Raju Gavali

Action Thriller Tragedy Crime

4.5  

Raju Gavali

Action Thriller Tragedy Crime

आय विल किल हिटलर

आय विल किल हिटलर

12 mins
393


८ नोव्हेंबरचा १९३९ चा दिवस होता कडाक्याची थंडी पडली होती तापमान तर दोन किंवा तीन डिग्री एवढेच होते धुके तर इतके पडले होते की पाच फुटावरचा माणूस पण दिसत नव्हता रात्रीचे नऊ वाजले होते अशा वेळी कुणीतरी स्वित्झर्लंडच्या बॉर्डरच्या दिशेने झपाझप पाउले टाकत जात होता. बॉर्डर आता फक्त पंचवीस फूट उरली होती अचानक "ए कोण आहे रे, थांब" असा जोरदार आवाज त्याच्या कानावर पडला तेथे गस्त घालणाऱ्या दोन जर्मन सैनिकांची नजर त्याच्यावर पडली होती पण त्यांच्या हाकेची परवा न करता तो तसाच बॉर्डर च्या दिशेने जाऊ लागला जर्मन सैनिक परत एकदा कडाडले "अरे तुला ऐकायला येत नाही का? थांब तिथेच आता नाहीतर गोळ्या घालीन" आता मात्र त्याचे पाय जिथे होते तिथेच गोठले. जर्मन सैनिक आपल्या रायफली सांभाळत त्याच्याजवळ आले त्यातील एकाने रागाने पाहत "बॉर्डर बंद झाली आहे तू कुठे चालला आहेस?" असे विचारले पण तो काही न बोलता तसाच उभा राहिला. त्याच्या तोंडातून एकही शब्द येत नाही हे बघितल्यावर त्या दोघा सैनिकांना त्याच्या विषयी शंका येऊ लागली त्यांनी त्याला अटक करून आपल्या केबिनमध्ये नेले व त्याची झडती घेतली. त्याच्या खिशातून वायर कटर, काही डेटोनेटर्स, एक फ्यूज, बॉम्ब बनवण्या संबंधि नोट्स आणि स्केचेस, बर्गब्रुकेलरच्या आतल्या भागाचे कलर पोस्टकार्ड असल्याचे आढळून आले.  


त्या दोन्ही सैनिकांनी कोनस्थझमध्ये गेस्तापो (नाझी जर्मनीचे अधिकृत गुप्त पोलीस) यांना एका संशयिताला अटक केल्याचे कळविले साधारण तासाभरातच ते तेथे पोहोचले. त्याची चौकशी सुरू असतानाच टेलिप्रिंटरचा आवाज आला. एक सैनिक पटकन उठून टेलिप्रिंटरवर आलेला संदेश घेऊन केबिन मध्ये आला व त्याने गेस्तापोच्या अधिकार्‍याला दिला. संदेश वाचताच तो ताडकन उभा राहिला संदेशात लिहिले होते कि म्युनिक येथे प्रचंड मोठा बॉम्बस्फोट होऊन त्यात सुमारे सहा लोक मृत्युमुखी पडले आहेत व ३० लोक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्याने लगेचच आपल्या मुख्यालयाला टेलिप्रिंटरवर एक संदेश पाठवला "मी एका संशयिताला बॉर्डर पार करण्याच्या प्रयत्नात पकडलेला आहे त्याला मुख्यालयात घेऊन येत आहे". सकाळी त्यांना घेऊन जाण्यासाठी एक पोलीस गाडी आली व त्यातून त्याला म्युनिक येथील गेस्तापोच्या मुख्यालयात आणण्यात आले. 

कोण होता तो.. काय होती त्याची पार्श्वभूमी..  


त्याचे नाव होते गियॉग एल्सा, हमारिंगेन, वर्टेमबर्ग जर्मनी येथील लुडविग एलसर व मारिया मुलर यांच्या येथे ४ जनेवारी १९०३ रोजी त्यांचा जन्म झाला. त्याच्या जन्माच्या एक वर्षानंतर त्याच्या पालकांनी विवाह केला आणि मारिया लुडविगबरोबर राहण्यासाठी कॉनिग्सब्रॉन येथे राहायला गेली. त्यांचे वडील एक लाकूड व्यापारी होते, तर त्यांची आई शेतावर काम करत होती. लहानपणी गियॉगला त्याच्या पाच लहान भावंडांची काळजी घ्यावी लागे. त्यांने १९१० ते १९१७ पर्यंत कोनीगब्रॉनमधील प्राथमिक शाळेत चित्रकला आणि गणित या विषयांचे शिक्षण घेतले. 


वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे लहानपणी त्याला खुप त्रास सहन करावा लागला. अवघ्या १४ वर्षाचा असताना गियॉग एल्सा आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागला. पुढे त्यानं कॉनिग्सब्रॉनमधील धातूच्या कारखान्यात लेथऑपरेटर म्हणून प्रशिक्षणाची सुरुवात केली परंतु तेथे होणाऱ्या प्रदुषणाच्या त्रासामुळे त्याला ते काम सोडावे लागले. नंतर तीन वर्ष कोएनग्सब्रॉनमधील लाकडी कामकाजाचा मास्टर म्हणून ओळखला जाणाऱ्या रॉबर्ट सॅपरकडून सुतारकाम शिकला व अॅलन मधील पॉल रिएडरच्या फर्निचर कारखानात काम करू लागला. 


एल्सा जसजसा मोठा होत होता तसे त्याला जाणवत होते की नाझींच्या धोरणांमुळे सामान्य जर्मन लोकांच्या राहणीमानाचा दर्जा कमी होत होता. हिटलरला बर्याच वेळा ज्या "आर्थिक चमत्काराचा" अभिमान होता त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली होती. कामचे तास खूप जास्त आणि सुट्या थोड्या होत्या. ट्रेड यूनियन आणि राजकीय पक्ष विसर्जित केले गेले किंवा त्यांच्यावर बंदी घातली गेली; वेतन गोठविले होते. दरम्यान, नाझी पक्षाचे सदस्य विशेषाधिकारांचा आनंद घेत. जे पक्षामध्ये सामील होण्यास नकार देत त्या लोकांसाठी हेविशेषाधिकार उपलब्ध नव्हते. एल्सा परिपूर्णतावादी होता तो त्याच्या कामावर खूप श्रम घेत होता, पण मजुरी कमी झाल्यामुळे त्याला आपले प्राथमिक खर्च पूर्ण करणे कठीण होत होते. १९२५ च्या आॅगस्ट महिन्यात तो आपल्या एका मित्राबरोबर एका घड्याळ बनवणाऱ्या कंपनीत कामाला लागला पुढे ती कंपनी पण बंद झाली त्यामुळे तो परत काम शोधू लागला.


नाझी शासनाविरुद्धचा त्याचा राग व हिटलर बद्दल त्याच्या मनात असलेला द्वेष तो कोणालाही कळूदेत नव्हता रेडिओवर होणारे हिटलर चे भाषण तो कधीही ऐकत नव्हता त्याने नाझी पद्धतीचा सॅल्युट कधीच केला नाही. एकदा दक्षिण-पश्चिम जर्मनीतील कोंइग्सब्रॉनच्या आपल्या घराजवळून हिटलरच्या सैनिकांची परेड जात होती तेव्हा त्यांच्याकडे आपली पाठ फिरवून जोरात शिट्टी वाजवू लागला. 


जर्मनीच्या अशा परिस्थितीला जबाबदार फक्त हिटलर होता असे त्याचे ठाम मत होते. हिटलर बद्दलचा राग मनात दिवसेंदिवस वाढत होता. त्याच्या मित्राबरोबर तो एका जहाज बनवणाऱ्या कंपनीत कामाला लागला तेथे त्याला फायरिंग पिन आणि डेटोनेटर याची माहिती झाली. तेथे तो कम्युनिस्ट कामगारांच्या खोलीमध्ये त्यांच्याबरोबर राहत होता त्यातील काही कामगारांबरोबर तो "रेड फ्रंट फाईटर्स लीग" मध्ये सामील झाला. 

काही दिवस तो तेथे काम करत होता एके दिवशी त्याला त्याच्या आईचा फोन आला आई रडून म्हणत होती की त्याच्या दारूड्या बाप, नेहमी तिला हिंसक आणि अपमानास्पद वागणूक देत होता, तो लगेचच आपल्या गावी आला. घरची परिस्थिती सुधारावी म्हणून तो आपल्या वडिलांच्या वर्कशॉपमध्ये काम करून पैसे कमवू लागला त्याच्या त्या वागण्याने त्याच्या वडिलांना खूप राग आला व त्यांनी त्यांचे घर व संपूर्ण इस्टेट विकून टाकली. 


याच वेळी एल्साची ओळख महिला मथिल्डे निडेरमनशी झाली. ती एका हॉटेलमध्ये काम करत होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही महिन्यांनी मथिल्डे गरोदर झाली. तीला घेऊन एल्सा जिनीव्हा, स्वित्झर्लंडला गेला. तिचा गर्भपात करण्यासाठी गेले पण गर्भ ४ महिन्याचा झाल्याने डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नाकारले. मथिल्डेने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव मॅनफ्रेड ठेवले एल्सा काही दिवस तेथे राहिला व परत कामावर जर्मनीत परतला. एल्साने आता ठरवले होते की जर जर्मनीची परिस्थिती सुधारायची असेल तर त्यासाठी त्याला हिटलर व त्याच्या सहकाऱ्यांना संपवावे लागेल व त्याची तयारी तो करू लागला. 


त्याला माहित होते की हिटलर जवळ जाऊन त्याला मारणे फार कठीण आहे म्हणून त्याने बाॅम्बस्पोट घडवून त्याद्वारे त्यांना मारण्याचे ठरविले व या हत्येच्या योजनेची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे कशी करता येईल हे शोधण्यासाठी व हिटलर एका विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी असेल हे माहित करण्यासाठी त्याने ८ नोव्हेंबर १९३८ रोजी ट्रेन ने म्यूनिख पर्यंत प्रवास केला कारण त्या दिवशी 'बेअर हॉल पुशच्या' वर्धापन दिनी हिटलर वार्षिक भाषण देत असे. एल्सा बर्जरब्रॅकेलरमध्ये प्रवेश करण्यास गेला पण प्रचंड गर्दीमुळे त्याला रात्री १०.३० वाजता आत जाता आले. सुरक्षाव्यवस्थेत बर्‍याच त्रुटी होत्या हे पाहून एल्साला आश्चर्य वाटले व तो मनातून खुश ही झाला. तेथील सुरक्षा व्यवस्था एका स्थूल, लाचखोर आणि नाईट क्लबचा माजी बाउन्सर क्रिस्टिअन वेब याच्यावर होती. तो एक कट्टर नाझी असल्यामुळे त्याला खात्री होती की हिटलरला कोणी इजा पोहचवू शकत नाही म्हणून त्याला हिटलरच्या सुरक्षितते संबंधीची सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे वाटत नव्हते. एल्सा मध्यरात्रीपर्यंत तेथेच हॉलमध्ये थांबला तो एक भूमिगत हॉल होता, ३००० हून अधिक जणांना सामावून घेण्याची क्षमता त्या बर्जरब्रॅकेलरमध्ये होती. म्हणूनच हिटलरने आपल्या भाषणासाठी बर्जरब्ब्रोकेलरला निवडले होते. एल्साने तळघराचा लेआउट लक्षात घेतला, सहजच त्याचे लक्ष मुख्य व्यासपीठाच्या मागे दगडाच्या खांबांवर गेले त्या खांबांवर संपूर्ण बाल्कनीचे वजन होते. त्याने मनातल्या मनात एक गणित केले जर व्यासपीठामागील खांबात मोठा बॉम्ब ठेवून त्याचा स्फोट घडवून आणला तर संपूर्ण बाल्कनी खाली पडेल व हिटलर आणि त्याचे अनेक मुख्य समर्थक त्याखाली दफन होतील. पण प्रश्न हा होता की त्या खांबात त्याला उडवण्या एवढा शक्तिशाली बॉम्ब कसा लपवायचा? या गोष्टीचा विचार करून तो आपल्या लॉजवर परत आला दुसऱ्या दिवशी सकाळी तो कॉनिग्सब्रोनला परतला.


एल्साकडे आता एक वर्ष होतं बॉम्ब बनवण्यासाठी व त्यासाठी लागणारी सामग्री गोळा करण्यासाठीची उपाययोजना तो करू लागला. १९३८ ला युद्ध होणार हे निश्चित झाले होते व त्यासाठी जर्मनी मध्ये अनेक शास्त्र बनविण्याचे कारखाने पूर्ण वेगाने सुरू होते याचाच फायदा घेत एप्रिल १९३८ मध्ये एल्साने हेडनहेममधील 'वॉल्डेनमायर आर्मेमेंट फॅक्टरी' या शस्त्र बनविण्याऱ्या कारखान्यात एकदम कमी पगारावर नोकरी सुरू केली तो कामावरून येताना आपल्याबरोबर रोज थोडी थोडी विस्फोट करणारी पावडर घेऊन आपल्या झोपण्याच्या खोलीत असलेल्या बेडच्या खाली एका बॉक्समध्ये जमवू लागला, पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात आले की त्याला लागणारी विस्फोटात पावडर जमविण्यासाठी त्याला खूप दिवस लागतील म्हणून तो दुसऱ्या कामाच्या शोधात होता काही दिवसांनी कॉनिग्सब्रॉन मध्ये 'व्हॉलमर' ही दगडांची क्वारी शोधून काढली तिथे विस्फोटकं वापरली जात होती हे त्याच्या लक्षात आले म्हणून तो त्या क्वारी मालकाकडे जाऊन आपल्याला येथे काम करण्याची इच्छा आहे म्हणून सांगितले वारी मालकाने त्याला "तुला पगार मिळणार नाही काम करायचं असेल तर कर". एल्सा तयार झाला रोज कामावर येऊ लागला व तेथे विस्फोटक ठेवण्याच्या खोलीला कुलुप नसल्यामुळे तिथून रोज थोडे थोडे विस्फोटक व डेटोनेटर घेऊन आपल्या खोलीत जमवू लागला, काही दिवसांनी जवळपास १०० विस्फोटक काड्या व उच्च क्षमतेचे ११० डेटोनेटर्स जमल्यावर त्याला खात्री झाली की बॉम्ब बनवण्या एवढे विस्फोटक जमा झाले आहे तेव्हा त्याने क्वारी मधले काम सोडून दिले.


दरम्यानच्या काळात त्याने म्युनिकला जाऊन परत एकदा, बर्गरब्रॅकेलर हॉलचे काही स्केचेस काढले व खांबाचे अचूक माप घेतले. त्याने स्वित्झर्लंडच्या बॉर्डर पर्यंत जाऊन ती सुरक्षितपणे कशी ओलांडता येईल व पहारा नसलेले ठिकाण शोधून काढले. 

त्याच्या पालकांच्या मालकीच्या एका स्वतंत्र बागेत एल्साने बॉम्बच्या अनेक नमुन्यांचे यशस्वी यशस्वी परीक्षण केले. आता त्याच्याकडे बॉम्ब बनवण्यासाठी फक्त चारच महिने शिल्लक होते त्यांनी 


ऑगस्ट महिन्यात, आजारपणानंतर, तो म्यूनिखला आला.पावडर, स्फोटक द्रव्ये, बॅटरी आणि डिटोनेटर हे सर्व सामान त्याने आपल्या लाकडी सुटकेसच्या खोट्या तळाशी भरले. त्यावर आपले कपडे भरले. दुसर्‍या पेटींमध्ये पूर्वी घड्याळाच्या कारखान्यात काम करत असताना तेथे मिळालेले घड्याळ सुट्टे भाग आणि त्याच्या सुतारकामच्या व्यवसायाच्या साधने भरली होती. त्याने एका अपार्टमेंटमध्ये खोली भाड्याने घेतली. संध्याकाळी जेवणासाठी बर्गरब्रॅकेलर रेस्टॉरंट मध्ये जाण्यासाठी त्याने त्याच्याकडचा चांगला सुट घातला. रेस्टॉरंटमध्ये आल्यावर बसण्यासाठी त्याने एका कोपर्‍यातले टेबल निवडले. जेवण झाल्यावर त्याने कॉफीची ऑर्डर दिली. जवळपास १०:३० वाजेपर्यंत आपल्या टेबलावर बसून कॉफी पीत त्याने रेस्टॉरंट मधील सर्व लोक बाहेर जाण्याची वाट पाहिली. 


रात्रीचे अकरा वाजले होते रेस्टॉरंट आता जवळपास रिकामा झालं होतं तो हळूच उठला व रेस्टॉरंटच्या बाजूला असलेल्या बर्गरब्रॅकेलर हॉलमध्ये गेला. एका छोट्याश्या जागेत काही लाकडी बॉक्स ठेवले होते एल्सा तेथे गेला आणि बॉक्स मागे लपून राहिला. थोड्या वेळाने कर्मचारीही निघून गेले. रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याने हॉलला बाहेरून कुलुप लावले. कुलूप लावण्याचा आवाज ऐकल्यानंतर एल्सा तसाच आणखीन दहा मिनिटं पडून होता, त्याला हॉलमध्ये कुणीही नसल्याची खात्री करायची होती. आता तो हळूच उठला व मुख्य व्यासपीठाच्या मागच्या बाजूला असलेल्या खांबाजवळ येऊन थांबला. जमिनीपासून साधारणतः दोन ते अडीच फुटावरची जागा त्याला आपला बॉम्ब ठेवण्यासाठी योग्य वाटली.


दुसऱ्या दिवसापासून काम सुरू केले पाहिजे असे ठरवून एल्साने रात्र जागून काढली. सकाळी जेव्हा कर्मचार्‍याने रेस्टॉरंटचे दार उघडले तेव्हा तो मागच्या दाराने बाहेर पडला व आपल्या खोलीवर येऊन झोपला. दुपारी बॉम्बच्या टायमर साठी लागणारे घड्याळाचे सुटे भाग घेण्यासाठी तो एका घड्याळाच्या दुकानात जाऊन काही सुटे भाग घेऊन आला. 


आपले सुतार कामाचे साहित्य, छोटीशी टॉर्च एका पेटीत ठेवून रात्रीचे जेवण घेण्यासाठी तो बर्गरब्रॅकेलर रेस्टॉरंट मध्ये आला. जेवण झाल्यावर कालच्या सारखा शेजारच्या हॉलमध्ये गेला. रेस्टॉरंटचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज आल्यावर एल्सा उठून उभा राहिला. पेटीतून टॉर्च बाहेर काढली. टॉर्च पेटवल्यावर त्याच्या लक्षात आले कि त्याचा उजेड जास्त होता, एवढ्या उजडात जर काम केले तर सुरक्षा रक्षकांच्या सहज लक्षात येईल की हॉलमध्ये कुणीतरी आहे त्याने आपल्याकडील निळा रुमाल काढून टॉर्चवर गुंडाळला आता टॉर्चचा प्रकाश मंद झाला, एवढा प्रकाश त्याला काम करण्यासाठी पुरेसा होता व सुरक्षितही होता.


मुख्य व्यासपीठाच्या मागे असलेल्या खांबाजवळ जाण्यासाठी जागा खुप अरूंद होती, जेमतेम एक व्यक्ती रांगत जावू शकत होती. एल्साची तबियत बेताचीच असल्यामुळे त्याला आत जाता आले. आत गेल्यावर गुढग्यावर बसुन त्याने टॉर्च पेटवली दोन्ही हाताने काम करायचे होते म्हणून त्याने टॉर्च आपल्या तोंडात धरून खांबाचे निरीक्षण केले आतल्या दगडी खांबाला बाहेरून लाकडी झडप लावून झाकले होते. त्याने आपल्या सुतारकामाच्या साहित्यातून एक लोखंडी पट्टी काढली व तो हळूच ती झडप उघडण्याचा प्रयत्न करू लागला. 


थोड्याशा परिश्रमाने झडपेचा दरवाजा उघडला. आत विटांचे मजबूत बांधकाम होते अशा बांधकामात पोकळी निर्माण करून त्यात सुमारे पन्नास किलो विस्फोटक व त्याला उडवण्यासाठी लागणारी यंत्रे ठेवण्यासाठी जागा बनवणे मोठे जिकिरीचे काम होते त्यासाठी खूप वेळ लागणार होता म्हणून त्याने आजपासूनच काम सुरू करायला पाहिजे असा विचार करून त्याने छिन्नी व हातोडी काढून हळूच खांबावर पहिला फटका मारला त्या फटक्याचा आवाज एवढा मोठा झाला की एल्साचा हात होता तेथेच गोठला. पाच मिनिटं तो तसाच शांत बसून राहिला, त्याला वाटू लागलं की आवाज ऐकून कुणी येणार तर नाही ना? सुदैवाने तो आवाज कोणीही ऐकला नाही. 


छिन्नी व हातोडी कपड्यांमध्ये ने गुंडाळून तो काम करू लागला आता आवाज कमी येत होता. हॉल मध्ये असलेल्या मुतारी मध्ये एक अशी यंत्रणा बसवली होती की दहा मिनिटांनी एक जोरदार फ्लॅश आपोआप सुरू व्हायचा ज्यावेळी तो फ्लॅश सुरू व्हायचा एल्सा जोराजोरात फटके मारून काम करत होता तसेच बाहेरून एखादा ट्रक वेगाने गेल्यास त्याच्या मोठ्या आवाजाचा फायदा घेत तो जोराने हातोडी मारत होता. काही वेळाने तिने काम थांबवले तो झोपी गेला. 


सकाळी रेस्टॉरंट उघडण्याच्या आवाजाने तो खडबडून उठला आणि गपचुप हॉलच्या मागच्या दाराने बाहेर पडला. आपल्या खोलीवर येऊन तो विचार करू लागला की आज रात्री छिन्नी व हातोडी ऐवजी ड्रिलिंग मशीनचा वापर करून त्या खांबातील विटा तोडाव्या, ठरल्याप्रमाणे त्याने रात्री हॉलमध्ये प्रवेश केला आणि ड्रिल मशीनच्या मदतीने हळूहळू विटांचे तुकडे करू लागला हे सर्व काम त्याला आपल्या गुडघ्यांवर बसूनच करावे लागले. मात्र सकाळी हॉल सोडायच्या अगोदर तेथे पडलेला सगळा कचरा व विटांचे तुकडे तो एका पिशवीत भरून आपल्या बरोबर घेऊन जात होता कारण तेथे थोडा जरी कचरा दिसला असता तर तेथील सुरक्षारक्षकांना शंका आली असती व त्यांनी जर खांब तपासला असता तर त्यांना कुणीतरी खांब पोखरण्याचे काम करत असल्याचे समजले असते. 

 

एल्सा रात्री खांब पोखरण्याचे काम करत होता व दिवसा आपल्या खोलीवर बॉम्ब बनवण्यासाठी लागणारा टायमर तयार करीत होता व ते ठेवण्यासाठी एक लाकडी बॉक्सही तयार करीत होता. 


एका प्रसंगी तो जवळजवळ पकडला गेला असता. एकदा त्याला उठायला उशीर झाला तोपर्यंत रेस्टॉरंटचा दरवाजा उघडला होता. 

एका वेटरने त्याला इमारतीच्या आत बघितला आणि तो मॅनेजरला सांगण्यासाठी धावत गेला. प्रश्न विचारल्यावर एल्सर म्हणाला की तो फक्त एक लवकर आलेला ग्राहक होता. त्याने कॉफी ऑर्डर केली व ती पिऊन तो निघून गेला. 


एल्साने हॉलमध्ये जवळजवळ ३५ दिवस काम करून शेवटी ५० किलो स्फोटके व टायमर ठेवता येईल एवढी जागा तयार केली आता सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे स्फोटके आणि टायमर तिथे ठेवणे हे होते. 


एल्साने थोडे-थोडे करून सर्व स्फोटके त्या खांबांमधील खड्ड्यामध्ये ठेवले. त्याने खूप मेहनत घेऊन एक कार्यक्षम बॉम्ब तयार केला घड्याळ बदलून, त्याने एक टाइमर तयार केला जो लीव्हर सक्रिय करण्याआधी १४४ तास चालत राहील, ज्यामुळे स्प्रिंग्स व वेट्सची प्रणाली सुरू होईल जी स्फोटक द्रव्यात असलेल्या थेट राइफल फेरीमध्ये स्टील शटल सोडतील व त्यामुळे स्फोट होईल. जर एक टायमर अपयशी ठरला तर त्याने दुसरा टाइमर पण लावला होता.


खांबामध्ये खोदलेल्या खड्ड्यात तंतोतंत बसेल अशी एक सुंदर पेटी त्याने बनवली होती त्यात त्याने बनवलेला बॉम्ब बसवला होता टायमर च्या घड्याळाचा टिक टिक असा आवाज होऊ नये म्हणून त्याने आतल्या बाजूने कॉर्कचे आवरण दिले होते आणि लाकडी पॅनेलच्या आत पत्रा लावला होता. जर कोणत्याही बर्गरब्रॅकेलर कर्मचाऱ्यांने सजावट करण्यासाठी खांबावर खिळे ठोकले तर त्याचा बॉक्स सुरक्षित रहावा. 

जेव्हा तो बॉम्ब पूर्ण झाला तेव्हा त्याने बनविलेल्या बॉक्ससह तो हॉलमध्ये परतला आणि तो मोठा असल्याचे आढळले. त्याने बॉक्स परत आपल्या खोलीवर नेला व त्यात आवश्यक ते बदल करून दुसऱ्या दिवशी तो परत हॉलमध्ये बॉक्स ठेवण्यासाठी आला. त्याने व्यवस्थीतपणे बॉम्ब खांबामध्ये ठेवला व तीन दिवसांचे टायमर लावून रात्री ठीक ९ वाजून २० मिनिटाला बॉम्बचा स्फोट होईल असे टायमर लावून तो परतला. 


एल्साने संशोधन केले होते की हिटलर बर्गरब्रॅकेलर मध्ये ८.३० वाजता भाषण सुरू होत असे आणि ते ९० मिनिटांपर्यंत चालत असे आणि मग नाझींच्या अधिकार्‍यां बरोबर थांबत असे. त्या आधारावर, त्याने जेव्हा हिटलरचे भाषण अर्धावर आले असेल तेव्हा स्फोट घडून यावा असा टायमर लावला होता. एल्साने आपले काम संपवले केले व तो नऊ तारखेला सकाळी स्वित्झर्लंडच्या बॉर्डर कडे जाण्यास निघाला. 


ईथे म्युनिकमध्ये हिटलर आज जरा लवकरच हॉलमध्ये आला त्याचे भाषण सुद्धा साडेआठच्या ऐवजी आठ वाजता सुरू झाले व नऊ वाजता आपले भाषण संपवून तो घाई घाईने बाहेर निघून गेला कारण त्याला बर्लिनला एकदम तत्परतेने पोहोचायचे होते. खूप धुके असल्याकारणाने त्याचे विमान उड्डाण करू शकले नाही म्हणून तो रेल्वेने बर्लिनला जात होता. 


इथे हॉलमध्ये अजून नाझी अधिकारी व कर्मचारी बिअर पित बसले होते तेव्हढ्यात प्रचंड स्फोट होऊन हॉलचे छत कोसळले व त्याखाली ६ जण मरण पावले तसेच १०० जण जखमी झाले होते.. पण हिटलर मात्र त्यातून वाचला होता. ज्या वेळा म्युनिक मध्ये स्फोट झाला बरोबर त्याच वेळेस अर्ध्या तासानंतर एल्साला स्वित्झर्लंडच्या बॉर्डरवर पकडण्यात आले पुढे नाझी अधिकाऱ्यांनी एल्सावर खुप अत्याचार केले. एल्साला अनेक जणांनी ओळखले शेवटी त्याने कबूल केले की "I wanted to kill Hitler" एल्सावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला व ९ एप्रिल १९४५ ला त्याला डोक्यात गोळी घालून ठार मारण्यात आले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Action