आवडतं व्यसन
आवडतं व्यसन


अगं किती प्यायली आहेस? एवढं पिणं चांगल नाही तब्बेतीला? आजारी पडशिल गं ! अरे आत्ता कुठे तीन वेळा तर प्यायले ,अजून एकदा पिऊ दे फक्त! असं एक एक घोट घेतला ना की खूप बरं वाटतं मला. त्या प्रत्येक घोटा बरोबर मन कसं तृप्त होत जातं , तो एक घोट ओठांना स्पर्शून, जिव्हा च्या साथीने हळूच घशाच्या वरून धबधब्या सारखाच कोसळतो,आणि मग अगदी हळूवार पोटात जाऊन अलगद पडतो,आणि ती भावनाच मुळात एवढी छान आहे ना, की ,परत परत पिण्यासाठी मन आसुसलेलं होतं, एक ओढ लागलेली असते, परत पिण्यासाठी , अमृततुल्य पेय आहे हे, व्वा! काही खरं नाही तुझं, मग नंतर खूप आजारी पडल्यावर ,मग माझ्या कडुन तु अवास्तव अपेक्षा ठेवू नकोस हा! पाय चेपुन दे डोकं चेपुन दे,मी नाही करणार बाबा! हो ,हो,असं बोलतोस ना, जसं काही खूप करतोस बायकोचं ?? ते सोड, पितो का तू पणं? माझ्या जोडीला? नको तू पण नको पिऊ आणि मलाही प्यायला भाग नको पाडु! पि रे ,काही होत नाही, उलट मेंदू जास्त जोमाने कामं करायला लागतो ,अगदी तरतरी येते त्याला , नवे धैर्य, नवी दिशा,नवे स्वप्नं ,नवी आशा! हो आणि मग ,नवे आजार, नवी तपासणी, नवे औषध, नवी डोकेदुखी! तुझं ना आपलं काहीतरीचं रे ! अगदी अरसिकच आहेस तू ,तुला ना कुठल्या गोष्टीचा आस्वाद नाही घेता येत! अहो मॅडम, आस्वाद जेवढा झेपतो ना तेवढाचं घ्यावा, अति करून आस्वादाचं ,व्यसनात रूपांतर कधी होतं ना कळत नाही माणसाला! आणि मग माणुस त्या व्यसनरूपी आस्वादाच्या सवयीमुळे कायमचाच त्या अति आस्वादात अडकून पडतो.हे बघ ,नैना कुठलीही सवय एका मर्यादे पर्यंतच चांगली सगळया दृष्टीने! अति झालं ना की ते विषंच असतं! अरे पण मला चैनच नाही पडतं,मी काय करू ? खूप प्रयत्न केला पण नाही रोखू शकत मी स्वतःला ,एक बेचैनी जाणवते, आणि मन ऐकत नाही, मग काय आपोआपच पाऊले तिकडेच वळतात, जिकडे ते आवडते पेयं ठेवलेले असते. नाही सोडू शकत मी हे व्यसन, वेडी होऊच जाईन मी.माझा त्रास, डोकेदुखी, निराशा,बेचैनी, खराब मूड, माझी चिडचिड सगळयांवर हा एकच रामबाण उपाय आहे फक्त. मी आणि माझं आवडतं पेयं, माझं आवडतं व्यसनच समझं.एक वेळ तुला सोडेन, व्यसन नाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽही सोडणार! चल मी अजुन एकदा माझ्या आवडीचं पेयं प्यायला चालली, तुही माझ्याबरोबर प्यायला असतास बरं वाटलं असतं मला, एकदा घेतोस का? अगं किती कप चहा पीत असतेस,ञास होईल ना,रोज बोलणी खातेसं माझी, तरीही? ये रे माझ्या मागल्या! एकच कप ,शेवटचा, आजच्या दिवसातला,आलं किसून किंवा आलं ठेचून घालून केलेला मस्त अमृततुल्य वाफाळता गरमगरम चहा! अहाहा! आलेच चहा ठेवून, बघ माझी पाऊले वळली आहेत स्वयंपाक घराच्या दिशेने, आलेच चहा ठेवून पटकन. तु म्हणजे ना खरंच चहाची व्यसनीचं आहेस!
हे दोघेही एवढा वेळ चहा बद्दल बोलत होते, तुम्हाला काय वाटलं,कसलं व्यसन??