बाहुबली VS थानोस
बाहुबली VS थानोस


थानोस आता सगळ्या ब्रह्मांडाचा विजेता झाला होता. त्यामुळे ब्रह्मांडात जीवसृष्टी निर्माण होण्यासारखे किंवा जेथे जीवसृष्टी होती असे सारे ग्रह त्याने नष्ट केले आणि शेवटी तो पृथ्वीवरती उतरला. पृथ्वीवरती युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी खंडांचा नाश करत करत तो आशियाकडे वळला आणि चुकून माहिष्मतीकडे गेला. त्याचे चाललेले हे उद्योग सगळे जग पाहत होते आणि मोठ्या आशेने बाहुबली कडे पाहत होते. तोच त्यातून काहीतरी मार्ग काढू शकेल अशी आशा इतरांना वाटत होती.
थानोस त्याच्या इन्फिनिटी स्टोन च्या जीवावरती सर्वांना हरवत होता. जीवे मारत होता. बाहुबलीला हे आधीच ठाऊक होते की आज ना उद्या थानोस आपल्या भारत देशावर, माहिष्मती राज्यावर हल्ला करणार. त्यासाठी तो तयारी करत होता राज्यातील सर्व सैन्य अद्यावत केले होते. सर्व यंत्रे, तोफा ,हत्यारे, बंदुका तयारीत ठेवल्या. अर्थात या सगळ्या गोष्टीचा थानोस वर काहीही परिणाम होणार नव्हता. परंतु लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे होते.
फक्त शक्तीवर भर न देता तो तपश्चर्येच्या मागे लागला. शंकराच्या आराधनेला देखील बसला. शेवटी कोणत्याही गोष्टीला परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे तर अशक्य गोष्टी शक्य होतात. शंकराची तपश्चर्या करून बाहुबली ने अनेक अस्त्रे आणि शस्त्रे शंकराकडून मिळवली. शिवाय लढाईच्या प्रसंगी पराभवाच्या वेळी शंकरांनी साहाय्य करायचे हे देखील ठरले. शंकरांनी त्याला नवनाथ कडे पाठवले आणि सर्व शस्त्र विद्या शिकून घेण्यास सांगितले.
त्यानुसार बाहुबली ने घोर तपश्चर्या करून नवनाथ कडून कवित्व शिकून घेतले. म्हणजेच शस्त्र विद्या शिकून घेतली. मच्छिंद्रनाथांनी आपल्या सर्व नाथांसह युद्धामध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले कारण शेवटी प्रश्न वसुंधरेला वाचवण्याचा होता.
पाहता -पाहता वादळा प्रमाणे थानोस अख्ख्या माहिष्मती नगरी वरती पसरला. त्याच्या नुसत्या हुंकाराने माहिष्मती हलू लागली. अजून तरी त्याने कोणतेही ही शस्त्र वापरले नव्हते किंवा त्याच्याकडील इन्फिनिटी स्टोनचा वापर केला नव्हता. वेळ मोठी आणीबाणीची होती कोणत्याही सैनिकाचा, बंदुकीचा, हत्याराचा उपयोग होत नव्हता तो प्रचंड आवाढव्य राक्षस सगळी नगरी व्यापून राहिला होता. आणि हकनाक त्याचे सैन्य मरत होते. काहीतरी करणे खूप गरजेचे होते आणि शेवटी सुरू झाली एक प्रचंड लढाई, बाहुबली ने थानोसला आवाहन केले. तू माझ्या राज्यांमध्ये न लढता माझ्यासोबत ब्रह्मांडामध्ये लढाई कर येथे मला माझ्या नगरीचे आणि माझ्या लोकांचे नुकसान करायचे नाही. जर मी हरलो तर येथील सर्व माणसे मारू शकतो. शेवटी अवकाशाच्या पोकळीत दोघांची लढाई सुरू झाली ही लढाई शस्त्राची नसून अस्त्राची होती. थानोस ने पहिला टाइम स्टोन वापरण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून तो बाहुबलीला पाठीमागे नेऊन नष्ट करेल परंतु बाहुबली ने ताबडतोब स्तंभन मंत्र म्हटला त्याबरोबर तो जागच्या जागी स्थिर झाला.. फ्रीज झाला. अर्थात ही अवस्था काही काळ टिकणार होती थानोस च्या शक्तीपुढे स्तंभन मंत्र फार काळ टिकणार नव्हता.
नंतर त्याने माइंड इन्फिनिटी स्टोन वापरला जेणेकरून बाहुबलीच्या मनाचा ताबा घेता येईल काही काळ तो यशस्वी झाला बाहुबलीला काहीच सुचत नव्हते परंतु थोड्याच वेळात मच्छिंद्रनाथांनी बाहुबलीच्या कानामध्ये " अलख निरंजन" म्हणून जोरदार पुकारा केला, जेणेकरून बाहुबली पटकन सावध झाला आणि त्याने वातास्त्र प्रेरित केले. एवढा मोठा थानोस एखाद्या गवताच्या पात्याप्रमाणे अवकाशाच्या पोकळीत भरकटू लागला. परंतु तो काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता त्याने पुन्हा सोल इन्फिनिटी स्टोन वापरला. त्याने बाहुबलीचा आत्मा कैद करण्याचा प्रयत्न केला, आता जर बाहुबलीचा आत्मा कैद झाला असता तर सगळी लढाई एका सेकंदात संपली असती. पण त्याला गोरक्षनाथांनी मदत केली . नाथांनी एखाद्या मेघगर्जना प्रमाणे गायत्री मंत्र म्हणण्यास सुरुवात केली "ओम भु भुवा स्वाहा स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात" आणि आदित्य अस्त्र प्रगट केले. एकाच वेळी लाखो भुंगे गुंगुन गुंगुन आवाज करीत यावेत तसे एकाच वेळी बारा सूर्य उगवले. ते सगळे सूर्य फक्त थानोस वरती उष्णता टाकू लागले .त्यामुळे त्याची आठ इंच थर असणारी आणि कोणताही परिणाम न होणारी कातडी विरघळू लागली. एखाद्या मेणाप्रमाणे त्याची कातडी विरघळू लागली, अंगावर लोंबू लागली. त्याच्या हाताचा इन्फिनिटी स्टोन वाला पंजा केव्हाच गळून गेला. हजारो विजा कडकडाट कराव्या असा आवाज सगळ्या ब्रम्हांडात होता. हळूहळू थानोसची सगळी कातडी विरघळून जाऊन आतील मास लोंबू लागले, तरीपण त्याची शक्ती कमी होत नव्हती .तो जोरजोराने ओरडत होता परंतु आता शेवटचा ठोका टाकणे गरजेचे होते. त्यानुसार शंकरांनी त्याला अग्निअस्त्र दिले होते. त्याने प्रार्थना करताच ते अग्नीअस्त्र शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून प्रगट झाले आणि थानोसवरती झेपावले आणि त्याच्या रक्त, हाड, मास सगळ्या गोष्टींना स्वतःमध्ये सामावून घेऊन स्वाहा करू लागले.
एका प्रचंड राक्षसाचा नायनाट झाला. आपली वसुंधरा आपला भारत देश सुरक्षित झाला.
नवनाथ गुप्तपणे आपल्या जागी निघून गेले. शंकरांनी पुन्हा एकदा आपला वरदहस्त बाहुबलीच्या मस्तकावर ठेवून आशीर्वाद दिला. आणि शंकर देखील कैलासा वरती गेले. खाली माहिष्मती मधील प्रजाजन बाहुबलीच्या येण्याची आस लावून बसले होते .कारण तिथे काय घडते यांना काही दिसत नव्हते, कळत नव्हते. परंतु दमलेला थकलेला त्यांचा नायक जेव्हा पुन्हा माहिष्मती मध्ये अवतरला तेव्हा प्रजा जनानी जय जयकार केला आणि अख्ख्या ब्रह्मांडामध्ये कोणालाही न आटोपलेला एक राक्षस बाहुबलीच्या हातून नष्ट झाला.