आनंदी - गोपाळ ( चित्रपट समीक्षण )
आनंदी - गोपाळ ( चित्रपट समीक्षण )
आनंदी गोपाळ ( चित्रपट समीक्षण )
मी कोणी फार मोठी समीक्षक वगैरे नाही तरीही स्टोरीमीररवरील स्पर्धेच्या निमित्ताने , मी आज समीक्षा करणार आहे , पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित " आनंदी-गोपाळ " मराठी चित्रपटाची.
या चित्रपटात आनंदीजी यांचा जीवनाच्या संघर्षमय प्रवासाचं सुरेख चित्रण केलेल आहे...!!
त्या काळी सुरू असलेल्या बालविवाह या प्रथेप्रमाणे आनंदी जी यांचा विवाह त्यांच्या वयापेक्षा खुप मोठे असलेले त्यांचे पती गोपाळ जोशी यांच्याशी झाला. गोपाळ जोशी हे मितभाषी होते. परंतु ते जुन्या चालीरिती फारशा मानणारे नव्हते. ते बाजारात फिरतानाही आपल्या पत्नीचा हात धरून चालत असत. आपल्या पत्नीने सुशिक्षित असावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी आपली पत्नी आनंदीबाई यांचे शिक्षण चालू केले , सर्वांचा विरोध पत्करून. इतकेच नव्हे तर त्यांना शिक्षित करून डॉक्टरही बनवले. सुरुवातीला आपल्या पतींचा स्वभावाशी जुळवून घेण्यात आनंदीबाईंना थोडे कष्ट पडले , परंतु नंतर मात्र आनंदीबाईंनी गोपाळरावांच्या स्वभावाशी छान जुळवून घेतले.
काही काळ त्यांना आपल्या पतीसोबत अलिबागला राहायला लागले. तेथे त्यांनी आपल्या पतींची खूप साथ दिली. मासिक पाळी संदर्भातील नियम पाळण्यासही गोपाळ जोशी यांनी विरोध केला. सुरवातीला आनंदीबाई यांचे मन मानत नसले तरी नंतर मात्र त्यांना गोपाळरावांचे म्हणणे पटले. त्यांनी गोपाळरावांच्या म्हणण्यानुसार वागण्यास सुरुवात केली.गोपाळरावांची इच्छा होती की आनंदीबाईंनी डॉक्टर बनावे. त्यासाठी गोपाळरावांनी खूप मेहनत घेतली.
यासाठी लागणारे पत्र व कागदपत्रांचे काम गोपाळरावांनी बिनचूक केले. काही काळ ते कलकत्ता या प्रांतातही राहिले. त्यांना लोकांनी खुप विरोध केला , अगदी त्यांच्या दरवाजात कचराही आणून टाकला , पण त्याही परिस्थितीत न डगमगता गोपाळराव जोशी यांनी आनंदीबाई यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले व आनंदीबाईंनीही त्यांच्या या महान कार्यात त्यांना मोलाची साथ दिली.
डॉक्टर बनण्यासाठी आनंदीबाईंना ख्रिस्ती कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावे लागणार होते. त्यासाठी ख्रिस्ती लोकांनी त्यांना धर्म बदलण्याचे आवाहन केले परंतु आनंदीबाईंनी ठामपणे या गोष्टीला नकार दिला व आपला धर्म न बदलता त्या दुसऱ्या देशात जाऊन शिक्षण घेऊ लागल्या.तिथेही त्यांना त्या देशातील मुलींनी सुरुवातीला खूप त्रास दिला. शिक्षणासाठी गोपाळरावांना भारतात सोडून जाताना निरोप घेणं त्यांच्या जीवावर आलं होतं पण तरीही त्यांनी सर्व कष्ट सहन करून खूप जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले व
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला....!!
पण दुर्दैवाने मात्र त्यांची पाठ सोडली नाही व त्यांना क्षयरोग झाला व त्यातच त्या दगावल्या पण जाताजाता त्यांनी मेडिकल क्षेत्राचे तसेच स्त्री शिक्षणाचे दरवाजे महिलांसाठी उघडे करून दिले...!!
प्रत्येक क्षेत्रात अफाट कर्तृत्व गाजवणाऱ्या सर्व महिलांना व भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना मानाचा मुजरा...
( ज्यांनी आनंदी-गोपाळ हा चित्रपट पाहिला नसेल , त्यांनी आवर्जून हा चित्रपट पहावा ही नम्र विनंती...)
