नि - यम
नि - यम
झंम्पी ने उदबत्ती आई च्या फोटो भोवती ओवाळली. "योगेश्वर - रागिणी 1996" ची तारीख असलेली फोटो फ्रेम आज तिचे जरा जास्तच लक्ष वेधत होती. आपल्या दुपट्टयाने तिनी ती फ्रेम पुसली. बाबा आणि आई च्या एकत्र फोटो कडे भरल्या डोळ्याने बघत भर्रकन आपल्या पर्स मधला मोबाईल काढून तो मेसेज तिने परत न्याहाळला. ब्रेक अप, एवढं सोपंय, लिहणं? कारणं तरी काय? काय तर म्हणे आपले स्वभाव जुळण्या सारखे नाहीत. बाबांशी बोलावं तरी कशे, असल्या विचारात गोंधळलेली झंम्पी परत मोबाईल कडे न्याहाळत, मोबाईल वर बोट फिरवीत, बाबांच्या खोली कडे बघत उभी होती. काय गम्मत असते बघा नको तेव्हा आपले हात नि विचार ह्यांच तारतम्य संपतं. Send बटण वर बोट पटदिशी आदळलं. चमकून झंम्पी ने मोबाईल च्या मेसेज बॉक्स कडे बघितले. अरे देवा ! मेसेज forward झाला, तोही बाबांना !
आणि अभिषेक चा " ब्रेक अप !" चा मेसेज बाबांच्या मोबाईल च्या मेसेज बॉक्स मधे जाऊन स्थिरावला असणार . स्वतः चा मोबाईल तिने तिथेच आपटला. झंम्पी धावली. बाबा त्यांच्या गादी वर नव्हते. अरे हो ! बाबा तर आता morning walk ला गेले असणार. त्यांच्या हातात जर मोबाईल असेल तर काय विचार करतील. प्रेम प्रकरण आहे हेच कधी सांगितलं नाही नि थेट ब्रेक अप चा मेसेज त्यांच्या पर्यंत.
"झंम्पी ! झाली का कॉलेज ची तयारी? "
बाबा परतले ही एवढ्यात. झंम्पी परत हॉल कडे धावली.
"बाबा मोबाईल कुठाय तुमचा !"
"का? "
"नाही जरा दाखवा, आमचे स्पोर्ट्स चे सर आज वडलांना एक assignment पाठवणार होते."
"वडलांना assignment !"
"ते योगासनं पाठवणार होते. मुलं करतात का बघा म्हणून सांगणार होते".
"बरोबर आहे. आळशी पिढी तुमची. तो बघ मोबाईल तिथे आई च्याच फोटो जवळ आहे बघ !"
"म्हणजे तुम्ही मोबाईल नव्हता नेला !"
"नव्हे ! "
झंम्पी चा जीव भांड्यात पडला. पटकन बाबांचा मोबाईल हातात घेतला. तिने पाठवलेला तो मेसेज बाबांच्या मोबाईल मधून डोकावला. झटदिशी तिने तो delete केला. पर्स खांद्यावर झुलवत ती बाहेर च्या दारा कडे वळली.
"झंम्पी आला का गं मेसेज स्पोर्ट्स च्या सरांचा? "
"नाही बाबा !" न वळता झंम्पी उत्तरली नि आपली activa तिने सुरु केली.
योगेश्वरने कौतुकाने, भरलेल्या डोळ्याने झंम्पी कडे बघत होता. ती गेल्याची खात्री करून बायकोच्या फोटो मागून एक चिट्ठी बाहेर काढत आपल्या थरथरत्या हाताने मोबाईल वरून, चिठ्ठी कडे बघत, त्याने एक नंबर दाबला.
"हॅलो ! अभी बोलताय का? मी झंम्पी... अ आपलं... वैदेही चा वडील बोलतोय. आपण एक पंधरा मिनिटासाठी भेटू शकतो? "
पलीकडून होकार येईस्तोरवर योगेश्वर त्याला समजावत होता.
"आणि हो ! वैदेही ला नको कळू देऊस आपण भेटतोय ते. तिनी नाही सांगितलं हो मला तुमच्या ब्रेक अप बद्दल. It was an accident. चुकून कळलं सर्व मला. प्लीज तुम्ही या. तिला नका सांगू आपण भेटतोय ते. तुमचा नंबर पण मी चोरून घेतलाय तिच्याच मोबाईल मधून. Thanks हा, या ! "
झंम्पी त्याच्या बेडरूम मधून हॉल कडे आली असतांना, त्या अगोदरच काही क्षण योगेश्वर ने झंम्पी ने forward केलेला मेसेज वाचला होता.
बाहेर दार वाजलं. योगेश्वर दाराकडे सरसावला.
"अभिषेक ना रे तुझं नाव? " अभि कडे निरखित योगेश्वर रागिणी च्या फोटो जवळ थांबला. "अभी, ही वैदेही ची आई ! झालीत पाच वर्ष, देवाकडे गेली. मी ही जाईन म्हणतोय पण जबाबदारी दिलीय ना हीने, वैदेही सासरी गेली की मी मोकळा !"
रागिणीच्या फोटो पुढे योगेश्वर संपत चाललेल्या उदबत्ती कडे बघत तसाच उभा होता. त्याने न राहुवून आपली एक आठवण अभिषेक पुढे विस्तृत पणे सांगायला सुरुवात केली.
रागिणी रागावून माहेरी गेली होती.
"रागिणी ! अगं एवढ्या तेवढ्या करणा वरून कोणी घर सोडून जातय होय ! अगं एवढीशी पोर आपली, तिला घेऊन थेट बस ने माहेरी? " योगेश्वर काळ्या फोन च्या रिसिव्हर कडे बघत अक्षरशः किंचाळत होता.
"म्हणजे ! झंम्पीसाठी म्हणून परत बोलावताय? माझे काहीच महत्व नाही? माझ्या बद्दल काहीएक प्रेम नाही !"
अस्वस्थ योगेश्वर चांगलाच गोंधळात पडला. स्थिर होत त्याने त्या काळ्या फोन कडे नजर टाकली.
झंम्पी पोटात असतांना योगेश्वर ला कसं सांगावं ह्या गोंधळात रागिणी होती. लग्नाच्या वाढदिवसाला ही गोड बातमी योगेश्वर ला कशी सांगावी ह्या विवंचनेत असतांना हा काळा फोन घरी आला होता. काळा लँडलाईन फोन मोठ्या आवडीने त्यांनी नंबर लावून बुक केलेला. लग्नाच्या वाढदिवशी त्यांनी ती एकामेकांना द्यायची ठरलेली भेटवस्तू होती . झंम्पी पोटात आहे ही बातमी ह्याच फोन ने रागिणी ने त्याच्या ऑफिस ला फोन लावून सांगितलेली.
त्यांनी त्या दिवशी शपथ घेतली. आयुष्यात कधी 'कसं बोलावं', 'कसं सांगावं' अशी परिस्थिती आलीच तर ह्या फोन वरून सत्य परिस्थिती एकाने दुसऱ्याला सांगायची. त्यांनी आवडीने त्या काळ्या फोन चे नाव जरा गमतीशीर अशे ठेवले. बऱ्याच वादावादी नंतर काळा पण नेहमी सत्य सांगणारा 'यम !' असे त्याचे नामकरण केले.&
nbsp;त्या फोन वर "सत्य - यम " अशे शब्द त्यांनी गोंदवून घेतले नि खळखळून हसले होते.
"रागिणी, ऐक, मी आपल्या काळ्या फोन वरून, यमा वरून बोलतोय. विश्वास ठेव. तुझ्या शिवाय मी नाही गं जगू शकणार ".
रागिणी ला परत आणायला तिच्या घरी पोचला खरा पण आपल्या सासऱ्या चा नवीन अवतार बघून त्याची बोबडीच वळाली. मोठा लाब्राडोर अंगावर सोडला त्याने. हातात बंदूक घेऊन धावलेला म्हातारा. आणि सासू ! अहो त्यात गोळी तर टाका म्हणून बंदुकीच्या गोळ्यांचा बॉक्स घेऊन सासऱ्याच्या मागे धावत आली होती. सासरा ठिक का लाब्राडोर कुत्रं ठिक, ह्या गोंधळात योगेश्वर तिथेच तसेच उभा होता .
"तुम्ही एवढे स्थितप्रज्ञ आहात माहीत नव्हतं !" रागिणी म्हणाली होती.
देव जाणे काय घडलं पण झंम्पी ला कडेवर घेऊन आपल्या बायकोला घरी परत आणली ह्यातच सर्व मिळवलं. रागिणीच्या फोटो कडे आपसूकच योगेश्वराचा हात गेला. झटक्यासरशी त्याने हात मागे घेतला, संपणाऱ्या उदबत्ती ने त्याच्या हाताला चांगलाच चटका दिला होता.
तेवढ्यात activa चा आवाज झाला. योगेश्वर चांगलाच गोंधळला. झंम्पी परत आली होती.
"अभिषेक तू इथे लपून बस रे बाबा. मी वैदेही ला बाहेरच थोपवतो. "
योगेश्वर बाहेर धावला. अभिषेक घर निरखित उभा होता. संपलेल्या उदबत्ती चा दरवळ अजूनही त्याच्या नाकात घुसत होता. त्याला जाणवलं तो वैदेही च्या आई च्या फोटो जवळ उभा होता. त्याने सोफ्यावर बसण्याच्या विचारात आपली पावलं सोफ्याकडे वळवली. पण त्याला जाणवलं कोणीतरी मागून त्याला खेचतंय.
तो चांगलाच बावरला. "क.. क.. कोण !"
फोटो मधून आवाज आला, 'माझ्या कडे बघ ! तुझी एक्स सासू बोलतेय. "
"एक्स सासू "
"तुझ्या एक्स ची आई, म्हणजे तुझी एक्स सासू नाही का? "
"पण तुम्ही तर वर गेल्यात ना !"
"आले बाबा, तू उपद्व्याप करून ठेवलेस. म्हणून आले तुझ्याशी बोलायला !"
अभिषेक चांगलाच घामाघूम झाला होता. त्याला काय बोलावं सुचेना.
तेवढ्यात योगेश्वर धापा टाकत आत आला.
"केली तिची बोळवण बघ !गेली परत वैदेही".
"हे बघा, तुमची परिस्थिती आली लक्षात मला".
"नाही ती खरंच येणार परत मला नव्हते माहीत".
अभिषेक ने एक्स सासूच्या फोटो कडे बघितले. चमकणारी फ्रेम, सासूच्या डोळे असलेल्या भागात जरा जास्तच चमकायला लागली.
"छे ! किती वाईट ! No ब्रेक अप, उद्याच बाबांना आणतो तुमच्याशी बोलणी करायला".
योगेश्वर टणकन उडालाच !
अभिषेक गेला. योगेश्वर आवाक, रागिणी च्या फोटो पुढे उभा.
"तू म्हणायचीस, लव्ह मॅरेज मधे सर्व आगळं असतं. मी म्हणायचो आपलं अरेंज्ड जरी असलं तरी आमचं त्यांचं प्रेम सेम असतं".
ही पिढी काय असावी ह्याच्याच विचारात योगेश्वर आपल्या बेडरूम कडे वळला.
दुसऱ्या दिवशी अभिषेक एकटाच आला. झंम्पी चा पार गोंधळ उडालेला. आई च्या फोटो ला उदबत्ती लावते वेळी अचानक आलेला अभिषेक नि त्याने गळ टाकली की तिच्याशीच लग्न करणार . बाबा वाकिंग करून आले नि हसत हसत वॉश घ्यायला आत गेले.
तेवढ्यात काळा फोन खणाणला. का कोण जाणे पण अभिषेक ने तो उचलला.
अभिषेक जागच्या जागी थरथर कापायला लागला. "यम ", "सत्य" हे शब्द त्याच्या डोळ्यासमोर आलटून पालटून उडी घेत होते.
"बाबा ! तुम्हाला हा फोन नंबर कोणी दिला !"
झंम्पी कॉफी घेऊन त्याच्या मागे कधी आली कळलंच नाही.
" बाबा, मान्य! तुम्ही जी मुलगी बघितली त्यांच्या एवढी ही पार्टी श्रीमंत नाहीय. पण ठिक आहे. म्हाताऱ्याकडून काढू माल हळूहळू. मला ही काहीच समजत नाहीय इथे आल्यावर मला काय झालंय. पण परत परत शब्द फिरवणे मला धोकादायक वाटतय. प्लीज, हीच सून म्हणून मान्य करा". अभिषेक घाम पुसत, डोळ्यात अश्रू साचवत बोलत होता.
तेवढ्यात, योगेश्वर मागाहून आले.
"अरे ! यमा शी काय बोलतोय !"
अभिषेक ने चमकून योगेश्वर कडे बघितले.
"अरे, हा यम बऱ्याच वर्षांपासून डेड आहे".
झंम्पी कॉफी चा कप घेऊन पुढे आली.
"बाबा यम कधी 'डेड' होतो का? तो सत्य आहे. सत्य लपत नाही, मरत ही नाही. अभी, मी ऐकलंय काय बोललास तू फोन वर. आय रिजेक्ट यू. तुझी लायकी नाहीय माझ्याशी लग्न करायची. Bye. तोंड दाखवू नकोस ह्यापुढे".
अभिषेक गेला. झंम्पी योगेश्वर कडे वळली.
"बाबा, तुम्ही सांगायचे आई म्हणायची, लव्ह मॅरेज मधे ब्रेक अप झाल्यास बरोबर असलेल्या बाजूनेच ब्रेक अप चा निर्णय द्यावा. मी पार कोसळले होते. माझी काहीच चूक नसतांना ह्या अभिषेक ने मला रिजेक्ट केले होते. आज मी त्याच्या तोंडावर माझं rejection फेकलं. आज मन हलकं झालं. जड आयुष्य जगणं कठीण झालं होतं बाबा !
योगेश्वर ने आपल्या पोरी ला जवळ घेतले.
"होय पोरी ! ती म्हणायची, नाही कोणी म्हणायचं, ह्यालाही महत्व असतं ! त्यालाही नियम आहेत. पण माणसं ओळ्खणेच तर एक मोठी कसरत आहे. जी बाजू खरी आहे तिलाच अपराधी भावना जपायला भाग पाडणारे नालायक सहजा सहजी ओळखता येत नाहीत".