अपने निशाॅं छोड़ते जाओ...
अपने निशाॅं छोड़ते जाओ...
मंजी हुई राह पर चलते है सारे
राह कोई नई सी तुम खोज लाओ..
तोड़के परम्पराओं की जंजीरे पुरानी
नई राह पर अपने निशाॅं छोड़ते जाओ..!
माझे बाबा अतिशय विद्यार्थी प्रिय शिक्षक होते.विद्यार्थ्यांना शैक्षणिक किंवा इतर कोणतीही अडचण येऊ दे ,ते मदतीस सदैव तत्पर असायचे. अशा गरजू ,होतकरू विद्यार्थ्यांसाठी आमच्या घराचे दरवाजे सदैव खुले असायचे. काही त्यांचे विद्यार्थी नसलेले पण साहित्याचा व्यासंग असणारे सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनासाठी सतत आमच्या घरी येत जात असायचे. आमचं घर म्हणजे एक चालतं बोलतं शैक्षणिक केंद्र च वाटायचं मला तेव्हा..!
अगदी लहानपणापासूनच मी हे चित्र सतत च अनुभवत आलेली. अशा बऱ्याच जणांपैकी काही नेहमी संपर्कात राहिली,काही त्यांचा कार्यभाग पूर्ण झाल्यावर इप्सित ध्येय घेऊन मार्गस्थ झाली. काहींनी हे ऋणानुबंध मानलेल्या नात्यात परिवर्तित केले तर काही काळाच्या ओघात विस्मृतीत गेले.
अशाच माझ्या जाणत्या वयात त्यांच्या जुळलेल्या विद्यार्थ्यांपैकी ती माझ्या कायमच लक्षात राहिली.
असीमा ( बदललेलं नाव) अगदी पहिल्यांदाच मी जेव्हा तिला पाहिलं तेव्हाच ती माझ्या मनात घर करून गेली होती. त्या आधी मी जेव्हा सुट्यांमध्ये यायची तेव्हा पण माझ्या बाबांच्या तोंडून मी तिचं फारच कौतुक ऐकलं होतं. त्यांचे असे बरेच हुशार विद्यार्थी विद्यार्थीनी मी सुद्धा जवळून अनुभवलेले.पण तिची बातच काही और होती .
असीमा माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी लहान असलेली.
एक दोन वर्ष आधीच त्यांचं कुटुंबीय आमच्या गावात राहायला आलेलं. त्याआधी दुसऱ्या गावात तिच्या बाबांची नोकरी असल्याने तिचे वास्तव्य होते.
असिमा एका मुस्लिम धर्मीय कुटुंबातील मुलगी. वडील प्राथमिक शिक्षक. तीन बहिणी आणि दोन भाऊ अशी व्याप्ती असलेलं ते कुटुंब. ह्या पाचही भावंडांमध्ये हीचा नंबर तिसरा. मोठी बहीण,तिच्या पाठचा भाऊ मग ही मग हिच्या पाठची बहिण आणि सर्वात लहान एक भाऊ .
सगळी भावंडं अतिशय हुशार. मोठी आर्ट्स मधे युनिव्हर्सिटी मध्ये गोल्ड मेडालिस्ट ! तिच्या पाठचा भाऊ सुद्धा अतिशय हुशार पण जेव्हा तो छोटा होता तेव्हा तो शाळेत च जायला तयार होईना. त्याच्या एका वर्षा पाठची असीमा ! ती जेव्हा शाळेत जायला लागली तेव्हा कुठे तिच्या ओढीने तो शाळेत जायला लागला.तिच्याच सोबत राहणार, तिच्याच सोबत जाणार, तिच्याच सोबत येणार..! त्याचं वागणं बघून सगळ्यांना असं वाटायचं की ती त्याची मोठी बहीण आहे अन् तो तिचा धाकटा भाऊ. त्यामुळेच बारावी पर्यंत तो मोठा असूनही दोघे एकाच वर्गात शिकले.
अकरावी अन् बारावीत शिकतांना त्या दोघांनाही माझ्या बाबांनी शिकवलं. तो तर हुशार होताच पण ती वादातीत हुशार होती.ती अगदी चौफेर व्यक्तिमत्वाची होती. ती अभ्यासात जेवढी हुशार होती तेवढीच भाषण, वादविवाद स्पर्धा यामध्येही ती अग्रेसर असायची. तिची स्वतंत्र मतं, तिची बोलण्याची ढब,तिची विचार करण्याची पद्धत, तिला असलेली साहित्याची उत्तम जाण अन् यावर कडी म्हणजे उंच पुर्ण गोरेपान सुंदर असं तिचं व्यक्तिमत्व! अगदी पहिल्याच भेटीत तिच्या व्यक्तिमत्वाची छाप समोरच्यावर पडायची च! मुस्लिम धर्मीय असली तरी आई बाबांनी सर्व लेकींना वैचारिक दृष्ट्या अतिशय समृद्ध केलं होतं अन् तेच वैचारिक समृद्ध पण तिच्या व्यक्तिमत्त्वात पदोपदी झळकायचे.
तिच्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळे ती नकळतच माझ्या बाबांची लाडकी विद्यार्थीनी बनली होती. बाकी इतर शिक्षकांना ती प्रवाहाविरुद्ध पोहणारी वाटायची पण माझ्या बाबांची ती अतिशय लाडकी होती.अन् त्यांच्या रुपात तिला सुद्धा तिच्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारा शिक्षक गवसला होता त्यामुळे ती सुद्धा त्यांचा नितांत आदर करत होती.
बारावीला दोघही भावंडांना उत्तम मार्क्स मिळाले होते. त्यानुसार दोघांनाही त्यांच्या PCB ग्रुप च्या पर्सेंटेज नुसार एमबीबीएस ला एडमिशन मिळणं सहज शक्य होतं. पण आपल्या बाबांची आर्थिक परिस्थिती तेव्हढी सबळ नाही याची जाण असलेली ती स्वतः हून मागे झाली होती अन् भावाला मेडिकल फील्ड ला पाठवून स्वतः मात्र लवकर नोकरी मिळते ही जाणीव ठेवून डी एड करायला राजी झाली होती.
तीन वर्षात ती डी एड झाली. पुढे नोकरी मिळायला जो अवकाश होता त्या कालावधी मधे डायरेक्ट सेकंड इअर ला एडमिशन घेऊन तीने BA करून घेतलं. या दोन वर्षांच्या काळात तिच्या वकृत्वाने आणि व्यक्तिमत्त्वाने तिने कॉलेज अक्षरशः दणाणून सोडले होते. किती तरी वकृत्व आणि साहित्य स्पर्धेच्या ट्रॉफी या काळात तिने कॉलेज ला मिळवून दिल्या होत्या. माझी आणि तिची ओळख याच काळात झाली. तेव्हा खरं तर ती माझ्या बाबांची विद्यार्थीनी नव्हती पण अशा कुठल्याही साहित्य स्पर्धा असल्या की माझ्या बाबांचे मार्गदर्शन घ्यायला ती आवर्जून यायची. याच दरम्यान आमची मैत्री झाली अन् एकमेकींच्या व्यक्तिमत्वाला आम्हाला जाणून घेता आले.
तिचे सौंदर्य ,तिच्या चेहऱ्यावर असलेले बुद्धिमत्तेचे तेज, तिची वैचारिक प्रगल्भता यामुळे मी पण अक्षरशः भारावून गेली होती अन् मलाही तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची भुरळ पडली होती.
याच काळात तिने स्वतः छोटे छोटे कॉम्प्युटर कोर्स शिकून घेतले . त्याचं बेसिस वर तिने इतर कॅफे मधे जॉब करून वडिलांच्या आर्थिक परिस्थिती ला हातभार लावायचा प्रयत्न केला.
अशातच मोठ्या बहिणीचे लग्न झाले आणि वडिलांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यातच त्यांचे निधन झाले.
काही दिवसांनी तिला डी एड च्या बेसिस वर प्रायमरी शिक्षिकेची नोकरी लागली. भावाचे एमबीबीएस चे फायनल इअर पूर्ण होईस्तोवर तिने नोकरी केली अन् एका क्षणी तिने ती नोकरी सोडून दिली.
सगळ्यांनी अक्षरशः तिला वेड्यात काढले." इकडे लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत अन् तू चक्क नोकरी लाथाडली???" सगळ्यांचा तिला असलेला प्रश्न!
ती माझ्या बाबांना भेटायला आली तेव्हा बाबांनी तिला विचारले.." असीमा एकतर तू डी एड करावं हे मला पटलं च नव्हतं. परिस्थिती मुळे एका हुशार मुलीची माती झाली याचं दुःख मला नेहमीच सलायचं. पण आता नोकरी लागली असतांना तू कां सोडली बेटा?"
" सर, खरं सांगू का, शिक्षकी पेशा बद्दल मला आदर च आहे पण या नोकरीत मी कधी रमलीच नाही. माझ्या व्यक्तिमत्वाला इथे न्याय भेटू शकत नाही त्याचा कोंडमारा होतो याची जाणीव मला इथे सदैव व्हायची . एवढे दिवस खूप विचार केला पण जेव्हा मनाचा हा कोंडमारा मला असह्य झाला त्यावेळी मी हा निर्णय घेतला."
" सर ,मी ही नोकरी सोडली पण तुम्हाला मी चांगलेच काहीतरी करून दाखवेन सर. तुमची विद्यार्थीनी म्हणून तुम्हाला माझा नेहमीच अभिमान वाटेल." म्हणत माझ्या बाबांच्या पाया पडून ती गेली.
त्यांचा सुद्धा तिच्यावर पूर्ण विश्वास होता.
पुढे तिने बहिणीच्या घरी राहून एलएलबी पूर्ण केले. खूप मेहनत घेतली. त्या फील्ड च्या सगळ्या परीक्षा दिल्या.
एक दिवस बाबांना ती बस मध्ये दिसली. सोबतीला एक उमदा हँडसम तरुण. ही इथे अशी कोणासोबत?? हा त्यांना सुद्धा पडलेला प्रश्न!
पुढच्या स्टॉप वर ते दिसताच तिने सोबतच्या मुलाशी बाबांची होणारे जावई म्हणून ओळख करून दिली. सेशन कोर्ट ला तो नुकताच जज म्हणून रुजू झाला होता.
काही दिवसांनी ती घरी पुन्हा पेढे घेऊन बाबांना नमस्कार करायला आली होती कारण तिची सुद्धा सेशन कोर्ट ला जज म्हणून नियुक्ती ची ऑर्डर आली होती.
तिच्या आवडीचे क्षेत्र मिळताच ती अजून यशाच्या शिड्या चढत चढत अजून प्रगती पथावर गेली होती. आज एका मोठ्या शहरात ती जज म्हणून कार्यरत आहे.
एवढेच नाही तर लग्नाच्या आधी तिने नवऱ्याला मी माझ्या माहेरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार याची आधीच कल्पना दिली होती. अन् त्या उमद्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीने तिच्या सगळ्याच अटींना मान्यता दिली होती.
लग्ना नंतर सुद्धा तिने तिच्या लहान भावाचे शिक्षण तर पूर्ण केलेच होते पण जो भाऊ एमबीबीएस करून नोकरी करत होता त्याला एम डी करण्यासाठी प्रोत्साहित करून त्याच्या पदव्युत्तर शिक्षणाचा सगळा भार पुन्हा तिनेच उचलला होता.
आजच्या काळात सुद्धा मुलगी जन्माला आली म्हणून लोकं दुःख व्यक्त करतात तिथे या अद्वितीय कन्येने कर्तृत्व अन् कर्तव्याचा नवा पायंडा पाडला होता.
खरं तर असिमाा ला डी एड केल्यानंतर नोकरी लागली होतीच. तिच्या जागी दुसरी असती तर त्याच मळलेल्या पायवाटेवर चालत तिने तिचं नोकरी करत रहाणं पसंत केलं असतं. पण आसिमा सारखी व्यक्तिमत्व त्या चाकोरीबद्ध वाटेवर न चालता आपला नवा मार्ग चोखाळत असतात अन् त्या रस्त्यांवर आपल्या व्यक्तिमत्वाची अन् कर्तृत्वाची अमीट छाप सोडत इतरांना सुद्धा प्रेरणा देत असतात.
मंजी हुई राह पर चलते है सारे
राह कोई नई सी तुम हमे बतलाओ..
तोड़के रिवाजोंकी जंजीरे पुरानी
नई राह पर अपने निशाॅं छोड़ते जाओ..!
