Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Dr.Smita Datar

Inspirational


3  

Dr.Smita Datar

Inspirational


अजेय कुंभळगड

अजेय कुंभळगड

4 mins 15.8K 4 mins 15.8K

  “पधारो म्हारे देस“ म्हणणारा राजस्थान, जितका त्याच्या सुंदर राजवाड्यांचा आहे, वाळूच्या टेकड्यांचा आहे, रंगांच्या उधळणीचा आहे, तितकाच तो अभेद्द्य गड किल्ल्यांचा आहे. उदयपूरहून दोन तासांवर भारतातलं, स्थापत्यशास्त्रातलं अनुपमेय उदाहरण ऐतिहासिक काळापासून वसलेलं आहे, कुंभळगड २०१३ मध्ये युनेस्को ने वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून कुंभळगड चा समावेश केलाय. उदयपूर, चितोडगड, माउंट अबू फिरून झाल्यावर कुंभळगडच्या भेटीची तीव्र ओढ लागली होती. उदयपूर मार्गे १०० कि.मी वर आहे कुंभळगड. कुंभळगड ला निघालो. उदयपूर – कुंभळगड रस्त्यावर ४० कि. मी. वर आत वळल की “हल्दी घाटी“ लागते. वाटेत हल्दी घाटी ला “महाराणा प्रताप म्युझिअमही" आहे. महाराणा प्रतापांचा त्यांच्यासारखाच पराक्रमी घोडा चेतक याची समाधी बघितली. मोहन श्रीमाली या निवृत्त शिक्षकाने महाराणा प्रताप म्युझिअम मध्ये जिवंत केलेला इतिहास, रक्ततलाई, चेतक घोड्याची स्वामीनिष्ठा हे सगळे पाहून नतमस्तक झालो. हल्दीघाटीची पिवळी माती अंगारा समजून भाळीं लावली. त्या योध्यांपुढे विनम्र होऊन पुढे निघालो. राजस्थान मधली गहू, बाजरीची शेते, उन्हापासून रक्षण करणारी मातीची घरे, थोडा रूक्ष पण सुंदर निसर्ग. लहान मोठ्या टेकड्या पार करत होतो. डोक्याला मोठ्या रंगीत पगड्या घातलेले पुरुष, गडद रंगांचे घागरे , दुपट्टे घेतलेल्या राजस्थानी बायका ग्रामीण राजस्थानच निसर्गचित्र पूर्ण करत होत्या.

   राजस्थानी संगीत आणि नृत्याने कुंभलगड ने आमचं स्वागत केलं. कुंभलगड गावात तर आलो.पण फोटोत बघितलेल्या कुंभलगडचा एक चिराही दृष्टीस पडेना. आमच्याने आणखी धीर धरवेना. म्हणून सामान ठेवून तडक बाहेर पडलो. टेकड्या, डोंगर मागे पडत होते. घाट वळणाचा रस्ता. अगदी शेवटी एका गडाच्या दरवाजाच्या जवळ आलो आणि काय आश्चर्य! आजपर्यंत जाहिरातीत पाहिलेला, तो आमच्या पुढ्यात उभा आडवा ठाकला होता, साक्षात कुंभलगड!

   अरवली पर्वतरांगेत पसरलेला अजस्त्र कुंभलगड दृश्यमान होतो, अगदी जवळ पोहोचल्यावर . त्याच हेच वैशिष्ट्य राजपुतांच संरक्षक अस्त्र ठरलं. शत्रूच्या दृष्टीक्षेपात सहज न येणारा, समुद्रसपाटीपासून ३२८१ फूट उंच, अनेक पर्वतरांगांच कवच लाभलेला, घनदाट अरण्याने वेढलेला हा कुंभलगड म्हणूनच राजपूत राजांची संकटकालीन राजधानी ठरला.

    सम्राट अशोकाचा नातू, राजा संप्रती याने इथे सैनिकी छावणी वसवली आणि नाव दिले “मच्छिंद्रपूर“. शिल्प कलाकारांनी त्यांची भक्ती ओतून बनवलेली दगडी जैन मंदिरे, या जैन वसाहतीची आजही साक्ष देतात. गडावर असलेल्या ३६० मंदिरांपैकी ३०० मंदिर जैन देवतांची आहेत. त्यानंतर गुजरातच्या अहमद शहा पासून अल्लाउद्दिन खिलजी पर्यंत अनेकांनी यावर आक्रमण केली. परंतु कुंभलगड अजेयच राहिला.

  “ मेवाडचे राजा कुंभ यांच्या दूरदृष्टीने या गडाच रुपांतर एका अभेद्य किल्ल्यात झालं. राजा कुंभ यांनी या गडाला ३६ कि. मी. लांब आणि १५ फूट रुंद दगडी भिंत बांधली. ही भिंत इतकी रुंद आहे की यावर एका वेळी दहा घोडेस्वार घोडे चालवू शकतात.चीनच्या भिंतीनंतर जगातली मोठी अशी ही दुसऱ्या क्रमांकाची भिंत आहे.” त्या भिंतीवरून चालताना, वाटाड्या सांगत होता. ज्या भिंतीवरून राजा कुंभ, उदयसिंग महाराज, महाराणा प्रताप याचं सैन्य चालल, त्या भिंतीवर आपण उभे आहोत, अश्या विचारानेच आम्ही धन्य झालो होतो.

    महाराणा कुम्भाना हा किल्ला बांधायला आशीर्वाद देणाऱ्या साधूने, स्वतःची आहुती दिली आणि गडबांधणीत महाराजांना येणारं विघ्न, त्यान दूर केलं, अशी आख्यायिका आहे. हनुमान पोल येथे त्याची समाधी आहे. कुंभलगडाला सात मुख्य पोल ( प्रवेशद्वार ) आहेत. प्रथम द्वार ‘आरेड पोल‘, त्यापुढे एका मैलावर ‘हल्ला पोल‘. शत्रूला गुंगारा देऊन इथपर्यंत आणायचं आणि नैसर्गिक जंगलं व पर्वतांचा फायदा घेऊन हल्ला करून सैन्याचा नाश करायचा, तो हल्ला पोल. नंतर ‘ हनुमान पोल‘, ‘विजय पोल‘, सामान्य लोकांसाठी ‘सूरज पोल‘, ‘राणीबटटा पोल‘, सर्वात खालच्या बाजूला ‘सात कोठार पोल‘, येथून दाणागोटा आत आणला जाई. एकेक प्रवेशद्वार हे अतिभव्य व मजबूत बांधकाम असलेलं आहे. गडाची नैसर्गिक रचना लक्षात घेऊन ‘मादन ‘ या स्थापत्यविशारदाने याची बांधणी केली आहे. अतिशय उंचावर ‘ कुंभ महाल‘ , जो ढगांशी स्पर्धा करतो, म्हणून त्याला ‘बादल महाल‘ असही म्हणतात. राजस्थानी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेला ‘कुंभ महाल‘ अजूनही उत्तम स्थितीत उभा आहे. हेच महाराणा प्रताप यांचं जन्मस्थळ आहे. या महालाच्या वरच्या सौन्धावरून एकीकडून संपूर्ण अरवली पर्वतरांगा नजरेच्या टप्प्यात येतात, तर एका बाजूला मैदानी प्रदेशातील वाळूच्या टेकड्यांचे दर्शन होते. संरक्षणासाठी उंच भागावर प्रसाद, हवेल्या, सपाट प्रदेशावर शेती, तर खोलगट भागात तळी, सरोवर अशी स्वयंपूर्ण रचना करणारा राजा आणि स्थापत्यकार दोघेही दूरदृष्टीचेच म्हणायचे.

      काळ्या पाषाणातली, बारा हातांची शिवमूर्ती, २४ स्तंभांच त्याचं मंदिर, अतिप्राचीन गणेश मंदिर, नीलकंठ मंदिर, पार्श्वनाथ मंदिर, जैन मंदिर यांचं कोरीव काम आणि घडीव बांधणी तर शब्दातीत! विष्णू मंदिर, यज्ञवेदी, छत्री पाहताना, इतक्या उंचीवर, त्या काळी ही निर्मिती करणाऱ्यांचे हात किती कसबी होते, असा विचार मनात तरळून जात होता.

    संध्याकाळ झाली. केशरी सूर्यकिरण अवघ्या कुंभलगडावर हलकेच पसरली आणि कुंभलगड ध्वनि प्रकाशाने स्वतःच बोलू  लागला. “मै कुंभलगड हू“ अप्रतिम असा हा छाया प्रकाशाचा खेळ इतिहासाला तुमच्या समोर आणून उभं करतो.आणि मग गडावरच भेटत, पृथ्वीराज, राणा सांगा याचं दुडदुडणार बालपण, त्यांना खेळवणार्या दास्यांची लगबग, कुंभलगडावर चालून येणारं मोगल सैन्य, राण्यांनी केलेला जोहर, चितोडगड हून भावी राजा , उदयसिंगना जीवापाड जपून घेऊन येणारी पन्ना दाई, हल्दीघाटीची रक्तरंजित लढाई खेळून परत येऊन विसावणारे महाराणा प्रताप, महाराणा कुम्भांच द्रष्टेपण आणि शेवटी राज्यलोभामुळे पुत्र उदयकर्ण याने राणा कुम्भाना दिलेलं मरण. राजपूत आन, बान आणि शान अनुभवताना त्यांच्या वीरश्री ने अंगावर उभे राहिलेले रोमांच आणि त्यागाने, घश्यात अडकलेला हुंदका घेऊन आम्ही वर्तमानात परत आलो.

    दुसऱ्या दिवशी अरवली वाईल्ड लाईफ सफारी मुळे तिकडच्या वन्य जीवनाशी ओळख झाली. राजस्थान पर्यटन विभागाने आयोजलेल्या महोत्सवात स्थानिक नृत्य, गायन, पगडी बांधणे, मेहंदी मंडना, तलवार बाजी असे अनेक कार्यक्रम झाले. आणि निघताना पुन्हा एकदा डोळ्यात साठवला, अभेद्य, अजेय कुंभलगड.

                                                                                                 


Rate this content
Log in

More marathi story from Dr.Smita Datar

Similar marathi story from Inspirational