अशीही एक परीक्षा
अशीही एक परीक्षा
आज ऑफिसचा पहिलाच दिवस त्यामुळे अक्षिणी पटकन तयार होवून अगदी वेळेत ऑफिसमध्ये पोहोचली. तिचे राहणीमान अगदी पहिल्यापासूनच व्यवस्थित असायचे . त्यात ती जात्याच हुशार, आणि कामात तत्पर अशी होती. ऑफिसमध्ये आल्यावर कामाचे स्वरूप समजावून घेवून तिने कामाला सुरवात केली . दिलेले काम वेळेत पूर्ण करून , त्यावर पुन्हा एकदा नजर टाकत सगळं व्यवस्थित असल्याची खात्री करून घेत तिने बॉसला सगळ्या फाईल नेवून दिल्या . बॉसने सगळं चेक केलं . तिची कामात असणारी तत्परता आणि व्यवस्थितपणा पाहून ते तिच्या कामावर अतिशय खुश झाले .
लंच ब्रेक नंतर तिने कामाला सुरवात केली . संध्याकाळी सहा वाजता तिचे काम संपले तशी ती तिचा पीसी ऑफ करून कामाचे अपडेट्स बॉसला देवून निघाली .
काही दिवसात ऑफिसमध्ये ती छान रुळली , मनमिळावू स्वभावाने अनेक मित्र मैत्रिणी सुध्दा जोडले . बॉस सुध्दा तिच्या कामावर खुश होते . ऑफिसमधले वातावरण अगदी खेळीमेळीचे होते .त्यांचे बॉस कामाबद्दल खुप कडक होते , ते कोणाच्याही चुकीचे समर्थन करत नसायचे . चुकणाऱ्याला शिक्षा असायची पण तेवढेच नंतर सांभाळून पण घ्यायचे . पण त्यांची कामाबद्दल आणि इतर आयुष्याबद्दल काही ठाम मत होते ,त्याबद्दल मात्र ते कमालीचे शिस्तप्रिय होते .
अक्षिणीला ऑफिस जॉईन करून आता जवळपास तीन महिने होत आले होते . बॉस तिच्या कामावर आणि एकूणच तिच्या हुषारीवर खूपच खुश होते . थोड्याच अवधीत तिने बोस सहित सगळ्यांचे मन जिंकले होते .
एकदा मनाशी काही ठाम निश्चय करून ती अगदी आत्मविश्वासाने बॉसच्या केबिनमध्ये नॉक करून गेली .
बॉस लॅपटॉप वर काही तरी काम करत होते . ती आत आल्यावर तिला बसायला सांगत स्वतःचे काम संपवले आणि पीसी ऑफ करून तिला म्हणाले ,
" बोला अक्षिणी काय काम आहे ? "
" सर , मला इथे येवून चार महिने झाले आहेत .तुम्हाला माझे काम कसे वाटते आहे ? " अक्षिणी म्हणाली .
सर तिच्यावर खुप इंप्रेस झाले होते , ते म्हणाले ,
" तुम्ही एक हार्ड वर्कर आहात , आणि मला अभिमान आहे की तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आहे . हल्लीच्या मुली कामाला प्राधान्य न देता इतर मौजमजेसाठी ऑफिस जॉईन करतात . पैसा कमावणे म्हणजे फक्त स्वतःची गरज पूर्ण करणे एवढंच हल्लीच्या मुलामुलींना वाटते , पण तुमचे या बद्दलचे विचार खुप वेगळे आहेत याची मला चांगली खात्री पटली आहे. मला तुमच्या पालकांना मनापासून धन्यवाद द्यावासा वाटतो कारण त्यांनी तुमच्यावर खुप चांगले संस्कार केले आहेत ." सर तिची प्रशंसा करत होते . मधेच थांबत ते म्हणाले ,
" पण आज तुम्ही असे का विचारत आहात ? "
अक्षिणी हलकं हसत म्हणाली , " सर तुमचं मत माझ्याबद्दल काय आहे हे जाणून घ्यायचं होतं मला ."
सर म्हणाले , " पण का ? "
अक्षिणी म्हणाली , " सर मी एक विचारू ? म्हणजे मला हे विचारण्याचा काही एक अधिकार नाही पण तरीही मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे ."
सर म्हणाले , " अगदी निसंकोच विचारा ."
अक्षिणी एक दीर्घ श्वास घेत म्हणाली , " सर माझ्यासारखी तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी तुम्हाला सून म्हणून चालेल ? "
सर अवाक् होत तिच्याकडे पहात म्हणाले , " तुम्ही काय बोलता आहात समजतंय का तुम्हाला ? तुम्ही चांगल्या आहे , स्वतःच्या कामाशी प्रामाणिक आहेत हे सर्व ठीक आहे पण तुम्ही तुमची मर्यादा क्रॉस करत आहात . "
बॉस चिडले तशी अक्षिणी थोडी घाबरली पण पुन्हा आत्मविश्वासाने त्यांना म्हणाली , " सर मला माफ करा , मी लहान तोंडी मोठा घास घेतला . पण मला माझे काही प्रश्न पडले आहेत आणि त्याची उत्तरे तुम्ही देवू शकता म्हणून मी तुम्हाला हे विचारत आहे . "
बॉस थोडे शांत झाले , " तुम्ही त्या घरासाठी खरंच अगदी योग्य असाल, तुमच्यासारखी सर्वगुण संपन्न सून कोणाला आवडणार नाही . ज्या घरात लग्न करून जाल त्या घरातली माणसे खुप नशिबवान असतील ."
अक्षिणी त्यांना थँक्यू म्हणत उठून बाहेर आली .तिचा चेहरा खुलला होता , बाहेर येवून तिने पटकन एक फोन फिरवला . फोनवर दुसऱ्या दिवशी ३ वाजता नक्की ये म्हणत तिने फोन ठेवला .
दुसऱ्या दिवशी पार्थ २ वाजता ऑफिसमध्ये आला . अक्षिणीकडे बघत तो बॉसच्या केबिनमध्ये गेला .
अक्षिणी मनामध्ये देवाला प्रार्थना करत होती की सारे काही ठीक होवू दे .
जरावेळाने तिला प्यूनने , " सरांनी केबिन मध्ये बोलावले आहे . " असे सांगितले .
देवाला हात जोडत केबिनचा दरवाजा उघडत ती सरांना म्हणाली , " मी आत येवू का ? "
" हो , या आत ." सरांचा रागीट आवाज कानावर पडताच ती मनातून घाबरली .
सर म्हणाले , " आता बोल पार्थ , आता तू जे काही बोललास ते सगळं खरं आहे ? "
पार्थ अक्षिणी कडे बघत म्हणाला , " हो बाबा , मी आणि अक्षिणी एकमेकांना कॉलेज मध्ये असल्यापासून ओळखत आहोत . आम्हाला लग्न करायचे आहे . पण अक्षिणी वेगळ्या जातीची आहे आणि तुम्ही या लग्नाला कधीच परवानगी देणार नाही हे आम्हाला माहीत होतं . जातीपेक्षा माणसाचे गुण जास्त महत्वाचे असतात हे तुम्हाला पटवून देण्यासाठी अक्षिणी नेच इथे जॉब करण्याचा प्लॅन केला . तुमची हल्लीच्या पिढी बद्दल असणारी विचारसरणी प्रत्येक मुलांना लागू पडत नाही हे सुध्दा तुम्हाला दाखवून द्यायचे होते . अजून एक महत्वाचे सांगायचे म्हणजे अक्षिणीला जॉब करायची काहीच गरज नाही बाबा , तिचे वडील एका मोठ्या कंपनीचे मालक आहेत . ती त्यांची एकटीच मुलगी आहे . मोठ्या घरची सगळीच मुले बिघडलेली नसतात हेही तुम्हाला दाखवून द्यायचे होते . आम्ही जे काही करत होतो याची सगळी माहिती तिच्या बाबांना आहे , त्यांनीच आम्हाला प्रोत्साहन दिले .
मी जर तुम्हाला आधीच आमच्या नात्याबद्दल सांगितले असते तर तुम्ही आमचे लग्न कधीच होवू दिले नसते , म्हणून आधी तुमच्या मनात आपले स्थान निर्माण करून मग अक्षिणी तुमच्या समोर तुमची सून म्हणून येणार होती . काल तिने तुम्हाला विचारले की तिच्याबद्दल तुमचे काय मत आहे ? तेव्हा तुम्ही जे बोललात त्यावरून मग आम्ही ठरवले की आता हीच योग्य वेळ आहे तुम्हाला आमच्या नात्याबद्दल सांगायला . "
पार्थचे बाबा मुलाचे बोलणे शांतपणे ऐकत होते .त्यांना मुलांनी केलेला प्रामाणिक प्रयत्न खुप आवडला .त्यांना अक्षिणी मनापासून आवडली . हल्लीच्या पिढी बद्दल असणारी त्यांची धारणा या दोघांनी बदलून टाकली होती . सगळीच मुलं वाया गेलेली नसतात याची त्यांना या दोघांना बघून खात्री पटली.
तरीही खोट्या रागाचे नाटक करत ये अक्षिणीला म्हणाले ," तुम्ही जे काही केले आहे यात तुझे वडील सुध्दा सामील आहेत , त्यामुळे मला पहिला जाब त्यांनाच विचारावा लागेल , त्यांना सांग मला त्यांना उद्याच्या उद्या लगेच भेटायचे आहे ."
अक्षिणी घाबरत त्यांना हो म्हणाली . त्यांनी दोघांना बाहेर जायला सांगितले .सरांनी मग घरी बायकोला फोन करून सांगितले की ," पार्थ साठी आपण उद्या मुलगी बघायला जाणार आहोत . "

