अनिव्हर्सरी
अनिव्हर्सरी


तो ओरिजिनल डायमंड चा भारी भक्कम किमतीचा नेकलेस वेलवेटच्या डब्यात तसाच पडून होता.तिचा नवरा सार्थक त्यां दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त आपल्या बायकोला,क्षितीजाला आनंदाने देऊन गेला होता,विदेशात मिटींग होती त्याची.आजच्या दिवशीही तो कामा निमित्ताने बाहेर गावी निघून गेला आणि जाता जाता तो डायमंड नेकलेस चा डब्बा मात्र तिला देऊन गेला होता. क्षितीजाने उघडून पण नाही पाहिला,पण तिचे डोळे तिचं ऐकतच नव्हते,सतत तिच्या टपोऱ्या डोळ्यांनी संततधारपणे रडणं चालू ठेवलं होतं. तिचा टाॅपही ओला झाला होता रडून रडून आणि राहून राहून,हमसून हमसून रडतच होती सारखी. सगळंच होतं ना तिच्या कडे भरपूर प्रमाणात अगदी,पण तिला जे खरंच हवं होतं,तेच नव्हतं तिच्या आयुष्यात!
पहिल्या वर्षी सार्थक ने खूप काळजी घेतली होती क्षितीजाची,तिला लग्न करून घरी आणलं त्याने, पण तिला घरी असं सोडून जायला त्याला जमायचंच नाही. म्हणजे घरी सगळे असायचेच त्याच्या ,पण त्याचं मन म्हणायचं मी क्षितीजा जवळच असावा. एवढं प्रेम करायचा तो तिच्यावर, पण आता ती गणितं पार बदलली होती. तेव्हा पैसे कमी होते पण एकमेकांना दयायला वेळ खूप होता दोघांकडेही.म्हणतात ना दात आहेत तर चणे नाहीत,चणे आहेत तर दात नाहीत पण त्याही परिस्थितीत दोघेही एकमेकांना सांभाळून जीवन मजेने जगत होते,पण सद्य परिस्थितीत घड्याळाचा काटा क्रूर बनला होता आणि तो दोघांच्या मध्ये मोठ्या पहाडासम उभा ठाकला होता!सोबत असुनही सोबत नसल्या सारखे होते दोघेही,दोन ओळखीचे, अनोळखी जोडीदार!
प्रत्येक जन्मदिवसाला,लग्नाच्या वाढदिवसाला,अजूनही भरपूर कारणांनी तिला मोठ मोठ्या भेटवस्तू मिळत होत्या आणि त्याबरोबर, हाॅटेल, मेजवान्या,बाहेरून मागवलेली जेवणं ही तर नित्य नियमाने चालत आलेली बाब!उंची कपडे,छान छौकीचे सामान,महागड्या गाड्या,नेहमीच्या देश-विदेश च्या वाऱ्या अजून बरेच काही जे इतरांच्या आयुष्यात नसेल कदाचित किंवा असेलही एवढं सुख होतं तिच्याकडे!पण तिच्या मनातलं बोलायला,तिला काय वाटतं,तिच्या अडचणी हे ऐकून घ्यायला सार्थक कुठेही नव्हता तिच्या बरोबर!तिला सगळं असूनही फार एकटं एकटं वाटायचं,इतकं की तिला आपलं असं कोणीच नाही असं वाटायचं,मुलं आणि घरातील मंडळी एक वेगळा भाग झाला पण नवरा हा भाग पूर्णतः वेगळा आणि महत्त्वाचा अविभाज्य भाग असतो, पण हेच बरेचदा त्या पतिलाच कळत नव्हतं तेव्हा क्षितीजाला श्रीमंत गरिब असं वाटायचं स्वतः बद्दल,बघ सगळं आहे ,तरीही तु नाखूशच आहेस क्षितीजा! गरिबांहून एकदम गरीब,जिला नवऱ्याच प्रेमच मिळतं नव्हतं,तीने खूपदा सांगितलं सार्थकला पण सार्थक लक्षचं देत नव्हता,त्याच म्हणणं काय? कसली कमी आहे गं तुला? सगळंच तर आहे तुझ्याकडे! इतरांकडे बघ जरा? हे त्याचं नेहमीच उत्तर,तिने आता हे बोलणं ही सोडून दिलं आणि ती फक्त नावाला जगत होती,फक्त मुलांसाठीच ! आला दिवस ढकलायची फक्त ,कोणतीही अपेक्षा सार्थक कडून न करता !आतून,मनातून पोखरून निघत होती मात्र रोजच!
तिने तो डायमंड नेकलेस त्या वेलवेटच्या डब्यातून बाहेर काढला,हम् ! आणि तिला इतकं वाईट वाटलं परत,तिला काहीच वाटतं नव्हतं त्या नेकलेस बद्दल,की अरे व्वा! छानच! असं काहीच नाही,तिला दुःख ह्या गोष्टीचं होतं की तिचा नवरा,तिचा सार्थक आता फक्त निव्वळ एक ए.टी.एम मशिन बनून राहिला होता,फक्त एक मशिन,पैसे कमावून दैनंदिन गरजा पूर्ण करणारं मशिन!तिला माहिती होतं तिला आणि कुटुंबियांना सगळंच देता यावं,याचसाठी तो हे सगळं करत होता,आजकालच्या स्पर्धेत आणि युगात टिकून रहायला!तिने स्वतःलाच "हॅप्पी अनिव्हर्सरी टु यु डियर क्षितीजा " असं म्हणत तो नेकलेस बाजुला ठेवून,तिथलीच एक ऊशी ऊचलली,आणि त्या ऊशीला तिने तिच्या उराशी जोरात कवटाळलं आणि ती परत त्या नेकलेस कडे पाहून आक्रंदुन रडायला लागली!