Pandit Warade

Tragedy Action

4  

Pandit Warade

Tragedy Action

अनोखे प्रेम

अनोखे प्रेम

4 mins
279


     मथुरा! आईच्या प्रेमास मुकलेला एक अभागी जीव. एक वर्षाचा लहानसा भाऊ सांभाळण्यासाठी पाच वर्षे वयाच्या मथुरेच्या हाती सोपवून आईने इहलोकीची यात्रा संपवली. वडील सखाराम मोलमजुरी करून घर चालवायचे. दोन लेकरांना सांभाळतांना त्यांना तारेवरची कसरत करावी लागायची. त्यांच्या आणि लेकरांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी दुसऱ्या लग्नाचा आलेला प्रस्ताव केवळ सावत्र पणाचा त्रास लेकरांना होऊ नये, वडिलांचे प्रेम विभागले जाऊ नये म्हणून सखारामने नाकारला. परिणामी पाच वर्षांच्या मथुराला अकाली प्रौढत्व आले. वडील कामाला गेल्यावर मदनची आई बनून सांभाळ करावा लागायचा. अशा तऱ्हेने गरिबीचे चटके सोसत मथुरा लहानाची मोठी होऊ लागली.


     'सुंदर मुलींना देव गरीबा घरीच का जन्माला घालतो?' हा प्रश्न सखारामच्या आयुष्यात कधीच सुटला नाही. मथुरा जसजशी मोठी होऊ लागली, तसतशी सुंदर दिसायला लागली. जणू इंद्र दरबारा मधली एखादी अप्सराच रस्ता चुकून इकडे आली असावी. बायका आपापसात कुजबुजायला लागल्यात,


    'एखाद्या राजाच्या महालात जन्म घ्यायचा सोडून इथे कुठे आली माय भिकाऱ्याच्या घरात. बिचाऱ्यानं लेकरांचं पोट भरावं का हिच्या लग्नाचं बघावं?'


    'धड खायला ना प्यायला पण वाढली बघा कशी एरंडासारखी.'


    'आज काही तर उद्या काही, नुसती वाढत चाललीय. सखारामानं करावं तरी काय?'


    सखारामलाही चिंता होतीच, शेवटी बापच तिचा तो. शांत बसून कसा राहील? त्याने चार पाहुण्यांना सांगून ठेवले होतेच. तोही फिरत होता. पण त्याची गरिबी आड येत होती. तर कुठे, 'मुलीला आई नाही, सांगता येत नाही काही संस्कार मिळाले असतील की नाहीत ते' असं म्हणूनही नकार मिळत होता.


     एकंदरीत मथुराच्या लग्नाचा विचार सखारामला चांगलाच सतावत होता. रात्र रात्र झोप लागत नव्हती. पण मथुराकडे पाहिल्यावर मात्र त्याचे मन म्हणत होते, 'मुलगी जणू शुक्राची चांदणी. सहजच कुणी तरी मागणी घालील' असं त्याला नेहमीच वाटत होतं. आणि खरोखर ते काही खोटं नव्हतंच, मथुरा होतीच तशी सुंदर. लाखात एक देखणी, मितभाषी, सुशील, प्रेमळ, सुस्वभावी अशी मुलगी ज्या घरात जाईल त्या घराण्याचे भाग्य उजळलेच पाहिजे.


     माणसानं कितीही चिंता केली, कितीही उंबरठे झिजवले तरी वेळ आल्या शिवाय लग्न होत नाही अन् वेळ आल्यावर रहात नाही. मथुराच्या लग्नाची योग्य वेळ, भगवंताने निश्चित केलेली वेळ आली. डोंगरगावचे पाहुणे तिला बघायला आले. रीतसर मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. मथुराच्या हातचा गरिबीतला पण सुग्रास भोजनाचा यथेच्छ पाहुणचार घेऊन पाहुणे तृप्त झाले. लग्नाची बोलचाल सुरू झाली, तेवढ्यात कुणीतरी सखारामच्या परिस्थितीची जाणीव पाहुण्यांना करून दिली. त्यांनाही मुलगी आवडली होतीच. बाप लेकीच्या आवडी निवडीचा काही प्रश्नच नव्हता. 'गरिबाला कुठली आलीय आवड निवड?' सखारामला कुठल्याही खर्चात न घालता त्याच दिवशी, आहे त्याच परिस्थितीत मथुराचे लग्न पार पडले. मथुरा डोंगरगावची लक्ष्मी झाली. मथुरा सासरला निघाली. "बाबा, जीवाला जपा, भावड्याला जीव लावा. येते मी" म्हणत सखारामच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडली. बापाला, भावाला, गावाला रडवून ती सासरी गेली.


     मथुरा रामदासची लक्ष्मी बनून आली, आणि रामराव पाटलाच्या घरात लक्ष्मीची भरभराट सुरू झाली. त्यांच्या शेतातील मालाला अपेक्षेपेक्षा जास्त भाव मिळाला. रामराव पाटलांना हा मथुराचा पायगुण चांगलाच वाटला. मथुराने चार दिवसातच प्रेमाने घरच्यांची मने जिंकली. सर्वांना ती हवी हवीशी वाटू लागली. घरातल्याच काय पण गोठ्यातल्या गायी म्हशींना सुद्धा तिचा लळा लागला होता. मोठी जाऊबाई तिच्यासाठी आईच्या ठायी भासत असे, जाऊबाईच्या रुपात ती आईला शोधू लागली. जाऊबाईसुद्धा तिच्याशिवाय जेवण करत नव्हती. चार दिवस माहेर पणाला गेली तर सर्वांना तिची सारखी आठवण येत होती.


      मथुरा माहेरहून आल्यापासून सर्वांच्या गळ्यातला ताईत बनली होती. कामातही ती अतिशय चपळ आणि हुशार होती. घरातल्याच काय शेतातल्या कामातही ती जाऊ बाईच्या किती तरी पुढे पोहोचली होती. 


     डोंगरगाव खरोखर डोंगर झाडींनी वेढलेले, हिरव्यागारशा निसर्ग सौंदर्याने नटलेले गांव होते. खळखळून वाहणारी नदी, झरे, दाट झाडी यामुळे वन्य प्राणीही कधी कधी नजरेस पडायचे. उन्हाळ्यात एक दिवस मथुरा तिच्या जावेसोबत शेतात कामाला गेली होती. जाऊ बाईचे लहाने बाळ झाडाला झोका बांधून त्यात झोपवलेले होते. दोघींचे कचरा वेचायचे काम सुरू होते. अतिशय खेळी मेळीने दोघी काम करत होत्या. दुपार झाल्यावर दोघींनी एकत्र जेवण केले. थोडावेळ वामकुक्षी घेतली. विश्रांती नंतर बाळाला स्तनपान करून पुन्हा झोक्यात टाकले. तिने छानसे अंगाई गीत गाईले. बाळ झोपले तसे त्या दोघी पुन्हा कामाला लागल्या. त्यांनी काम सुरू करून तासभर झाला असेल नसेल, तेवढ्यात तिची नजर बाळाच्या झोक्याकडे गेली. अन् ती ताडकन् उठली. बाजूच्या झाडीतून एक लांडगा बाळाच्या झोक्याकडे धावत येतांना दिसला. ती पळत सुटली. जाऊ बाईसुद्धा पळू लागली, पण ती खूप घाबरली होती तिला पळता येईना. मथुरा पळत होती, पळता पळता दगड उचलून लांडग्याला फेकून मारत होती. जाऊ बाई तर घाबरून बेशुद्ध पडली, पण मथुराने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आवाज देत तिने बाळाला लांडग्याच्या तावडीतून सोडवलेच. बाकीचे शेतकरी येईपर्यंत चवताळलेल्या लांडग्याने तिच्यावर झेप घेतली आणि तिला खाली पाडले. तीन चार ठिकाणी तिला चावा घेतला. ती रक्तबंबाळ झाली होती. लोक धावत आले तसे लांडग्याने तिला सोडवून पळ काढला. एकाने तिला उचलले तसे ती खोल आवाजात विचारती झाली, 'बाळ कसा आहे? आधी त्याला दवाखान्यात घेऊन चला, त्याला वाचवा.' 


     बाळाला आणि तिला दवाखान्यात नेले. बाळाला फारसे असे काही लागलेच नव्हते, थोड्याशा उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. मथुरा मात्र जास्तच जखमी झालेली असल्यामुळे दवाखान्यात भरती करून घेतले गेले. दवाखान्यातही तिच्या प्रेमळ स्वभावाने डॉक्टर, नर्स यांचे प्रेम जिंकले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु लांडग्याला हरवणारी मथुरा मृत्यूकडून मात्र हरली. काळाशी झुंज देत तिने तिसऱ्या दिवशी या जगातून निरोप घेतला. तिच्या या शौर्याबद्दल, बाळावरील अनोख्या प्रेमाबद्दल डॉक्टर, नर्ससहित प्रत्येक जण हळहळत होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy