अनुरूप
अनुरूप


काही दिवसांपूर्वी whatsapp वर एक फोटो बघितला होता . एका सावळ्या रंगाच्या मुलाची बायको दिसायला अतिशय सुंदर होती.
फोटोखाली लिहिलं होतं "लंगूर के हाथ अंगूर " ...
क्षणभर ते शीर्षक वाचून हसू आलं पण क्षणभरच ...
कारण पुढचा बराच वेळ "स्त्री आपल्या जोडीदारात नेमकं काय पहाते?" या प्रश्नाच्या उत्तराने डोकं भंडावून गेलं आणि एकदम व.पु. काळे यांची एक कथा आठवली .
"एका अतिशय सुंदर स्त्रीचं लग्न एका कोळशासारख्या काळ्या माणसाशी होतं . कथेच्या नायकाला हे माहित नसल्याने तो "हिला सहज पटवता येईल या भावनेने तिच्यावर आपले पाश फेकायला सुरुवात करतो. त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती त्याला प्रतिसादही देते . एका मोहाच्या क्षणी एकमेकांच्या जवळ आल्यावर अचानकपणे त्याचच धैर्य खचू लागतं . त्या वेळी नायकाला उत्तर देताना ती स्त्री म्हणते, "सगळ्यांना माझ्या या सुंदर शरीराची इच्छा आहे, होती. पण डोंगरावरून पडल्यावर एका झाडाला लटकत असताना बाकी सगळे पुरुष जिवाच्या भितीने केवळ बघ्याची भूमिका घेऊन उभे होते, त्यावेळी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मला वाचवायला हा माणूस आला होता .
तेव्हाच ठरवलं आणि यांची निवड केली.
असो.
"तुला तुझं उत्तर मिळालं असेलच त्यामुळे तू जाऊ शकतोस." आणि नायक तिथून दिनवाण्या मुद्रेने निघून जातो. असा त्या कथेचा सारांश होता.
आज हा फोटो बघून एकच साक्षात्कार झाला तो म्हणजे, सौंदर्यावर भाळणारे कैक आहेत /होते /होतील, पण खुद्द सौंदर्य ज्याच्यावर भाळेल तो खरा सौंदर्यवान. कारण सगळीच सुंदरता रंग, रूपावर मोजता येत नाही."