्दीनाथ उडी मारतो. रंभाड चं लक्ष गोंधळाकडे जाते. तो कानोसा घेत तिकडे वळतो. गडबडीत बारीक डोळे ची रंभाड शी टक्कर होते. रंभाड त्याला पकडतो. )

[सोन्या तिकडे धावत येतो. सोन्या रंभाड ला बघून वळतो. रंभाड बारीक डोळेला सोडतो नि सोन्या च्या मागे धावतो. बारीक डोळे चा रस्ता अडवतो बुध्दीनाथ.] 

रंभाड - सोन्या! खरा क्यूब माझ्या हवाली कर !

सोन्या - रंभाड ! अयाप्पो ला कुठं लपवलंस? माझ्या बाबाचा आवाज गायब नि आता बाबा ला गायब करतोयस ? पहिले बाबा दे , मग तुला क्यूब देईल, आणि ऐक ! माझ्या कडं तोवर अयाप्पो राहील जोवर बाबाचा आवाज परत येत नाही ! मग तुला तुझा अयाप्पो परत.

रंभाड - सोन्या, नाटकं बंद कर ! माझ्या कडे बंडू नाही. तू आणि पाटील काहीतरी शिजवताय नक्की. 

सोन्या - पाटील बद्दल तू विचारतोय? त्याला तर तूच उडवलंस !

रंभाड - खोटं ! मी पाटील ला तुझ्या सोबत बघितले मघाशी रस्त्यात. 

सोन्या - काही पण बोलतोस का रं तू? तू जर पाटील ला नाही उडवलं तर सिद्ध कर !

रंभाड - जे मी केलंच नाही ते कसं सिद्ध करणार? 

सोन्या (हासतो )- टाइम टीरावेल , रंभाड ! टाइम टीरावेल ! परत 'शिनरी' दाखव, पाटीलवरच्या हल्ल्याच्या वेळी काय झालं होतं . 

रंभाड - तू किंवा बंडू पण तर मारू शकता पाटीलला. ते कसं सिद्ध करणार? 

सोन्या - उत्तर तेच आहे रंभाड, टाइम टीरावेल. 

(रंभाड मान्य करतो. ते दोघं, रंभाड ने कळ दाबताच परत पाटीलच्या घरचा नि त्याच्यावरच्या हल्ल्याचा क्षण अनुभवतात )

[पडद्या मागून त्या क्षणाचे आवाज तरंगतात. रंभाड नि सोन्या tv बघितल्यागत भिंतीवर निळा पिवळा प्रकाश थक्क होऊन बघत असतात ]

(दोघेही थक्क होऊन एकामेकाचा चेहरा बघत उभे )

दोघेही - (भिंतीवरून परतणाऱ्या प्रकाशझोताकडे आश्चर्याने बघत ) हा मनुष्य खुनी आहे !? 

(तेवढ्यात बुध्दीनाथ बारीक डोळे ला पळवत त्यांच्या पर्यंत येतो )

सोन्या - शाब्बास बुद्धी ! (त्वेषाने )आता ह्याला अजिबात सोडायचं नाही. 

बारीक डोळे - तुम्ही मला धरू शकतच नाही. Lockdown मधे घोळक्याने फिरूच शकत नाही. 

सोन्या - ए गप ! तुला आमच्या जवळ राहायची काही गरज नाही, बारीक डोळे. बुध्दीनाथ तुझ्यावर नजर ठेवेल. बुद्धी जाऊ नाय दयायचा ह्याला. 

(बुध्दीनाथ भुंकतो, बारीक डोळे दोन पावलं मागे )

[बंडू चे गाव. मोठ्या हॉल मधे म्हातारा नि बंडू स्थिरावले आहेत. अयाप्पो ची मूर्ती एका बाजूला उभी आहे.]

म्हातारा - बंडू रूल्स प्रमाणे आपण इथे quarantine राहणार. नंतरच तुला तुझ्या बायकोला भेटता येणार. 

(बंडू हिरमुसलेला आहे )

म्हातारा - काळजी करू नकोस. सोन्या येतच असेन दुसऱ्या गाडीनं. 

(बंडू खिडकी बाहेर टक लावून वाट बघतोय )

म्हातारा - बंडू, तुला एक सत्य सांगू? 

(बंडू त्याच्या कडे बघतो )

म्हातारा - (आपलं ओळखपत्र दाखवत ) अरे मी cbi officer आहे. म्हणजे... मोठे पोलीस... म्हणूनच तर lockdown मधे इथे सहज पोचलो. 

(बंडू च्या चेहऱ्यावर स्मित उमटतं, तो म्हाताऱ्याचे पाय धरतो )

म्हातारा - अरे त्याची गरज नाही ! हे बघ... हा क्यूब आपल्या खजिन्याची किल्ली. रंभाड नक्की येईल इथे ह्या अयाप्पोचा शोध घेत . पण त्या सावलीवर बादशाहत आहे तूझी आणि तुझी करवतिची . बोटावर नाचवू रंभाड ला आपण. 

(बंडू आवाक )

म्हातारा - अरे... तुझा आवाज मिळेल ना परत !

(तरी बंडू आवाक )

म्हातारा - CBI ऑफिसर आहे मी बंडू... सगळी माहिती काढलीय ह्या प्रकरणाची. तू आता माझं ऐकायचं, मी सांगेल तसं करायचं. 

(बंडू मान डोलावतो )

म्हातारा- घे करवत नि घास त्या लाकडावर ! बघ तू ह्या क्यूब मधला चिरंजीवी तुझ्या तालावर नाचेल. अयाप्पो ची गरज नाही आपल्याला . (हासतो )

(बंडू म्हाताऱ्या कडे असलेला क्यूब हातात घेतो, नि चिट्ठी वर लिहून कागद म्हाताऱ्या च्या हातात देतो )

म्हातारा - (चमकून ) काय? हा क्यूब खोटा आहे ! (स्वतः च्या डोक्यवर हात मारतो )

(तेवढ्यात, पाटील चा आवाज घुमतो )

पाटील (रंगमंचावर दिसत नाही )- म्हातारं ! 

म्हातारा (घाबरून )- कोण बोलला रे !

पाटील - (फक्त आवाज )ओळखलं नाही? अरे एवढ्यातच तर मारलं तू मला, इतक्यात ओळख विसरलास? मी पाटील.  

म्हातारा - अरे ही काय चेष्टा आहे? मेलेलं माणूस काय कधी परत येतंय होय !

(बंडू मागून म्हाताऱ्याला हात लावतो. म्हातारा चांगलाच घाबरतो)

म्हातारा - आई... ! अरे... बंडू तू... असं मागून काय हात लावतोस? 

(अंधार होतो. नि बंडू म्हाताऱ्याला पाटील ची आकृती दाखवतो )

(म्हाताऱ्याची दातखिळीच बसते )

म्हातारा - अरे बंडू, तुझ्या गावात भुताटकी आहे का रे ! 

(कोपऱ्यात पळत जातो, नेमका तिथूनच पाटील बाहेर निघतो. 'भूत भूत ' करत म्हातारा बंडू ला आदळतो, परत घाबरतो )

म्हातारा - अरे कसं रे बंडू... अरे काही बोल ना ! (रडायला लागतो )... तू कसा बोलणार... तू तर मुका.. या वाड्यात मी एकटा ! (रडतो )

(पाटील च्या जवळ जाऊन बंडू समजून आधार घेतो. थोडयाच क्षणात समोर बंडू दिसतो. म्हाताऱ्याला जाणीव होते नि सुसाट पळत सुटतो. बंडू त्याला थांबवतो )

म्हातारा - अरे थांबवतो काय येड्या ! ते भूत आहे. तुझा पाटील तिकडे मुंबईतच मेला. 

(बंडू पाटील जवळ उभा होतो.ते बघून म्हातारा तीन ताड उंच उडतो. तोंडात बोटं खुपसून परत रडतो )

म्हातारा (लहान मुला सारखा रडतो )- तू ऐकत नाही ना ! जा ! कट्टी आम्ही ! अरे पाटलाचं भूत आहे ते (पाटील पुढे येतो. परत म्हातारा उड्या मारायला लागतो )...बंडू निघूया इथनं... मला तरी जाऊ दे रे वेड्या. 

(पाटील आणि बंडू दोघंही एकत्र चालत म्हाताऱ्या कडे येतात )

म्हातारा- बंडू असं करू नको ! अरे वाचा गेलीय, तुझा नि माझा आता जीव सुद्धा जाईल. पळू दे मला... अरे खरं सांगतो, मुंबईत मीच पाटील ला मारलंय ! हे... हे... भूत आहे !

(रंगमंचावर उजाडतं, टाळ्या वाजवत रंभाड, सोन्या आत येतात )

सोन्या- ओ, आफिसर, तुमचा गुन्हा रेकार्ड केला आम्ही. साहेब ! कशाला मारला पाटील ला? 

म्हातारा - सर्व प्लॅन फिसकटत चालला होता, पाठवतच नव्हता बंडू ला माझ्या सोबत... पण हे भूत? 

सोन्या - साहेब, देव तारी त्याला कोण मारी. तुमी हल्ला केला खरा, पन थोडक्यात वाचले पाटील तुमच्या खुनी हल्ल्या तून..

(पाटील हासत पुढे येतो )

(म्हातारा रागाने लाल बुंद होतो.खिशातून रिव्हॉल्वर काढतो )

म्हातारा- कोणी हलणार नाही ! तुम्ही मला ओळखले नाही! पाटील भूत बनवून घाबरावताय का मला? काय? ऐक ! मी आहे मुंबई चा डॉन, "बुढा भुरा "!. मला तो चिरंजीवी हवाय ! मी राज्य करणार मुंबई वर (cbi ऑफिसर चं कार्ड उंच हवेत फेकतो ) एका कार्डाने सर्व फसले (हासतो ). Cbi वाला समजले. सोन्या, (बंडू वर बंदूक ताणत ), बापाची वाचा गेलीय, आता त्यालाच गमावशील ! गप तो क्यूब मला दे ! (सोन्या त्याला क्यूब देतो ) (तो जोरात हासतो ) बुढा भुऱ्या शी टक्कर नाय घ्यायची कोणी ! जीव प्यारा आहे ना? मुंबई का डॉन, बुढा भुरा ! चिरंजीवी चा मालक - बुढा भुरा ! बंडू तू माझ्या सोबत येणार, तयारी कर ! अरबपती, बुढा भुरा ! (हासतो )

(तेवढ्यात बुध्दीनाथ कुठून मागून त्याच्यावर उडी घेतो. झटापट, क्यूब इकडे तिकडे फेकल्या जातो)

बुढा भुरा - (हवेत फायर करतो ) चेष्टा नाहीय ! सर्व गप उभे रहा. 

(तेवढ्यात, रंभाड अयाप्पो ला रिमोट ने जागृत करतो) [अयाप्पो पार बुढा भुरा ला भंडावून सोडतो. तो त्याला कोणावर गोळी झाडू देत नाही. अयाप्पो वर तर गोळयांचा परिणाम होतच नाही. ]

(शेवटी अयाप्पो भुरा च्या छातीवर पाय ठेऊन उभा होतो )

बुढा भुरा (वैतागून )-पुरे आता. एक इशारा केला तर माझी गँग पोचेल इथं क्षणात. बाहेरच आहेत उभे सर्व. तुम्ही लोकं काही वाकडं नाही करू शकत माझं ! 

(सर्व विस्मयचकित, स्तंभित )

बुढा भुरा -रंभाड तुझ्या रोबोट ला दूर ने... 

(तेवढ्यात गन फायरिंग चा आवाज, सायरन वाजतो नि बारीक डोळे इन्स्पेक्टर च्या ड्रेस मधे शिरतो )

बारीक डोळे - मंडळी घाबरू नका, ह्या बुढा भुऱ्या सारखा मी तोतया पोलीस नाही ! मी इन्स्पेक्टर सावंत, ह्या प्रकरणाचा छडा लावायचा म्हणून बऱ्याच आधीपासून पाळती वर होतो. बुढा भुरा, तुझे दिवस भरले. बाहेर तुझी गँग ला आम्ही ताब्यात घेतलंय. चला जेल ची हवा खाऊ. (सोन्या कडे बघत ) सोन्या आपण मात्र एक्सट्रा चिस मोमो खाऊ... chinese ! Good job सोन्या आणि तुम्ही सर्वच !

(सोन्या खजील हासतो ) (भुरा नि सावंत जातात )

रंभाड - तुमचा पाठलाग करता करता आम्ही ह्या पिढी च्या हाल अपेष्टा बघितल्या. किती कष्टाने हे जीवन जगतायत लोकं, हे बघितलं. घायाळ मनुष्याची धडपड, ही अमर अश्वत्थाम्या च्या जवळ नसलेलं अमृतच होय . कष्ट तुम्ही झेललेत म्हणून आमची 90 ची पिढी उत्कृष्ट तयार झाली.तुमच्या अमाप कष्टांमुळे आमची पिढी सक्षम झालीय . कष्ट नावाच्या संजीवींनीनेच मनुष्य जातीला अमर केलेय. खरं, अमरत्व असच मिळवावं, कष्टानं ! हे आज कळलं! पिढ्यानं पिढयांना जीवन दान देणारं अमरत्व !

[वैशयन चा आवाज आसमंतात घुमतो " आम्ही तुमच्या सोबत आहोत ! कष्ट हसतमुख पणे सहन करत पुढे जाणारे तुम्ही, काही दृष्ट आणि भ्रष्ट लोकांमुळे स्वतः चे अवलोकन कमी करू नका. तुमच्या ह्या कष्टांमुळेच पुढची पिढी प्रगल्भ होणार. तुमचे दुःख, तुमच्या जखमा ह्या कायमच्या नाहीत, समूळ नष्ट होतील त्या. आणि त्या क्यूब मधे कैद 'चिरंजीव' ला आज एक कष्टकरीच मुक्त करेन. अश्वत्थामासारख्या जखमा जे कष्टकरी पिढ्यानं पिढ्या स्वतः च्या अंगावर वागवतात आहेत, त्या जखमांपासून मुक्तता मिळणार नि एक नवीन समाज निर्माण होणार ! जा, बंडू मुक्त कर त्या 'चिरंजीव' ला !"]

(क्यूब घेऊन बंडू अयाप्पो कडे वळतो )

(सावंत पण येतात )

सावंत - (उत्साहात बंडू कडे जात ) म्हणा ! अनलॉक चिरंजीवी !

सोन्या - अंडा भुरजीवी? 

(सावंत शांत पणे त्याला अनलॉक चिरंजीवी म्हणायला शिकवतात )

[बंडू क्यूब अयाप्पो जवळ नेतो नि कळ फिरवतो , "अनलॉक चिरंजीवी" चा गजर होतो, क्यूब मधून प्रकाश झोत बाहेर येते, आत बंदिस्त सावली मुक्त होते ! अयाप्पो आगळाच चमकतो , नि बंडू च्या तोंडून अस्फुट पणे वाक्य उमटतं , " सोन्या !"]

सोन्या - आई वास सूर ! (आनंदाने उड्या मारत बापा जवळ जातो, पण थबकतो )

सावंत - आं ! ओह ! ही वॉज शुअर !

(सोन्या मिठीत येत नाही बघून -)

बंडू - काय झालं? 

सोन्या - सोसलं- डीश - वांगं. 

सावंत - तो म्हणतोय " सोशल डिस्टेंसिन्ग "

(सर्व हसतात, अयाप्पो डोलतो, सर्व संगीतावर ताल घेत, दूर उभे राहून नाचतात. जय जय जय हनुमान श्री चा घोष होत पडदा पडतो )


पडदा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Children