अन्तोन
अन्तोन


अन्तोन
मूळ लेखिका - नीना गोर्लानोवा
अनुवाद: आकेळ्ळा चारुमति रामदास
दुसरीतल्या अन्तोन ने मे महिन्यांत तिसर्या वर्गासाठी आऊटलाइन नकाशे विकत आणले, कारण की रईसा कोंस्तांतिनोव्नाने म्हटलं होतं, “मी पैजेवर सांगू शकते की तुमच्यापैकी बरीचशी मुलं गल्ल्या-बोळांमधे हिंडत राहतील पण आऊटलाइन मैप्स कांही घेणार नाहीत.”
आईने अन्तोनकडे हे मैप्स पाहिले आणि उद्गारली:
”अरे देवा! कित्ती आवडायचं मला हे आऊटलाइन मैप्स भरणं! बरं तर बरं की मुलं आहेत, नाहीतर मी आपले बालपण कधीच आठवूं शकले नसते: तास न् तास मी ते भरंत बसायचे...”
अन्तोनला कळले की आता मम्माची भावुक व्हायची वेळ आली आहे.
“आज मला दुर्री1 मिळालीय – गणितात!” त्याने आनन्दाने सांगितले.
“एकदा मला सुद्धा दुर्री मिळाली होती. ओह, कित्ती मळली आहे तुझी हाफपैंट!” मम्मा ने विषय बदलला.
“हे पी.टी. त झालंय.”
“पी.टी.त काय झालं?”
“कोलांट्या मारत होतो.”
“चल, पट्कन् तुझी पी.टी.च्या रंगाची हाफपैंट काढ आणि धुवून टाक!” पप्पाने म्हटले आणि जणु काही झालंच नाही अशा आविर्भावात बहिणींना कविता वाचून दाखवंत राहिले.
ते रोज़ संध्याकाळी कविता किंवा गोष्टी वाचायचे, आणि आज सुद्धा कोणती तरी “एटोमिक परीकथा” वाचंत होते – बेडकी बद्दल आणि इवानूश्काबद्दल, पण किचनमधून अन्तोनला स्पष्ट ऐकू नव्हतं येत. त्याने हाफपैंट जवळंच पडलेल्या टब मध्ये भिजत टाकली आणि गोष्ट ऐकण्यासाठी बाहेर आला.
“....फाडलं तिचं राजेशाही पांढरं शरीर
आणि प्रवाहित केला विजेचा करंट
आणि खूप-खूप पीडेने मरंत होती ती,
प्रत्येक नस थडथडंत होती जीवनाने,
आणि ओळखीचं हसू
उमटलं होतं मूर्खाच्या प्रसन्न चेहर्यावर...”
सोनेच्का म्हणाली:
त्याने एका बेडकाला बघितलं तर थोडा जास्त हुशार झाला. आणखी एका बेडकाला बघितलं – आणखी हुशार झाला. पण मग विजेचा करंट कशासाठी पाठवायचा? वेडपट कुठला...”
”पहिल्या वर्गासाठी हा चांगला तर्क आहे,” पप्पा म्हणाले.
अन्तोनला समजलं की गणिताची गोष्ट पुन्हां सुरू करता येईल.
“आणि सायकल ने पण हुशार होतात हं! त्याने गणितात हुशार होतात – मी असं वाचलं होतं.”
“ते ठीक आहे, पण तुला तर छक्की मिळते नं...गणितात, आणि रईसा कोंस्तांतिनोव्ना फक्त सर्वात हुशार मुलांनाच छक्की देते!”
“हो S S S, पण आज मला दुर्री मिळाली आहे!”
मम्माला पट्कन त्याचा डाव लक्षांत आला, ती ओरडली:
“ डिप्लोमैट! त्याच्याकडे बघा ज़रा! त्याने मुद्दामंच दुर्री मिळवली आहे, म्हणजे त्याला सायकल मागतां येईल! डिप्लोमैट कुठला, आणि मला स्वतःसाठी एक पर्ससुद्धां विकंत घेता येत नाहीय, बघा, मी कसला पर्स घेऊन फिरतेय!” आणि तिने आपला पर्स झटकला, ज्यातून खूप चिट्ठ्या निघाल्या तपासणीबद्दल आणि एम्बुलेन्स पाठविण्याबद्दल (मम्मा प्रत्येक चिट्ठीच्या उत्तरादाखंल “धन्यवाद” लिहून पाठवायची).
सोन्या त्या चिट्ठ्या गोळा करूं लागली आणि मम्माच्या बाजूने बोलूं लागली:
“हो! मम्मा असा पर्स घेऊन फिरते की माझ्या मैत्रिणीने न्यू इयरला तिला सांगितलं, ‘मी म्हातार्या शापोक्ल्याकसाठी सूट शिवते आहे – आणखी तुमचा पर्स शिवला की झालं!’ आणि तू सायकल, सायकल करतो आहे! ती खूप महाग असते.”
“ ‘किशोर’ इतकी महाग नसते. पण आजकल तर ती मिळतंच नाही,” दुसरी बहीण नताशा उद्गारली.
“आणि उन्हाळ्यांत तर माझे मित्रं नसतीलंच – ते सगळे आपापल्या सायकलींवर निघून जातील. माझे तर तसेच खूप कमी मित्रं आहेत,” आळसटलेल्या स्वरांत अन्तोन म्हणाला.
“मित्रं काही माश्या तर नाहीत नं कि झुंडीने गिरक्या खात बसतील,” पप्पानी मधेच त्याचे बोलणे थांबवले.
“पुन्हां एका आठवड्यासाठी भाड्याने घेऊन घेऊं,” मम्मा म्हणाली. “नाही तर : म्यूज़िक क्लास साठी पैसे भरतील – आई बाप! सायकल विकत घेतील – आई बाप! सगळं पाहिजे ह्यांना. आणि आम्हीं काय – दिवाळं काढायचं? मला चार मुलं आहेत, तुम्हां चौघांना मी सगळ्या वस्तू नाही पुरवू शकत...ताकत कुठाय माझ्यांत?”
“ओह, मम्मा, चौथं मूल जन्माला घालण्यापूर्वी कदाचित आपल्या ताकतीचा अन्दाज़ घ्यायला हवा होता!”
“आ S S ह! मला तर वाटंत होतं, असंच वाटंत होतं कि तू माझी मदत करशील! पण तू तर त्याऐवजी आपल्या खोड्यांनी मला वेड लावतो आहेस, डिप्लोमैट कुठला! चल, कांदे सोलायला मला मदत कर.”
“कांदे कशाला?”
“पिरोग 2 मधे घालायला – आणखी काय! मी आपली स्वयँपाकच करत असतेय, पूर्ण दिवसभर बस स्वयँपाकच करतेय, जेणे करून तुम्हा लोकांना खाऊ घालू शकूं, पुरेसं खायला मिळेल. बघ, ओव्हनमध्ये ऍपलचा पिरोग ठेवला आहे, त्याच्यानंतर फिशचा पिरोग ठेवीन. आणि तू आपल्या दुर्र्यांनी, आपल्या खोड्यांनी, आपल्या हावरटपणाने सारखा सतावत असतो. मी तुझ्या मैगज़ीन, ‘कॅक्टुसेनोक’ मधे लिहीन!”
‘कॅक्टुसेनोक’ सोन्याचं मैगज़ीन आहे. अंतोनचं आहे ‘गोर्चिच्निक ” पप्पा म्हणाले. ते पालकांच्या सगळ्या मीटिंग्समधे नियमितपणे जायचे.
” ‘गोर्चिच्निक’ आमचं आहे,” ह्याचं आहे ‘झाला’5”
“ ठीक आहे, मी ‘झाला’ मधे लिहीन,” आता शांतपणे मम्मा म्हणाली, हे बघून अंतोनने डोळ्यांवर चष्मा चढवला आणि दणादण कांद्या वर कांदे सोलू लागला.
“मॉस्को टाइम – रात्रिचे आठ वाजले आहेत,” रेडियोवर अनाऊन्सरने सांगितले.
अंतोन समजून चुकला की आता त्याला झोपायला पाठवतील, बहिणींना सुद्धां. इथे तर दहा वाजून गेलेत आणि मॉस्कोत फक्त आठ!. झोपायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने कांदे अगदी हळू-हळू सोलायला सुरुवात केली, सोलता-सोलता तो गाणं पण म्हणंत होत“
मॉस्को टाइम बसला आहे,
आपल्या शाही थाटांत
पोटांत पडला खड्डा,
आणि आम्हीं पळालो गैसजवळ.”
बहुधा त्याच्या कवितांची तारीफ व्हायची, पण आज मम्माला चीडंच आली:
“गैसजवळ, तू! झोपायची वेळ झाली रे झाली की तुला आठवतं खाणं, पिणं, वाचणं! मी तुला चांगली ओळखते – झोपायला जा, बस!”
“ओह, मला फक्त एक ऍपल दे, बस, मग मी झोपायला चालला जाईन.”
“अंतोन, जा बरं आधी! काही ऍपल-वॅपल नाही मिळणार,” पप्पा मधेच टपकले.
“ओह...बस, तुम्हीं सुद्धां! मी पण म्हातारपणी तुम्हांला ऍपल नाही देणार!” मुलगा ओरडला.
“एकदम बेशरम झाला आहेस!” मम्मा किंचाळली, “दुर्री आणली आहे – त्याच्याच डोक्यांत मारा ती दुर्री! डिप्लोमैट कुठला – आम्हांला उल्लू बनवायला निघाला होता! आणि वरून धमकी देतोय की म्हातारपणी ऍपल नाही देणार.”
“ओह, डियर, पुरे कर, तुझ्या ह्या आरड्या-ओरड्याचा मुलांवर काही देखील परिणाम होत नाहीय,” पप्पा मधेच टपकले.
“माझा आरडा-ओरडा – ठीक आहे; हा मला सतावतो – ठीक आहे: कदाचित् माझ्याकडूनंच काहीतरी चुकलं असावं. पण हा रईसा कोन्स्तांतिनोव्नाला कां सतावतोय आपल्या दुर्र्यांनी?”
“अंतोन, बस झालंय, आता जा झोपायला, आणि आम्हीं आमच्या म्हातारपणासाठी ऍपल्स साठवून ठेवूं.”
जेव्हाँ मुलं शांत झाली तेव्हाँ पप्पानी ऍपल्सच्या कार्ड-बोर्डच्या डब्यावर काळ्या स्केचपेनने मोठ्या-मोठ्या अक्षरांत लिहिलं: ऍपल्स, म्हातारपणासाठी! आणि सकाळी जेव्हाँ मुलं शाळेसाठी तयार होत होते पप्पा ह्या डब्याजवळ उभे राहून सफाईने ऍपल्सच्या फोडी करत होते, जवळच्याच दुसर्या डब्यावर त्या फोडी रचवून ठेवत होते आणि मम्माला विचारत होते कि त्यांना कसं वाळवणं जास्त चांगलं राहील – ओव्हनमधे की बाल्कनीत.
मुली ओरडल्या, “हा काय वेडेपणा आहे? ज़री अन्तोन ने ऍपल्स नाही दिले तरी त्या तर निश्चितंच देतील, आणि त्या तर तिघीजणी आहेत.” पण पप्पा म्हणाले “जीवन कसं वळण घेतं – सांगता येत नाही, जर मुली दुसर्या गावात असल्या तर? आणि अन्तोन तर ऍपल्स देणारच नाही....”
“मी तर नुसती गम्मत करत होतो!” अन्तोन पप्पांच्या हातातून चाकू हिसकावून घेत ओरडला; “मी तुम्हांला ऍपल्स, नासपाती, आलूबुखारे...अगदी सगळं-सगळं खाऊ घालेन!”
“कदाचित तू आता गम्मत करत असशील? कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा?”
“ओह, पप्पा!”
“काय, अन्तोशा?”
“पप्पा!”
“काय?”
” तो चाकू द्या ना!”
“नाही, नाही देणार,” पप्पा ऍपल्सच्या फोडी करतंच राहिले, पण आता मम्माने त्यांना लहान बाळाचा पाळणा हलवायला सांगितलं.
येवढ्यांत अन्तोनने ऍपल्स, म्हातारपणासाठी हे वाक्य स्केचपेन ने खोडून तिथे लिहिलं, “पप्पा, तुम्हीं ही सवय सोडून द्या – म्हातारपणासाठी ऍपल्स साठवण्याची!”
पप्पा किचनमधे परत आले आणि त्यांनी अन्तोनचे वाक्य खोडून पुन्हां पूर्वीचे वाक्य लिहून टाकले. अन्तोन रडू लागला.
“चला, त्याला क्षमा करूं या,” मम्माने म्हटले, “बघा, कित्ती मोठे-मोठे अश्रू ढाळतोय, अगदी ऍपल्स येवढे मोठे अश्रू.”
“त्या ऍपल्स सारखे जे म्हातारपणांत आपल्याला मिळणार नाहीत,” पप्पाने उत्तर दिलं आणि ते कामावर निघून गेले.
तेव्हां अन्तोनने ऍपल्सचे तुकडे तोंडात कोंबायला सुरुवात केली. इतके ऍपल्स खाणं काही सोपं नव्हतं – पोटांत गुडगुड व्हायला लागली. तरी सुद्धां त्याने सगळेच्या सगळे कापलेले ऍपल्स खाऊन टाकले, मग पप्पांनी लिहिलेला डब्बा फाडून टाकला आणि बहिणींच्या मागोमाग शाळेत पळाला.
वर्गात मुलांनी एकमेकांवर चुइंगम मारायचे ठरवले...ट्यूबमधे भरून-भरून. पण म्हातारपणासाठी साठवलेल्या ऍपल्स मुळे अन्तोनला मळमळंत होतं, म्हणून त्याने च्युइंगम नाही मारलं. वर्गात तिमोशिनने च्युइंगम फायर केला जो सरळ रईसा कोन्स्तातिनोव्नालाच जाऊन लागला. ती एका विचित्र आविर्भावात अगदी थिजून गेली: जणु काही पोलिसच्या समोर आत्मसमर्पण करतेय...हात वर, डोळे बाहेर निघालेले. जेव्हां ती अश्या पद्धतीने डोळे बाहेर काढते तेव्हां वर्गात अगदी चिडीचुप होऊन जाते.
“अन्तोन, इकडे ये!” रईसा कोन्स्तांतिनोव्नाने म्हटले, “मला पॅरेलिसिस झालाय, मी आपल्या जागेवरून हलू शकत नाहीय. माझ्यावतीने एक अर्ज लिही.”
अन्तोन ने हातात पेन धरला.
“अर्ज, शाळेच्या डाइरेक्टरला”, रईसा कोन्स्तांतिनोव्ना सांगू लागली, ‘मी विनन्ती करतेय की मला सेवामुक्त करण्यांत यावं, कारण की मुलं माझ्यावर आत्तांपर्यंत अज्ञात अशा हत्यारांनी हल्ला करतात.’ लिहिलं? आता हा अर्ज डाइरेक्टरकडॆ घेऊन जा!”
तशी रईसा कोन्स्तांतिनोव्ना गेल्या वर्षभरापासून निवृत्तीवरच होती, पण फक्त पालकांच्या विनंतीवर ती काम करंत होती. मुलांना कळून चुकलं की गोष्ट हाताबाहेर गेलीय. ते रडू लागले, काही मुलांनी रईसा कोन्स्तांतिनोव्नाला हाताने धरून ठेवले आणि वर्गातंच थांबण्यासाठी विनवूं लागले. तेव्हां तिने हळू हळू आपले हात खाली करायला सुरुवात केली, हळू हळू आपल्या खुर्चीवर बसू लागली.
“असं वाटतंय की पॅरेलिसिस संपलंय,” ती म्हणाली आणि लगेच कडक आवाजात म्हणाली, “आपल्या वह्या द्या!”
तास संपल्यावर तिमोशिन अन्तोनजवळ आला, “माझ्याकडे नवीन सायकल ‘कामा’ आहे!”
“सुखी रहा, पेन्शन मिळेपर्यंत,” आळसटलेल्या स्वरांत अन्तोनने उत्तर दिलं.
“तुला पाहिजे असल्यास मी तुला माझी जुनी ‘किशोर’ देऊं शकतो – गिफ्ट म्हणून?”
“पाहिजे! आणि मी...मी तुझ्या बर्थडेला अशी गिफ्ट देईन की बोटं चाटंत बसशील, पाठीवर बर्फ घरंगळायला लागेल, केस उभे राहतील!”
आणि पूर्ण दिवस अन्तोन शेपटासारखा तिमोशिनच्या मागे मागे फिरत राहिला – जणु ते अगदी जिवलग मित्र आहेत. तिमोशिन खूप खूश होता. तो अन्तोनला जोक सांगू लागला.
“एकदा जर्मन आणि रशियन राजा एकत्र जमले...”
पुढे अन्तोनने काहीही ऐकलं नाही, पण तरी सुद्धां तो मैत्रभावाने मंद मंद हसत होता (ह्यावरून सिद्ध होतं की तो खरोखरंच डिप्लोमैट होता: त्याला ह्या जोडगोळीसंबंधीची थाप पट्कन लक्षात आली – ‘राजा, जर्मन आणि रशियन’ – पण तो चुपचापच राहिला).
आणि बघा, तिमोशिन खरोखरंच संध्याकाळी अन्तोनच्या घरी सायकल घेऊन आला, आणि आपल्या पप्पांची सिफारिश सांगू लागला:
“जर सम्भाळून चालवली, तर खूप दिवस चालेल.”
अन्तोनला वाटलं होतं की बहिणी नेहमीप्रमाणे ‘आई-आई’ खेळतील आणि तो सायकलवर हिंडेल. पण बहिणींनासुद्धां सायकल चालवायची होती. आणि नताशातर खूपंच वेगात चालवंत होती आणि आपल्या मैत्रिणींनापण चालवूं देत होती; आणि सोन्यातर सारखी पडतंच होती. म्हणून सायकल फक्त तासभरांत मोडली. पण मम्माने प्रॉमिस केलं की ती कोल्या द्योमिनला बोलावून सायकल दुरुस्तीला देईल, कोल्याला सगळं येतं आणि तो सायकल दुरुस्त करून देईल. रात्रभर अन्तोनला सायकल-रेसचीच स्वप्नं पडत होती.
सकाळी शाळेत त्याने डेस्कवर आपल्या शेजारी बसणार्या मीशा ग्लाद्कोवला म्हटलं, “मला तिमोशिनने सायकल दिली आहे!”
“हो? चल, पेंशन पर्यंत आनन्दात रहा,” ग्लाद्कोवने उत्तर दिलं , पण तो स्वत: लगेच तिमोशिनला जाब विचारायला गेला. “मूर्खंच आहे मी – उगीचंच बढाया मारल्या,” अन्तोनने विचार केला. आणि त्याचा विचार बरोबरंच होता. दहाच मिनिटांत अन्तोनला ऐकू आलं,
“घे, तिमोशिन तुझ्याकडून परत घेऊन मला देणार आहे!”
“घेऊं दे! घे म्हणा आपली मोडकी-तोडकी सायकल! पाहिजे कुणाला असली सायकल!”
दिवसभर ग्लाद्कोव तिमोशिनच्या मागे-मागे त्याच्या जिवश्च-कंठश्च मित्राप्रमाणे फिरत होता; त्याचे जोक्स ऐकत होता; हसत होता आणि आपल्या रशियनच्या नोटबुकमधून त्याला कॉपी पण करू दिली.
मम्माने पट्कन ओळखलं की अन्तोन उदासवाणा होऊन परत आला आहे. ती म्हणाली, “लगेच कोल्या द्योमिनला फोन करते.
“काही गरज नाहीय. तिमोशिन तर आपली बाइक परत नेतो आहे, त्याने ग्लाद्कोवला गिफ्टमधे देण्याचं प्रॉमिस केलंय.”
“कां?”
“चूक माझीच होती. मी ग्लाद्कोवला सांगून टाकलं सायकलबद्दल आणि त्याने लगेच तिमोशिनकडून मागून घेतली.”
“ओह, फारंच डिप्लोमैट आहे हा तिमोशिन! आता वर्गात सायकलच्या जोरावर आपली पोज़िशन पक्की करायचा विचार आहे!”
आणि तेवढ्यांत दारावरची बेल वाजली – तिमोशिन आणि ग्लाद्कोव – सायकल साठी दत्त हज़र झाले.
“तू तुझ्या आई-वडिलांच्या परवानगीने नेतो आहेस न?” मम्माने विचारले.
तिमोशिनच्या चेहर्यावरून स्पष्ट दिसत होतं की त्याला असल्या अप्रिय गोष्टींबद्दल विचार करणं आवडंत नव्हतं, आणि त्याने त्यांच्याबद्दल काही उत्तरं पण तयार केली नव्हती.
“ए-ए, तुम्हीं काय म्हणताय?” त्याने उगीचंच वेळकाढू प्रश्न विचारला.
“मी असं म्हणतेय की आम्ही सायकल तर देऊं, पण तुला नाही, तुझ्या आई-वडिलांना देऊं. काल गिफ्ट देतात – आज परत मागून घेतात.”
” परत कोण मागतोय? आम्हीं तर फक्त चालवायला मागत होतो.”
“तर अशी गोष्ट आहे, मीशा?” अन्तोनच्या मम्माने विचारले.
मीशाने मालकी थाटांत सायकलचं हैण्डल धरलं, “मला तिमोशिनने ही सायकल गिफ्ट म्हणून दिली आहे. त्या ऐवजी मी त्याला आपले नोट्स कॉपी करू देतो.”
मुलं खाली पळाले, ऐकू येत होतं की तिमोशिन कसा मीशावर ओरडतोय, “ ओह, मी तुझ्या डोक्यावर इतक्या जोर्याने मारीन की दोन तास कोलांट्याच खात बसशील. सगळं सांगायची काय गरज होती? कां सांगितलंस? कां?”
आणि मम्मा तिमोशिनच्या घरी गेली.
तिमोशिनची मम्मी सलाद करत होती: वेजिटेबल कटरने गाजर किसंत होती, गार्लिक-प्रेसमधे लसूण वाटंत होती. चारीकडे बरेच फ्रूट-जूसर पडले होते. तिमोशिनची मम्मी हसून तिचं स्वागत करत म्हणाली, “मुलाच्या शाळेत लिहिलं आहे: ‘जास्त विटामिंस खा – सगळ्या पेंग्विंसहून लट्ठ व्हा.’ “
“मला वाटतं की तुमचा मुलगा लट्ठंच आहे,” अन्तोनच्या मम्माने म्हटलं. “तुम्हीं काय सायकल परत मागताय?”
“त्याने मला इतक्यातंच सांगितलं – आम्हाला तर काहीच नको होतं, पण जर त्याला मीशेन्काला द्यावीशी वाटतेय, तर ते तर कोर्टियर्स आहेत.”
“कोण आहेत?”
“कोर्टियर्स. एकाच कोर्टयार्डचे. बस, येवढीचं गोष्ट आहे तुम्हीं वाईट नका वाटून घेऊ. ते मुलंच तर आहेत.
“बरं, भेटूया!”” अन्तोनच्या मम्माने म्हटलं.
उन्हाळा चांगला गेला. त्यांने अन्तोनला लहान मुलांची लॉजिक-मशीन विकत घेऊन दिली आणि तो तिच्या मदतीने कधी आपल्या बहिणींचा स्वभाव ओळखायचा तर कधी मनांत असलेली संख्या ओळखायचा. तो मम्माला पण घरकामांत मदत करायचा, कारण की ती त्याच्या मदतीवर अवलंबून असायची. आणि ऑगस्टमधे त्याच्यासाठी एका आठवड्यासाठी सायकल भाड्याने घेतली होती..
एक सेप्टेम्बरला अन्तोन तिसर्या वर्गात गेला.
“मी तिमोशिनच्या घरी जाऊं कां? ” त्याने मम्माला विचारले.
“का S S S य?” मम्मा संतापली. “ तू त्याला क्षमा केलं?”
“मम्मा तूच तर शिकवलंय न कि आपल्या जवळ चांगुलपणापेक्षा जास्त काहीच नाही उरंत...आपण दयाळु असायला हवे...पृथ्वीवर अस्त्र-शस्त्र तर इतके झाले आहेत की दुसरा कोणतां पर्यायच नाहीय. वाईट मुलं तर मोठी होऊन युद्धंच सुरू करतील.”
“हुं, जर ह्या दृष्टीने पाहिलं तर....जा. पण मला विचारायचं होतं की त्याने तुला कोणत्याच वस्तूचं प्रॉमिस नाही केलं, म्हणजे एखाद्या गिफ्टचं?”
“त्याने आपले रुबिक क्यूब खेळायला द्यायचे प्रॉमिस केलं आहे. मी पण त्या ऐवजी काही न काही नक्कीच देईन. असं त्याने सांगितलयं.”
“डिप्लोमैट!” मम्मा उद्गारली, “मोठा झाल्यावर हा नक्कीच राजनेता होईल!”
अन्तोन ने उत्तर दिलं की असं होणं कठीण वाटतं, कारण की तिमोशिन अगदी चुकीचं लिहितो आणि त्याचे वाक्य पण वाईट असतात. येवढं बोलून तो तिमोशिनकडे गेला.
तिमोशिनच्या आईने मुलांना टरबूज खायला दिलं, पण आपल्या मुलाला टरबुजाचा अगदी मधला भाग दिला. अन्तोन म्हणाला, “आमचे पप्पा मुलांना कधीच मधला भाग नाही देतं. ते म्हणतात की जर मुलांना टरबुजाचा मधला भाग दिला तर त्यांना असे वाटेल की जीवन – टरबुजाच्या मधल्या भागासारखं आहे.”
“जर तुझे पप्पा इतके हुशार आहेत तर ते सायकल दुरुस्त कां नाही करूं शकंत?” तिमोशिनच्या मम्मीने उत्तर दिलं.
अन्तोन गप्पच बसला. तशी पण तिमोशिनने त्याला दुरुस्त केलेली सायकल परत दिली नव्हती.