The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Raju Gavali

Horror Tragedy Thriller Crime Action

4.7  

Raju Gavali

Horror Tragedy Thriller Crime Action

मी परत येईन..

मी परत येईन..

13 mins
841


रत्नागिरीहून चिपळूणला जाणारी लालपरी म्हणजे एसटी बस कोकणातील पावसाच्या धारा आपल्या अंगावर झेलीत भल्या मोठ्या काळ्या अजगरा सारख्या दिसणाऱ्या वेड्यावाकड्या वळणावरून चिपळूणच्या दिशेने जात होती. नऊ नंबरच्या सीटवर बसलेली साक्षी खिडकीतून बाहेर पाहत होती जप-जप मागे जाणारी ओलीचिंब झाडे पाहून आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटना एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून जाऊ लागल्या, ती आठ वर्षाची असताना आई वडील एका बस अपघातात मरण पावले, काका-काकीनां मुलं-बाळं नसल्याने त्यांनी साक्षीलाच स्वतःची मुलगी मानून मोठे केले व चांगले बी.एड पर्यंत शिक्षण दिले, तिला शिक्षिकेची एक चांगली नोकरी लागली होती त्यासाठी ती आज आंबेगावला चालली होती.


तिच्या विचारांची श्रुंखला तुटली ती जोरदार ब्रेक लागल्यामुळे अचानक एसटी समोर एक गाय आली होती पण ड्रायव्हरने वेळीच ब्रेक मारल्याने सुदैवाने अपघात टळला होता. बसमधील लाईट लागल्या आणि बस पुढे निघाली तेवढ्यात कंडक्टरने "आंबेगावला कोण उतरणार आहे का?" तशी साक्षी "हो मी आहे" अशी म्हणाली. कंडक्टरने बेल वाजवली तसा बसचा वेग कमी होऊ लागला आणि बस थांबली. साक्षी आपले सामान घेऊन खाली उतरली, तिने आपल्या मनगटावरील घड्याळ वर नजर टाकली, रात्रीचे दहा वाजले होते, तिने आजूबाजूला पाहिले पण कोणीच नव्हते ती विचार करू लागली की अजून दशरथ काका कसे आले नाही मला घ्यायला तसे मी त्यांना कळवले होते की मी आज येणार आहे ती. तेवढ्यात तिला काही अंतरावर टॉर्चचा प्रकाश दिसला, हळूहळू कुणीतरी आपल्या दिशेने येताना दिसलं जवळ येताच तिला एक साधारण ५० ते ५५ वयाची एक व्यक्ती दिसली, "साक्षी मॅडम तुम्हीच का?" त्यांचा काहीसा खोल आवाज तिच्या कानावर पडला तशी ती हो म्हणाली आणि लगेच विचारले "दशरथ काका तुम्हीच का?" त्यांनी फक्त मान डोलावली व म्हणाले "मॅडम माफ करा पाऊस खूप होता व लाईटही गेला आहे म्हणून यायला उशीर झाला चला निघूया नाहीतर परत पाऊस सुरू होईल" असे म्हणून त्याने बॅग उचलली व ते पुढे चालू लागले साक्षीही त्याच्या मागोमाग चालू लागली त्याच्याकडे पाहताना तिला जाणवत होते की दशरथ काका खूप थकल्यासारखे चालत होते प्रत्येक पाऊल मणभर वजनाचे होते काही अंतर चालल्यावर तिला एक इमारत दिसली, अंधार असल्यामुळे व्यवस्थित काही दिसत नव्हते, तेवढ्यात लाईट आली व इमारत स्पष्ट दिसू लागली. एक मोठ्या अर्धगोलाकार कमानीवर "आंबेगाव हायस्कूल" नाव लिहिले होते. आपण दोन दिवसानंतर याच शाळेत मुलांना शिकविण्यासाठी येणार आहोत याचा विचार मनात आल्यावर ती मनातल्या मनात हसत होती. "मॅडम या बाजूने या" दशरथ काका म्हणाले व ते इमारतीच्या बाजूने चालू लागले. शाळेच्या मागील भागात एक छोटेसे घर होते साक्षीची राहण्याची व्यवस्था तेथेच केली होती. दशरथ काकांनी कुलुप उघडले, सामान घेऊन ते आत गेले व लाईट लावले. "मॅडम तुम्ही हात-पाय धुऊन घ्या तोपर्यंत मी जेवणाची व्यवस्था करतो" साक्षी बॅगेतून टॉवेल व गाऊन काढून बाथरुममध्ये गेली, कपडे बदलून बाहेर आल्यावर ती किचनमध्ये गेली. दशरथ काका वरण भात गरम करून वाढत होते, त्यांनी ताट पुढे केले "काका तुम्ही नाही का जेवणार?" साक्षीने विचारले मॅडम गावाकडील लोकं लवकरच जेवतात" साक्षी दशरथ काकाने बनवलेला वरण भात आवडीने जेवत होती, काका तिच्याकडे पाहत होते तशी ती म्हणाली "काका एवढा चविष्ट वरण भात खूप वर्षांनी जेवले" साक्षीला आपल्या आईने बनवलेल्या वरणभाताची आठवण आली." मॅडम तुम्ही आराम करा मी सकाळी येईन" असे म्हणत दशरथ काका बाहेर निघून गेले. 


किचन मधील सर्व आटपून साक्षी बेडरूममध्ये आली, खूप छान मांडणी केली होती तेथे, बेड खिडकीजवळ होता व त्याच्या बाजूला ड्रेसिंग टेबल, समोरच पुस्तकाचे कपाट होते प्रवासामुळे दमायला झाले असल्याने साक्षीने पुस्तकाच्या कपाटाकडे दुर्लक्ष केले व ती बेडवर पडली तिला कधी झोप लागली ते कळलेच नाही. सकाळी जेव्हा कोंबडा आरवला तेव्हा साक्षीचा डोळा उघडला खूप प्रसन्न वाटत होते तीने खिडकीतुन बाहेर बघीतले, बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती घड्याळात सहा वाजले होते, खिडकी जवळ येऊन बाहेर पाहू लागली, घराबाहेरील अंगण फुल झाडानीं  नटलेल होते, विविध प्रकारच्या फुलझाडांनी आपले सौंदर्य पुरविले होते, खिडकी घराच्या बरोबर मागच्या बाजूला असल्यामुळे काही अंतरावर असलेली आमराई दिसत होती तेथून वाहणार्‍या नदीचा परिसर दिसत होता. तो स्वप्नात बघितलेल्या बागेप्रमाणे दिसत होता. साक्षीला खळखळणारी नदी साद घालत होती तशी ती नदीवर जाण्यासाठी तयार होऊ लागली. 


घरामागील छोट्या पायवाटेने ती आमराई पार करून गेल्यावर पुढे तिला नदी दिसू लागली. नदी दुथडी भरून वाहत होती, नदीचे लाल पाणी वेगाने वाहत होते, जवळच एक चांगला पक्का बांधलेला बांध होता साक्षी त्या बांधावर बसून नदीकडे पाहात होती, तेवढ्यात मॅडम असा दशरथ काकांचा आवाज तिच्या कानावर पडला तशी ती भानावर आली. "मी येथे आहे काका" दशरथ काका तिच्या जवळ येऊन म्हणाले "मॅडम चला घरी चहा नाश्ता बनवून देतो" दोघं घरी  परतली. चहा घेत असताना बाहेरून कोणीतरी "बाई ओ बाई" अशी हाक मारत होतं दशरथ काका व साक्षी दोघंही बाहेर आले "काय रे डिग्या कशाला हाका मारतोस?"  "मॅडम हा रावसाहेबांकडे कामाला असतो" तेवढ्यात डिग्या म्हणाला "मालकांनी तुम्ही आल्यात का ते बघायला सांगितलं होतं म्हणून मी आलो आणि आज सकाळी ११ वाजता ग्रामसभा आहे हे सांगायला मला पाठवलं हाय." "हो येईन" साक्षी म्हणाली. 


साक्षी २२ वर्षाची झाली होती खूप गोरी नव्हती पण गव्हाळ वर्णामुळे खूप आकर्षक दिसत होती. लहानपणापासून मैदानी खेळ व पोहण्याची आवड असल्यामुळे तिची शरीरयष्टी खूप कमानीय होती कमरेपर्यंत येणारे तिथे काळेभोर केस अतिशय सुंदर दिसत होते. तीचे बदामी रंगाचे डोळे व तरतरीत नाकामुळे तीचा चेहरा खूपच सुंदर व आकर्षक दिसत होता. साक्षीने आज गुलाबी रंगाची साडी नेसली होती व ती दशरथ काकां बरोबर रावसाहेबांच्या वाड्यावर जाण्यासाठी निघाली.

सर्जेराव ईनामदार यांना सर्व गाव रावसाहेब म्हणून ओळखत होते. इंग्रजांकडून त्यांच्या पूर्वजांना आंबेगावची बरीचशी जागा जमीन मिळाली होती पण रावसाहेबांचे वडील फार 'शौकीन' तब्येतीचे होते त्यामुळे त्यांनी आपली दौलत दोन्ही हाताने उधळली होती, तरीही आता रावसाहेबांकडे खूप शेतजमीन होती तीसुद्धा नदीकाठची, सोन्याच्या किमतीची. रावसाहेब साधारण ३८ ते ४० वर्षांचे होते. व्यायामामुळे शरीर पिळदार, उंची साधारण सहा फूट इतकी असल्यामुळे  खूप ताकदवान दिसत. चेहर्‍यावर पिळदार मिशा व  गालापासून हनुवटी पर्यंत दाट जंगला सारखी दाढी होती. त्यांच्या चेहऱ्याकडे कोणी जास्त पाहत नसत कारण त्यांचे डोळे भेदक घारे होते, आवाज घोगरा होता म्हणून ते जास्त बोलत नसत. घरात म्हातारी आई आणि बायको होती पत्नी साधारण दिसणारी होती काही लोक म्हणत रावसाहेबांना खुप हुंडा मिळाला होता म्हणून अशी बायको पत्करली होती. 

बाहेरच्या मोठ्या हॉलमध्ये ग्रामसभा भरली होती गावाचे सरपंच, पोलिस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक व प्रमुख गावकरी उपस्थित होते. साक्षीने हॉलमध्ये प्रवेश केल्यावर ती मागच्या रांगेतील एका खुर्चीत बसली सरपंचांनी सर्वांना साक्षीची ओळख करून दिली सर्वांनी टाळ्या वाजवून तीचे स्वागत केले. सभा सुरू झाली गावातील अनेक समस्यांवर चर्चा करून निर्णय घेतले जात होते साक्षी मात्र सर्व काही पाहत होती पण तिला उगीचच असे वाटत होते की रावसाहेब समोरुन तिच्याकडे बर्‍याचदा पाहत होते. सभा संपली तसे एकेक जण जाऊ लागले साक्षी ही मुख्याध्यापकांना भेटून जाणार होती इतक्यात "ओ बाईसाहेब" असा एक घोघरा स्वर तिच्या कानावर पडला साक्षीने त्या दिशेने पाहिले तर रावसाहेब तिलाच बोलवत होते, साक्षी हळूहळू त्यांच्या समोर गेली व नमस्कार केला तसे राव साहेब म्हणाले "असुदेत बाईसाहेब आमच्या शाळेतील मुले थोडी हळू शिकणारी आहे, त्यांना तुम्ही नीट शिकवा, काही मदत लागली की निरोप पाठवा." साक्षी हो म्हणून वाड्याबाहेर पडली व दशरथ काकांबरोबर आपल्या घराकडे चालू लागली पण घरी येईपर्यंत तिला रावसाहेबांचे घारे डोळे आठवत होते किती विचित्र वाटत होते त्यांच्या डोळ्यांकडे बघून. घरी परतल्यावर दशरथ काका व साक्षीने मिळून दुपारचे जेवण बनवले. साक्षीने दशरथ काकांना तेथेच जेवण्याचा आग्रह केला तो आग्रह काका काही टाळू शकले नाही.


दुपारचे जेवण आटपून दशरथ काका आपल्या घराकडे निघून गेले आणि साक्षी पुस्तकांच्या कपाटाकडे वळली, सर्व पुस्तकांवरून नजर फिरवत असताना तिची नजर "विसरलेले साम्राज्य" या पुस्तकावर पडली. इतिहास हा तिचा आवडीचा विषय असल्यामुळे तिने ते पुस्तक काढले व ती बेडवर पडून वाचू लागली. सायंकाळी मुख्याध्यापक बापट सर घरी आले व सोमवारपासून शाळेत येण्याचे सांगून गेले. साक्षीने रात्रीचे जेवण आटपले व झोपण्यासाठी बेडरूममध्ये आली आज संध्याकाळपासून जोराचा वारा व पाऊस सुरू झाला होता वीजाही कडाडत  होत्या. बेडरूमच्या खिडकीचे दरवाजे जुन्या लाकडी पद्धतीचे होते त्यामुळे ते सारखे वाजत होते विजांच्या कडकडाटांचा आवाज साक्षीला अस्वस्थ करीत होता त्यामुळे तिला झोप येत नव्हती. रात्रीचा दीड वाजला होता तरी ती तशीच बेडवर पडून होती अचानक जोरदार वाऱ्यामुळे खिडकीचे दार आपटले आणि उघडले वाऱ्यासह पावसाच्या थेंबांचे तुषार सरळ साक्षीच्या तोंडावर पडले तशी साक्षी दचकली व उठून खिडकीचे दार बंद करण्यासाठी उठली दार लावत असताना तिची नजर आमराईच्या दिशेने पडली तशी ती थबकली तिचे हात होते तेथेच गोठले बाहेर आमराईत कुणाचीतरी अस्पष्ट आकृती दिसत होती. हळू हळू ती आकृती खिडकीच्या दिशेने येऊ लागली, साक्षी घाबरली होती म्हणून तिने पटकन खिडकी बंद केली व ती बाहेर आवाज येतो का हे पाहण्यासाठी  ती खिडकी जवळ आली पण पावसाच्या जोरदार आवाजामुळे तिला काहीही ऐकू येत नव्हतं. साक्षी विचार करू लागली की खरंच तिने काही पाहिलं की तो फक्त तिचा भास होता. शहानिशा करण्यासाठी ती उठून पुन्हा खिडकी उघडण्यासाठी आली. पाऊस अजूनही जोरात कोसळत होता साक्षीने हळूच खिडकीचे दार उघडले आणि ती एकदम जोरात किंचाळली "आई ग ऽ.." बाहेर एक स्त्री उभी होती अगदी खिडकीपासून दहा-बारा फुटांच्या अंतरावर  तीच्या अंगावरचा सलवारसूट बऱ्याच ठिकाणी फाटला होता, चेहर्‍यावर व अंगावर जखमा दिसत होत्या, चेहरा व देह पांढरा पडला होता जणू काही अंगात रक्ताचा एकही थेंब नव्हता. तीच्या गळ्याभोवती मिळसर लाल रंगाचा एक भला मोठा व्रण होता. साक्षीकडे पाहत ती जोर जोरात रडत होती. साक्षीने धीर एकटवून विचारले "कोण आहेस तू? आणि एवढ्या रात्री पावसात का भिजत उभी आहेस? तुझ्या शरीरावर जखमा कशा झाल्या?" पण समोरची स्त्री फक्त रडत होती. साक्षीने विचार केला की बाहेर जाऊन तिला घरात आणावे म्हणून ती छत्री घेऊन बाहेर खिडकी जवळ आली पण काय… बाहेर तर कोणीच नव्हतं साक्षीने टॉर्चच्या उजेडात सगळीकडे बघितलं पण तिथे कुणीच नव्हतं अचानक तिच्या पायाजवळ काहीतरी चमकत आहे असे तीला दिसले. तिने ती वस्तू उचलली, ते एक पैंजण होते. साक्षी ते पैंजण घेऊन घरात आली. ड्रेसिंग टेबलवर पैंजण ठेवून तिने बाथरूम मध्ये जाऊन ओले कपडे बदलले. बेडरूम मध्ये येऊन बेडजवळच्या खुर्चीत बसून घडलेल्या घटनेचा विचार करू लागली. तीने नेमके काय पाहिले व अनुभवले. तिच्या आयुष्यात यापूर्वी कधीही असे घडले नव्हते. खुर्चीवर बसूनच उरलेली रात्र काढली.


सकाळी सातच्या सुमारास दरवाज्याची कडी वाजली साक्षीने दरवाजा उघडला तर समोर दशरथ काका उभे होते "या दशरथ काका बरं झालं तुम्ही आलात ते" "काय झालं मॅडम" दशरथ काका ने विचारले व ते किचनमध्ये निघून गेले. आज रविवार असल्याने साक्षी घरीच होती दशरथ काका बेडरूम मध्ये चहा घेऊन आले "कुठे ठेवू मॅडम?" "ठेवा टेबलावर" साक्षी बोलली. दशरथ काकांनी चहाचा कप टेबलावर ठेवला तो ठेवून वळणारच होते तेवढ्यात त्यांची नजर टेबलवर ठेवलेल्या पैंजणा वर पडली व ते काही वेळ त्याला बघतच राहिले जणू त्याला ओळखण्याचा प्रयत्न करीत होते, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले साक्षीचे लक्ष दशरथ काकांकडे गेले व ती  उठून दशरथ काकांकडे आली "काय झाले काका?" दशरथ काका ने अश्रू पुसत पैंजण दाखवले "काका पैंजण का दाखवताय मला" दशरथ काकांचा गळा दाटला होता, शब्द येऊन गळ्यात अडकले होते, मोठ्या प्रयत्नाने ते म्हणाले "हा पैंजण माझ्या लेकीचा आहे," "माझ्या रूपाचं आहे" त्यांचे शब्द ऐकताच साक्षीचे पाय एकदम गळून गेले पण तिने स्वतःला सावरले, बेडचा आधार घेत खाली बसली. "आज जवळजवळ एक वर्ष झाले रूपा गावातून अचानक गायब झाली, खूप खूप शोधलं मी व गावकऱ्यांनी, पोलिसांनी पण खूप शोधलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही". दशरथ काकांचे अश्रु थांबत नव्हते, "माझी रूपा आई नसलेले लेकरू होतं, मी तिचा बाप आणि आई पण होतो लहानाचं मोठं केलं याच आंबेगाव शाळेत शिकली, पुढे कॉलेजमध्ये गेली. गेल्याच वर्षी शेवटच्या वर्षाचा निकाल लागायच्या आधी अचानक गायब झाली काहीजण म्हणतात गेल्या वर्षीच्या पुरात वाहून गेली असेल ती सारखी नदीवर फिरायला व पोहायला जात होती, काहीजण म्हणतात की ती आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली असेल पण मला माझ्या रूपावर खूप विश्वास आहे लवकरच येईल आपल्या बापाला ती सोडून जाणार नाही" काका पैंजण आपल्या मुठीत घेऊन साक्षीला विचारू लागले "मॅडम तुम्हाला कुठे मिळाले हे पैंजण?" रात्री घडलेला सर्व प्रकार दशरथ काकांना सांगितले तसे काका भानावर आले व म्हणाले  "म्हणजे माझी रुपा येथे गावातच आहे मी तिला शोधायला जातो" असे म्हणून लगबगीने घराबाहेर पडले. सायंकाळी उशिरा ते परतले त्यांनी पावसा-पाण्याची पर्वा न करता आंबेगाव पालथा घातला होता. तरी तिचा काही पत्ता लागला नाही. साक्षीने दशरथ काकांना आज तिथेच थांबण्याची विनंती केली. 


रात्रीचे जेवण आटोपून  दोघंही हॉलमध्ये  बसून रुपा बद्दलच बोलत होते. काका म्हणत होते "मॅडम रुपा रंगाने तुमच्या पेक्षा थोडी उजवी होती, तिचे केस कमरेपर्यंत वाढले होते व तिला मोकळे ठेवायला आवडत असत. खूप बोलकी होती, दिवसभर तोंड चालू असायचं आणि आत्ता तिचा एक शब्द ऐकण्यासाठी जीव व्याकुळ झाला आहे" साक्षी बेडवर पडून झोपण्याचा प्रयत्न करु लागली पण तिचे मन अस्वस्थ असल्याकारणाने झोप काही येत नव्हती. रूपाबद्दल विचार करून तिला काय झाले असेल असा विचार सतत तिच्या मनात घोळत होता. काका बाहेर हॉलमधील सोफ्यावरच पडले होते दिवसभर पावसातून रूपाला शोधून खूप दमले होते म्हणून त्यांचा डोळा लागला होता. रात्रीचा एक वाजला असेल तेवढ्यात खिडकीच्या दारावर कोणीतरी थाप मारत असल्यासारखा आवाज येऊ लागला. साक्षीने लगेच जाऊन काकांना उठवले व ती दोघं बेडरूमच्या खिडकीजवळ आली. काकांनी खिडकीचे दार उघडले बाहेरचे दृश्य पाहून त्याचे डोळे एकदम मोठे झाले होते. बाहेर रूपा उभी होती.. साक्षीने पाहिले की ती कालच्या सारखीच रडत होती. तिची अवस्था पाहून दशरथ काका धावतच बाहेर गेले, पाठोपाठ साक्षीही गेली, बाहेर येऊन पाहतात तर काय रूपा त्यांच्याकडे पाहत उभी होती. काका तिला आपल्या मिठीत घ्यायला धावले पण ते रूपाच्या आरपार निघून गेले रुपा त्यांच्या मिठीत आलीच नाही कारण ती रूपा नव्हती तो तीचा आत्मा होता हे पाहून साक्षी घाबरली होती पण ती तिथेच थांबली. "मी आले बाबा" तिचा आवाज खोल विहिरीतून आल्यासारखा वाटत होता. दशरथ काकांची अवस्था खूप वाईट होती. "कुठे होतीस तू?" तशी रूपा बोलली "बाबा, मी आता या जगात नाही गेल्या एक वर्षापासून याच आमराईत भटकतेय, जो पर्यंत त्या  हरामखोराला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा देत नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही" दशरथ काका व साक्षीचे अश्रू थांबत नव्हते. "गेल्या वर्षी त्या नराधमाने मी नदीवर पोहत असताना मला उचलून आपल्या शेतघरात नेऊन माझ्यावर बलात्कार केला, मी खूप रडले, खुप प्रतिकार केला पण मी माझी अब्रू वाचवू शकले नाही. त्याने माझी अब्रु लुटली हे मी गावात सर्वांना सांगीन असे म्हटल्यावर त्याने आपल्या हाताने माझा गळा दाबला व मला आपल्या शेत घराच्या मागे पुरले." हे ऐकून दशरथ काकांचा  चेहरा रागाने लाल झाला… डोळे पेटत्या विस्तवा सारखे लालबुंद झाले होते. "कुठे आहे तो हरामखोर? नाव सांग त्याचं आत्ताच जाऊन त्याचा मुंडके धडावेगळं करतो.. तशी रूपा म्हणाली "त्या नराधमाचे नाव रावसाहेब आहे." बाबा तुम्ही अशा माणसाच्या रक्ताने तुम्ही आपले हात माखून घेऊ नका… माझ्यावर केलेले अत्याचार मला सर्वांसमोर आणायचे आहे" साक्षी हे सर्व ऐकत होती ती दशरथ काकांच्या जवळ येऊन रुपाकडे पाहत म्हणाली "माझी काही ओळख ना पाळख मग तू माझ्याकडे कशी आलीस सर्व काही सांगायला" तशी रूपा म्हणाली" साक्षी मी सूक्ष्म रूपात आहे मी कुणाच्या शरीराला स्पर्श करू शकत नाही म्हणून तुझ्याकडे मदत मागायला आले आहे" "बाबांना जर सांगितलं असतं तर त्यांनी त्याचे कधीच तुकडे-तुकडे केले असते, पण मला तसे नको होते मी जायची ती गेले पण  माझ्या बाबांनी त्याचा त्रास सहन करू नये म्हणून मी तुझ्याकडे आले" दशरथ काका व साक्षीने रूपाला मदत करण्याचे व त्या नराधमाला त्याच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागेल असे वचन दिले. हे ऐकताच रुपा आपल्या बाबांना महणाली  "बाबा मला आता गेले पाहिजे…" असे सांगून ती अमराईकडे जाता-जाता अदृश्य झाली.  साक्षी व दशरथ काका खूप दुःखी होवून घरात आले. 


दुसऱ्या दिवशी दोघंही तालुक्यातील पोलीस स्टेशनला गेले व त्यांनी रूपा बरोबर घडलेली घटना इन्स्पेक्टर जाधवांना सांगितली. तसे इन्स्पेक्टर जाधव म्हणाले "तुम्ही पुढे व्हा मी सर्च वॉरंट घेऊन  गावात पोहोचतो" इन्स्पेक्टर जाधव व पाच कॉन्स्टेबल आंबेगावाकडे तपास कामासाठी निघाले. रावसाहेबांच्या वाड्यासमोर पोलिसांचा ताफा पाहून गावकरी जमा झाले. पोलीस इन्स्पेक्टर जाधव यांनी रावसाहेबांना सर्च-वॉरंट दाखवले व आपल्या  शेतघराकडे घेऊन जाण्यास सांगितले. रावसाहेबांना प्रचंड राग आला होता पण जमलेल्या गावकऱ्यांसमोर आपण खोटं पडू नये याचा विचार आल्यावर ते जीप मध्ये जाऊन बसले. जीप शेतघरावर पोहोचली. इन्स्पेक्टर जाधव व पाचही कॉन्स्टेबलांनी आजूबाजूचा परिसर शोधला पण काही सापडले नाही. सर्व परिसर शोधेपर्यंत जवळ-जवळ रात्र झाली, तेवढ्यात एका कॉन्स्टेबला घरच्या मागील शेताजवळ नवीन झाडं लावलेली दिसली, त्याने इन्सपेक्टर जाधवांना हाक मारली "साहेब इथे या" तसे इन्स्पेक्टर जाधव त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी तेथे खोदण्यासाठी सांगितले. तीन-चार फूट खोदल्यावर त्यांना मानवी शरीराचे अवषेश आढळले. मिळालेल्या कपड्यांवरून ते रुपाचेच आहे असे दशरथ काकाने सांगितले. सापडलेल्या शरीराचे अवशेष रुपाचेच आहे हे सिद्ध झाले. फॉरेन्सिक तज्ञांनी नमुने गोळा करून लॅबमध्ये पाठवून दिले. अवशेषांची पाहणी करताना इन्स्पेक्टर जाधवांना हाताच्या बाजूला काहीतरी पडले असल्याचे दिसले. त्यांनी आपल्या खिशातील पेनाने ती चमकणारी वस्तू उचलली ती एक अंगठी होती, आकारा व मापावरून ती पुरुषाची असावी असा अंदाज इन्सपेक्टर जाधवांनी बांधला. थोडीशी फिरवल्यावर त्यांना अंगठीच्या आतल्या बाजूला "रावसाहेब" अशी अक्षरे कोरलेली स्पष्ट दिसली, एवढा भक्कम पुरावा मिळाल्यावर इन्सपेक्टर जाधवांनी रावसाहेबांना अटक केली. रावसाहेब जीपकडे चालले होते, त्यांची मान शरमेने खाली झाली होती पण मनात रागाचा लावा उसळत होता ते जिपमध्ये बसल्यावर जीप पुढे निघाली, टेकडी जवळ येताच जोराचा पाऊस सुरू झाला, विजा कडाडू लागल्या, जीपच्या ड्रायव्हरचा ताबा सुटू लागला, जीप झाडावर आदळली, आतील सर्वांना दुखापत झाली होती. रावसाहेबांच्या डोक्याला मार लागला होता व त्यातून रक्त वाहत होते. रावसाहेब कसेबसे बाहेर पडले, बाहेर खूप अंधार होता, अचानक वीज चमकली आणि त्या विजेच्या प्रकाशात रावसाहेब जेथे उभे होते तेथून केवळ चार पाच फुटावर रावसाहेबांना रूपा उभी असलेली दिसली, आता रुपाच्या डोळ्यात अश्रू नव्हते त्या जागी पेटते निखारे होते, तिचे लांब केस मोकळे होऊन हवेत उडत होते, काहीश्या विचित्र आवाजात ती म्हणाली "चांडाळा, मी तुला सांगितले होते कि मी परत येईन बघ मी परत आलेय" तिचे ते रूप पाहून दगडी काळजाचे रावसाहेब पण दचकले, ते एकदम मागे सरकले व त्यांचा पाय नेमका टेकडीच्या कठड्यावरून खाली गेला त्यांचा तोल गेला व ते खाली पडले, त्यांचं डोकं एका मोठ्या दगडावर आपटलं व त्यांचा तेथेच मृत्यू झाला.


इन्स्पेक्टर जाधवांनी वायरलेस वरून जिल्ह्याच्या ठिकाणी घटनेची माहिती दिली. दोन दिवसांनी ते अवशेष रुपाचेच असल्याची लॅब मधून खात्रीलायक बातमी आली. वर्तमानपत्रात रावसाहेबांनी रूपाचा खुन केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. साक्षीच्या हातात ते वर्तनमानपत्र होते. समोरच बसलेले दशरथ काका तिच्याकडे पाहत होते दशरथ काकांना साक्षीच्या चेहऱ्यात रूपाचा चेहरा दिसत होता… 


सुचना :- ( ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी तीचा संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग आहे असे समजावे)Rate this content
Log in

More marathi story from Raju Gavali

Similar marathi story from Horror