STORYMIRROR

Janardan Gavhale

Action Comedy Tragedy

0.3  

Janardan Gavhale

Action Comedy Tragedy

बाजरं पाहिलं पेरून...

बाजरं पाहिलं पेरून...

7 mins
15.7K


कसं हाय भाऊ कोणालेही वाटते की, शेती करणे फार सोपे आहे. पण प्रत्यक्षात शेती करणे किती कठीण आहे, हे ज्याचे त्यालाच समजते. "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' अशी परिस्थिती आहे. टोले एवढे पडतात की, सांगता सोय नाही. दिवस निघाल्यापासून संध्याकाळपर्यंत काहीना काही टोले घेणे सुरूच असते. त्याले घडीची फुरसत नसते. तरीही बाकीच्यांना शेती मात्र सोपी वाटते. शेतकऱ्यांना किती टेन्शन असते, हे नोकरीवाल्यांना कसं समजणारं? इथे महिना संपला की, तारखेची वाट पाहणे सुरू असते. दरमहा ठरलेली रक्कम ठरलेल्या तारखेला हमखास मिळते. दुसरे म्हणजे, भविष्याचे काहीच टेन्शन नसते. त्यामुळे सगळं कसं हिरवं हिरवं दिसते. शेतकऱ्याला काही समजत नाही आणि आपणच किती हुशार आहो, हे दाखवायचे असते. आपल्या मनाचे मांडे मांडून तो शेतकऱ्याचे गणित कसे चुकते आणि मला शेतीबद्दल किती माहिती आहे, असे अक्कल पाजळून जो- तो सांगताना दिसतो. पण भल्या-भल्यांना हे ठाऊक नाही की, शेतकऱ्यांचं गणित हे निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असते. पाणी नाही, पाऊस नाही म्हटलं की, शेतकऱ्यांना रात्र-रात्र झोप लागत नाही. इकडे नोकरदार, व्यापारी मात्र निर्धास्त, ढाराढूर झोपा काढत असतात. शेत पिकलं नाही तर वर्ष कसं काढायचं ? हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा असतो. आई-वडिलांचं पालन-पोषण, मुलांचं शिक्षण, मुलीचे लग्न आणि दवाखान्याचा खर्च तसेच वेळेवर येणारे दुसरे विषय, हॅन्डल करताना कशी फजिती होते? हे खेड्यात गेल्याशिवाय शहरी बाबूला समजू शकणार नाही. जे लोक शेती करतात ते प्रत्यक्ष जाऊन पाहिल्याशिवाय कळणार नाही. इकडून तिकडून निसर्गाने साथ दिली आणि चांगले पीक आले तर शेतमालाला भावही मिळत नाही. हे एक प्रकारचे सुलतानी संकट शेतकऱ्याच्या बोकांडीवर दरवर्षी बसलेले असते. कोणतेही सरकार सत्तेत आले तरीही शेतमालाच्या भावाकडे लक्ष देत नाही. "शेतकऱ्यांचे शोषण हेच आमचे शासन' असा खाक्या सत्ताधिकारी पूर्वापार चालवत आलेले आहेत. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही आशा उरली नाही. ज्याला सगळ्या मार्गाने रोखल्या जाऊ शकते, जागोजागी शोषण होते, असा थट्टा,मस्करीचा विषय ठरलेला एकमेव प्राणी म्हणजे शेतकरी आहे. त्याला घडीघडी ठोकरा खाव्या लागतात. कुठेही अपमानच सहन करावा लागतो. त्याला प्रतिष्ठा नाही. जी मुले "शेतकरीपुत्र' म्हणून शेखी मिरवितात, त्यांचीही अक्कल पुढे पुढे आणखी वाढत जाते. ते सुद्धा आपल्या शेतकरी बापाला मूर्खातच काढतात. म्हणजे त्यांनी काबाडकष्ट करायचे, मला शिकवायचं, मोठा करायचं, नोकरीवर लावायचे. आणि उलट त्यांना उपदेशाचे डोस पाजणार की, तुम्हाला काहीही कळत नाही. व्वाह रे बेट्या. खूप हुशार झाला.

बरं जाऊ द्या. आमच्याकडेही शेती आहे. खामगाव तालुक्यात आंबेटाकळी हे आमचं गाव. आजोबा पूर्वीपासून शेतीच करत होते. "उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी' असा समज त्या काळात होता. म्हणून आपल्या मुलानेही शेतीच करावी असे आबांना वाटत होते. वडिलांचे प्राथमिक शिक्षण त्या काळात गावातील शाळेत आणि पुढील शिक्षण गावापासून जवळच म्हणजे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरला नेमाने येथे झाले. सातवी पास झाल्यानंतर मॅट्रीकसाठी वडिलांना खामगाव येथील नॅशनल हायस्कूलमध्ये टाकण्यात आले. त्यावेळी वडील खामगावपासून जवळच असलेल्या घाटपुरी येथे आपल्या बहिणीकडे राहत होते. तेथून दररोज पायी शाळेत जाणे- येणे करत होते. त्या काळात आमच्या गावात बहुतेक मोजके लोक शिकलेले होते. सातवी पास झालेलेसुद्धा नोकरीवर लागले होते. मास्तरची नोकरी सहज मिळत होती. असे असताना पण नोकरीवर जाण्यासाठी किंवा गाव सोडण्यासाठी कुणीच सहजासहजी तयार होत नव्हते. मुलाला नोकरीवर पाठवले तर आपलं कसं होईल, शेतीवाडी कोण पाहील? हा प्रश्न माझ्या आबासमोरही होता. म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना नोकरी करू दिली नाही. त्यामुळे वडीलही शेतातच काम करू लागले. घरी गाडी-जोडी होतीच.

या काळात गावात फारसे शिकलेले कोणी नव्हते. पण आमच्या गावाच्या बाजूला असलेल्या बोथाकाजी येथे गावंडेसाहेब हे नामांकित व्यक्ती होते. ते आमच्या आंबेटाकळी गावातील शिकलेल्या तरुणांना नोकरीवर लावण्यासाठी वेळोवेळी निरोप पाठवायचे. पण नोकरीला जाण्यासाठी कोणी सहजासहजी तयार होत नव्हते. माझे आई-वडील सांगतात की, त्यावेळेस सहजच मास्तरची नोकरी लागत होती, पण केली नाही. दरम्यानच्या काळात वडिलांचे लग्न झाल्यानंतर १९७८ मध्ये एसटीची ऑर्डर आली म्हणून खामगाव डेपोत फक्त एकच महिना काम केले. नंतर नोकरी सोडून पुन्हा शेती करणे सुरू केली. आमच्याकडे त्यावेळी एक शिवचे वावर आणि दुसरे म्हणजे टेंभुर्णीचे वावर होते. शिवचे वावर तिकडे दूर बोरीअडगाव शिवारात होते. टेंभुर्णीचे वावर रेंगटीच्या माथ्यावर म्हणजे अलिकडेच होते. या वावराच्या बाजूला म्हणजे, धुऱ्याले धुरा लागूनच घोगरे मामांचे वावर आहे. माझ्या वडिलांचे ते वर्गमित्र आहेत. पुढे पुंडलिकराव घोगरे मामा हे खामगाव पंचायत समितीचे सभापतीही बनले होते. पण लहानपणापासूनचे मित्र असल्याने वडिलांसोबत शेतात जात, सोबतच काम करत आणि सोबतच घरीही येत. त्यांच्यात गप्पा टप्पा चालत. "शेतीत काही पडेल नाही गड्या' असं मत त्याचं झालं. मग घोगरेमामांनी पुन्हा सल्ला दिला. "जमत असीन त नोकरीचं पाह्य गड्या गोविंदा'. म्हणून नांदा लावायचे. मग वडिलांनी नोकरीसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. एसटी महामंडळाकडून नोकरीची ऑर्डर आली. पण तरीही आबा त्यांना नोकरीवर जाऊ देण्यास तयार नव्हते. "आपल्या घरचे कसे होईल, मुलाबाळांचे कसे होईल, एकुलता एक पोरगा तू आणि आम्ही थकलेले म्हातारे. मग आमचं कोण करणार? आपली शेतीच बरी आहे गड्या' असे म्हणत होते. पण यावेळी वडिलांनी शेतात करावे लागणारे काबाडकष्ट पाहीले. आणि नोकरीवर जायला परवडते काय? याबाबत गावातल्या दोस्तमित्रांचा, वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतला आणि एसटी वाहकाची नोकरी स्वीकारली. सुरुवातीला बरीच वर्षे त्यांनी मेहकर आगारात ड्युटी केली. नंतर १९८४ मध्ये जळगाव जामोद डेपो अस्तित्वात आला, त्यावेळी त्यांची बदली जळगाव जामोद येथ

े झाली, तेथे काही वर्षे काम केल्यानंतर पुन्हा ते मेहकरला बदलून आले.

दरम्यान, १९९१ साली आम्ही काही कारणास्तव गाव सोडण्याचे ठरवले आणि खामगावला राहण्यासाठी छोटेसे घर विकत घेतले. चांदमारी भागातील त्या कुडाच्या घरात राहायला गेलो, नंतर सिमेंट-विटाचे घर बांधून त्यावर टीनपत्रे टाकले आणि तिथलेच झालो. याचकाळात आजोबांचे निधनही खामगाव येथेच झाले. आम्ही चारही भावंडे शाळा-कॉलेजात खामगावला शिकत होतो. वडील एसटीची ड्युटी करत होते. मग शेती कोण पाहणार ? हा प्रश्न निर्माण झाला होता. खामगाव येथून शेती पाहणे होत नसल्यामुळे बटाईने किंवा ठोक्याने दिल्याशिवाय पर्याय नव्हता. पण पीक काही हाती लागत नव्हते. तरीही शेती करणे परवडत नव्हते म्हणून मग मी स्वतःच शेती करण्याचे ठरवले. म्हटले, खामगाववरून पाहतो, आणि त्या वर्षी शिवच्या वावरात फक्त बाजरी पेरण्याचे ठरवले. उन्हाळ्यात शेती तयार केली आणि पावसाळ्यात नुसती बाजरीच पेरून घातली. आजूबाजूचे शेतकरी म्हणत की, "एवढी साजरी जमीन आहे. तू लेका बाजरीचं पेरली, तुहा आबा होता तेव्हा या वावराने कधी बाजरं पाहिलं नाही. बुडा चांगला माल काढत होता'. मी म्हणालो वावर पडित राह्यल्यापेक्षा बरं आहे.

पहिला पाऊस पडला. पण शेतात मागच्या वर्षीचे हायब्रीडचे फनकटं तसेच होते. ते काड्या फणं उचलण्यासाठी बाया सांगितल्या. शेतातील हा केरकचरा जमा करून धुऱ्यावर न्यावा लागत असे. नुकताच पाऊस पडल्यामुळे त्यावेळी या कचऱ्याच्या एका ढिगाखाली विंचू असावेत, याचा साधा अंदाजही येत नव्हता. आणि तुम्हीही काढू शकत नाही जमा केलेल्या कचऱ्याखाली किती विंचू असावेत.? शेतात जागोजागी जमा केलेले हे फणकटं शिंदाड्या टोपल्यात डोक्यावर घेऊन धुऱ्यावर नेऊन टाकणे म्हणजे डेंजर काम होते. एका-एका टोपल्यांमध्ये मी त्यावेळी साधारण १५ ते २० जिवंत विंचू डोक्यावर वाहून नेले असावे. पण एकानेही दणका दिला नाही, त्यामुळे तो अनुभव माझ्या वाट्याला आला नाही.

पाऊस पडल्यानंतर बाजरीचे पीक बहरले होते. पण ते पतले झाले होते. शेती करण्याचे ठरवले पण मी आंबेटाकळी गावात कधी नेटाने राहिलो नाही. दररोज खामगांव येथून येणे-जाणे करत होतो. आमचं हे शेतही अलिकडच्या स्टॉपजवळ होते. गवंढाळा फाट्यावर उतरून पूर्वेस पायी गेल्यास अगदी जवळ होते. त्यामुळे मी शक्यतो आंबेटाकळी गावात जात नव्हतो. इकडच्या इकडे खामगावला परत येत होतो. फक्त मजूर सांगण्यासाठी कधीमधी गावात जात होतो. मला त्या काळी आमची आत्या सरुबाई भाकरे यांची फार मदत मिळायची. शेतात कामासाठी बाया-माणसं सांगणे आणि इतर चिल्लर वस्तू गावातून, घरून आणणे हे सर्व त्याच करत होत्या. मी नुसता खामगाववरून जाऊन "वर वर' हल्लमटल्लम करत होतो. १९८५ साली सातवी पास झालो अन मी गाव सोडलं. आठवीपासून दहावीपर्यंत पंचगव्हाण येथे शाळा शिकलो. नंतर खामगाव येथे कॉलेज केले. त्यामुळे मला गावात कुणी फारसं ओळखत नव्हतं. आणि शेतातलंही काही जमत नव्हतं, तरी म्हटलं यंदा बाजरं पेरूनच पाहावं. पण ते पतलं झालं होतं. तरी झडती चांगली येईल असे वाटत होते.

कोणत्या पिकावर कोणता रोग येईल, कोणती किड पडेल? हे सांगता येत नाही. बाजरीचेही तसेच झाले. या पिकावर वसई आली होती. वसई ही कातिणीसारखी असते. असं म्हणतात की, ती अंगावर मुतल्यास फोड येतात आणि पिकाचे नुकसानही करते. त्यामुळे पिकाचे कसे करावे हा प्रश्न होता. शेजारच्या वावरावाल्यांनी सल्ला दिला की, रात्रीच्या वेळी शेतात जाऊन रॉकेलचे टेंभे मिरवा. रात्रीच्या अंधारात आजूबाजूला असलेली वसई आपोआप टेंभ्यावर येऊन पडते आणि जळते. त्यामुळे होणारे नुकसान टळेल, असे सांगितले. त्यानुसार मी गावातल्या काही मित्रांना घेऊन रात्री शेतात जात होतो. रात्री अंधारात टेंभे लावण्याचा प्रकार एकदम भुतासारखा वाटत होता. पण आमच्यापैकी कुणालाही कशाचीही भीती वाटली नाही. किर्र अंधारात आम्ही कल्ला करत शिवच्या वावरात टेंभे मिरवत होतो. 

ही बहुतेक १९९४ सालची गोष्ट आहे. बाजरीचे पीक चांगले आले होते. पण मी तेव्हा दवाखान्यात होतो. बाजरी खुडणे आणि काढण्यासाठी काही दिवस मला आंबेटाकळीला राहावे लागले होते. दरम्यानच्या काळात पोळ्याचा सण आला. त्यामुळे मला तेथील शेगोकार टेलर यांनी त्यांच्या घरी जेवणासाठी सांगितले होते. तेव्हा मी मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या दामटल्या. हरभऱ्याच्या डाळीचे गोड पुरण खाल्ल्याने दाढदुखी सुरू झाली.आणि रात्री दात ठणकणे सुरू झाले. त्रास वावढा वाढला की, मला ताबडतोब खामगावला येणे भाग पडले. तेथे डॉ. सुषमा सरोदे मॅडमकडे उपचार घेऊन थेट अकोला येथे भरती व्हावे लागले. दाढ आतून सुजल्यामुळे तोंड उघडणे कठीण झाले होते. खाणेच काय चहा, दूध पिणेही बंद झाले होते. कारण दाढ एवढी सुजली की उजवा गाल टम्म फुगला होता. त्यामुळे तोंड उघडणेही जमत नव्हते. सगळं डोकं ठणठण करत होते. रात्रभर झोप लागत नव्हती. त्यामुळे अकोला येथील डॉक्टर मापारी यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये मला भरती करण्यात आले. शस्त्रक्रिया करून दाढ काढावी लागली. सांगायचे हेच की, त्या क्षणाला मला विंचू डसण्यापेक्षाही दाढीचे दुखणे वेदनादायक वाटत होते. आणि या दाढीच्या दुखण्यापेक्षाही शेती करणे अधिक त्रासदायक, कठीण आहे. असे आता वाटते.

आजही माझे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र आणि इतर सर्व कागदपत्रांवर चांदमारी खामगावचाच पत्ता आहे. एवढंच नाही तर मुलांच्या सर्व कागदपत्रांवरही हाच कायमचा पत्ता आहे. सध्या खामगावच्या त्या घरात लहान भाऊ गणेश आणि त्याचा परिवार राहात आहे तर आई-वडील आणि सर्वात लहान भाऊ ज्ञानेश्वर व त्याचा परिवार हे सगळे आता आंबेटाकळी येथे राहतात, पण नवीन जागेत. विशेष म्हणजे, आंबेटाकळीतील जुने वडिलोपार्जित घर ओसाड पडले आहे आणि वडिलोपार्जित असलेले शिवचे वावर विकले आहे. त्या बदल्यात गावाजवळील भवानी मायच्या देवळाजवळ खाल्त दुसरे शेत विकत घेतलेले आहे. आता एखादे वेळी आंबेटाकळी गावात जातो आणि शेतात गेलो की, सरुबाई भाकरे आत्या भेटते आणि अजूनही आठवणीनं विचारते ? यंदा बाजरं पेरतं का?


Rate this content
Log in

Similar marathi story from Action