STORYMIRROR

Neelima Deshpande

Romance Tragedy Classics

3  

Neelima Deshpande

Romance Tragedy Classics

अँग्रीबर्डच्या विळख्यात!

अँग्रीबर्डच्या विळख्यात!

4 mins
185

"रीमा, जरा तरी माझ्या स्टेट्सला शोभेल असे रहा कधीतरी! सतत काय ग घरात घुसून बसायचं आणि पार्टी, पबचे नाव घेतले की "मला नको" म्हणून नाक उडवत निघून जायचं. खूपच बोअरींग आहेस यार तू, सगळा मूड घालवून टाकते बाहेर जाण्याचा!"

"मी काय तुझा मूड खराब केला अमित? उलट तूच मला सतत त्या पार्ट्यांना चलण्याचा आग्रह करतोस जिथे मला जाणे कधी आवडत नाही. तो भला मोठा आवाज आणि त्या ब्रँडेड गोष्टींच्या गप्पा, ते वस्तूंचे मिरवणे आणि श्रीमंतीचे प्रदर्शन या सगळ्यात मी कुठेच बसत नाही आणि कधी बसूही शकत नाही. मला वाटते आपण एकमेकांना जसे आहोत तसे स्विकारायला हवे आता तरी ! या गोष्टींवर इतके पैसे वाया घालवणे सुद्धा मला कधीच योग्य वाटत नाही. त्यापेक्षा आपण कुठेतरी शांत ठिकाणी फिरायला जाऊया... जायचा का आपण?"

"मी इथे दिवसातला थोडावेळ तुझ्यासोबत घालवू शकत नाही तर बाहेर कुठे तुझ्यासोबत फिरायला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते डोंगर, नद्या पाहण्यात मला अजिबात रस नाही. त्यापेक्षा तू तुझ्या IT कंपनीतल्या तुझ्यासारख्या लोकांच्या टीमबरोबर जा तिथे. मी मात्र माझ्या मार्केटिंगटीम आणि मित्रांच्या टोळीसोबत क्लब मधल्या पार्टीत चील करतो!"

रीमा आणि अमित यांचा आपसात वाद झाला तरी अमित खालच्या मजल्यावर त्याच्या आई बाबांसोबत मस्त जेवण करुन बाहेर पडला. मध्यरात्री तो उशिरा कधीतरी घरी परत येऊन खाली गेस्टरुममधे निवांत झोपला. आताशा हे वारंवार होत होते म्हणून रीमा आपल्या सासू सासऱ्यांशी एकदा बोलली...

"मला वाटते की तुम्ही दोघे अजूनही अमितला लहान समजूनच तो रागात आला की त्याची मनधरणी करता, त्याला चुकीच्या बाबतीत पाठिंबा देता. अशाने तो कधीच स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. मी त्याच्या चारपट अधिक कमावते, तरी कधीच पैशांची उधळण करीत नाही की ही गोष्ट त्याला किंवा तूम्हाला जाणवू देत नाही. पण माझे साधे राहणे, कमी बोलणे हे तूम्हाला कुणालाच का समजून घेता येत नाही? तुम्ही त्याला समजावण्यात माझी मदत कराल तर आपण सगळे मजेत राहू शकतो. तुम्ही बोलाल का एकदा त्याच्याशी?"

रीमाने तिला आजवर आलेल्या अनुभवांवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

"आम्ही अमितचा रागीट स्वभाव अगदी लहानपणीच ओळखला पण शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच आम्हाला पटले. एकदोनदा त्याला समजावण्यात त्याने खूप त्रागा करुन घेतला. त्याची तब्येत बिघडली. तेंव्हापासून मग आम्ही त्याच्या मनासारखे सारे घडू देत आलो. आमच्यासाठी एवढे पुरेसे आहे की एकदा का त्याच्या मनासारखे झाले की तो खुशच राहतो. तेंव्हा आता तूच बघ की तुला त्याचे मन कसे समजून घेता येईल! आम्ही आता तुमच्यात पडणार नाही! आमच्या मते अमितच्या वागण्यात फारसे काही वावगे नाही!"

ज्यांच्या भरवशावर रीमाला काही बदल होईल असे वाटत होते त्यांनी हात वर केल्यावर रीमाने यासाठी मॅरेज कोचची मदत घेतली.

"मॅडम मला समजत नाहीए की, अबोल किंवा शांत स्वभाव असणे, साधे रहाणे, शॉपिंगसाठी हट्ट न करणे या चांगल्या गोष्टी आहेत की वाईट? कित्येकदा यावरुन भांडणे झालेली पाहिलीत मी आणि माझ्या बाबतीत नेमकं माझा चांगुलपणा, समजुतीने वागणेच मला त्रासदायक ठरत आहे. अमितला माझ्या पासून वेगळे व्हायचे आहे. खर तर रागाच्या भरात त्याचा अनेकदा मार खाल्ल्यावर किंवा भांडणानंतर एक चक्कर मारुन आल्यावर माझ्या मनाचा कधीच विचार न करता अमितने त्याच्या मनासारखे वागताना किंवा त्याच्या इच्छांसाठी माझा वापर केला तरी मला कधी हे वेगळे होण्याचे पाऊल उचलावे वाटले नाही. मला वाटले होते की कदाचीत नवरा बायकोचे नाते हे असेच असते कारण अनेकांना मी यातून जाताना पाहिले आहे. आता अमित हे वेगळे होण्याचे बोलतोय ते मला पटत नाही. आज जर मी तयार झाले तर उद्या माझ्या जागी दुसरी कोणी हे त्याची बायको म्हणून पुन्हा नव्याने सहन करेल..."

कोचला एकीकडे स्वत:वर झालेले अन्याय सांगताना देखील ते इतर कुणाच्या बाबतीत होऊ नये याची रीमाला भिती वाटत होती. तर दुसरीकडे अजुनही अमितला कोणी समजावणारे असेल, त्याला संधी दिली तर तो अजुनही बदलेल असा तिला मनातून विश्वास वाटत होता.

"तुझे म्हणणे बरोबर आहे रीमा. अनेकदा पालकांना आपल्या मुलांना घडवताना जो सोपा मार्ग सापडतो त्याचा ते आधार घेतात. मोठेपणी याचा काय परिणाम मुलाच्या आयुष्यावर होईल याची कदाचित त्यांना कल्पनाही त्यावेळी नसते. अमितला जोवर त्याच्या आई वडीलांचा पाठींबा आहे तोवर तो बदलणार नाही. अमितला दुसरी संधी देऊन पाहू. त्याच्यात बदल नक्की होईल असे मला पण वाटते आहे पण त्यासाठी तुलाही भक्कम व्हावे लागेल. थोडे बदल स्वत:मधे तुला सुद्धा करावेच लागतील. आहेस का तू तयार?"

स्वत:च्या मनाची तयारी आहे हे दाखवत रीमाने कोचकडून अनेक सेशन्स घेतले. हळूहळू कोचच्या सांगण्यानुसार रीमाने स्वत:मधे अनेक छोटेमोठे बदल केले ज्यामुळे अमितच्या मनात तिच्याबद्दल परत प्रेम आणि जवळीक निर्माण होऊ शकते असेच ते बदल होते. पुरेसे बदल झाल्यावर रीमाने मग सरळ अमितशी बोलूनच घेतले.

"मला वेगळे व्हायचे नाही त्यामुळे मी तुला घटस्फोट देणार नाही.

* तुझा आग्रह असेल तर मला आधी केस करायची आहे ज्यात मी तू मला केलेली मारहाण आणि इतर सगळ्या गोष्टी सांगेन.

* हे टाळायचे असेल तर आपण दोघे आता वेगळे राहू व एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ देऊ.

* तुला तुझ्या रागावर नियंत्रण करणे शिकावेच लागेल. त्यासाठी तू हवी ती मदत किंवा उपचार घे.

* आपण दोघे एकमेकांसाठी सुसह्य असू इतपत सारे बदल स्वत:मधे करू. हे माझ्यासोबत तुलाही करावे लागेल. मी सोशल जगात तुझ्यासोबत राहताना बदल करेन व तू चार भिंतींच्या आतलं आपलं जगणं सूसह्य होईल यासाठी तुझ्यात बदल करून घे...."

रीमाचा प्रस्ताव मान्य करुन काही काळ एकत्र घालवत अमितने त्याला मिळालेल्या दुसऱ्या संधीचे सोने केले. राग आटोक्यात आणण्यासाठी त्याने मनापासून प्रयत्न केले. या सगळयाचा परिणाम होत सतत चिडचिड करणारा व जोरजोरात अँग्री बर्डसारखा रीमावर ओरडणारा अमित आज तिचा लवबर्ड बनला आहे.

खूप नेटाने आणि हिमतीने एखादी गोष्ट बदलण्याची नुसती जिद्द न ठेवता त्यासाठी संयम ठेवत व स्वत:मध्येदेखील बदल करुन घेत रीमाने तिच्या लग्नांला मोडण्यापासून वाचवले. दुसरी संधी देत तिने पुन्हा एकदा आयुष्यात नंदनवन फुलवले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance