राजा असावा तर असा...!!
राजा असावा तर असा...!!
खूप खूप वर्षांपुर्वी "राजा देवव्रत " "सुरतनगर " नावाच्या राज्यावर , गुण्यागोविंदानं राज्य करत होता...!!
राजा खुप कर्तबगार, धार्मीक व परोपकारी होता. प्रजाही राजावर खुप खुश होती. कधी कुठली नैसर्गिक आपत्ती आली, किंवा दुसरं कुठलं संकट आलं तर, राजा उदारहस्ते प्रजेची मदत करत असे. राजा त्याच्या याच स्वभावामुळे, त्याच्या प्रजेत लोकप्रिय होता. राजाची आपल्या प्रजेवर ,पुत्रवत माया होती.
राजाला पुष्पलता व कमलांगी ,अशा नावांच्या दोन राण्या होत्या. राणी पुष्पलताचं ,अगोदर पट्टराणी होती राजाची, पण कमलांगी आल्यानंतर ,राजाने तीलाच आपली पट्टराणी बनवलं होतं. राणी कमलांगीकडे ,राजाच्या प्रेमाचं पारडं, झुकलेलं असायचं सदा....!!
राणी पुष्पलताला एक कन्या होती. तीचे नेत्र आखीव-रेखीव होते , त्यामुळे तीचं नाव सुनैना ठेवण्यात आले होते , पण दोन राण्या असूनही ,राजाला पुत्ररत्नाचा लाभ झाला नव्हता.
आपल्यानंतर राज्याला वारस कोणं ??
राजकुमारी सुनैना तर विवाहानंतर सासरी जाईल ,
मग कोण हाकणार हा राज्याचा गाडा....??
हे प्रश्न नेहमीचं राजाचे मन पोखरत असतं...!!
राजाचं राज्य चालवण्याचं कसब, खूपचं भारी होत. राजाप्रमाणे त्याच मंत्रीमंडळही, कार्यतत्पर व अष्टपैलू होत. सर्वच मंत्र्यांबरोबर राजाचे मैत्रीपूर्ण संबंध होते, पण प्रधानाला विशेष जागा होती राजाच्या मनात. प्रधान होताच तसा , राजाच्या चेहऱ्यावरची एक जरी रेष हलली, तरी त्याला समजत असे. तो तत्काळ राजाच्या चिंतेच कारण ओळखून, ते दुर करत असे.
आताही राजाला असं चिंतेत पाहून, प्रधानाच्या हृदयात कालवाकालव झाली व त्याने या समस्येवर ,काहीतरी उपाय शोधण्याचे ठरवले. यासाठी आजुबाजुच्या राज्यांमध्ये फिरणं आवश्यक होतं . म्हणून प्रधानाने भर दरबारात, राजासमोर , आपली तब्येत ठिक नसल्याचा बहाणा केला व आपलं दैनंदिन काम महामंत्र्यावर सोपवलं. मग प्रधान गुप्तपणे आपल्या कामगिरीवर निघाला.
अनेक राज्यांमध्ये फिरुनही प्रधानाला आवश्यक ती माहिती मिळाली नाही , त्यामुळे प्रधानालाही चिंता वाटू लागली. उदास मनाने तो सुरतनगरला परत येणार होता, कारण पंधरा-वीस दिवस उलटूनही काहीच उपाय सापडला नव्हता....!!
मग प्रधान निराश होऊन ,जंगलात जाऊन, एका झाडाखाली रडत बसतो. आपण काहीचं करु शकत नाही राजासाठी , आपल्या जीवलग मित्रासाठी, असा विचार येत असतो त्याच्या मनात, मग तो खूपचं निराश होऊन, झाडाजवळ असणाऱ्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. तो विहिरीच्या कठड्यावर उभा राहून ,उडीचं मारणार असतो ईतक्यात...,
एक जादूचं होते....,
अचानक ती विहीर अदृश्य होते व तीथे, वनदेवता प्रकट होते. वनदेवतेच्या अंगावर हिरवी साडी असते. हातात त्रिशूळ असतो, डोक्यावर मुकुट असतो. नजरेत भरण्यासारखचं असतं वनदेवतेचं सौंदर्य . प्रधान भारावल्यासारखा ,पाहतचं राहतो वनदेवतेकडे. वनदेवता मात्र ,प्रधानाकडे क्रोधीत नजरेने पाहत उभी असते . प्रधानाचं हे कृत्य तीला मुळीचं आवडलेल नसत.
वनदेवी रागाने प्रधानाला विचारते...,
" मुर्ख मानवा , किती मोठा अपराध करणार होतास तू आता. हे दैवी देणगी असलेलं आयुष्य, नष्ट करु पाहत होतास...??"
प्रधान : - " देवीमाते तुच सांग मग मी काय करु ??"
" जगुन काय उपयोग आहे माझा. मी माझ्या जीवलग मित्रासाठी काहीचं करु शकत नाही ".
वनदेवी : - " अशी कुठलीचं समस्या अस्तीत्वात नसेल, जीच्यावर काहीचं उपाय नाही , शिवाय आत्महत्या..., हे समाधान नाहीचं , कुठल्याचं समस्येचं."
प्रधान : - " क्षमा असावी वनदेवी ..." (वनदेवीसमोर हात जोडत प्रधान म्हणाला.)
" भावनेच्या भरात मी चुकीचं पाऊल उचलत होतो , माफ करा मला. "
वनदेवी : - " तुझी चुक तुला कळली ना, मग झालं तर, मी ही माफ केलं तुला " ( वनदेवी स्मीतहास्य करत म्हणाली. )
" बोल अशी काय समस्या आहे , ज्यामुळे तु हा चुकीचा मार्ग निवडला होतास..."
हे ऐकूनचं प्रधानाचं मन प्रसन्न झालं . आता काहीतरी उपाय नक्कीच मिळेल आपल्या राजांसाठी असा मनोमन विचार करून प्रधानाने राजाची समस्या सवीस्तरपणे वनदेवीला सांगीतली.
" बस् , ईतकचं ना?? "
असं म्हणून वनदेवीने आपले डोळे मिटले व एक जादूई मंत्र म्हटला.
" ॐ संतानलक्ष्मी प्रसन्नमस्तु...!!"
आणी काय आश्र्चर्य...
वनदेवीसमोर एक गाय हजर झाली....!!
" ही कामधेनू गाय आहे वत्स , दोन्ही राण्यांनी सकाळी ऊपाशीपोटी , स्नान करुन या गाईची पुजा करायची. गाईला नैवेद्य द्यायचा व गाईच्या कानात आपली इच्छा सांगायची. "
असं केल्यावर नक्कीचं पुत्रप्राप्ती होईल राण्यांना.
प्रधान : - " वनदेवी , तुझे आभार कसे मानू तेच कळत नाहीए मला. खुप खुप धन्यवाद तुझे माते " अत्यानंदाने प्रधान म्हणाला.
वनदेवी : - " कल्याणमस्तु वत्स्...!!" प्रसन्न चेहऱ्याने आशीर्वाद देत वनदेवी म्हणाली.
प्रधानाने आनंदाच्या भरात, वनदेवीला शिरसाष्टांग नमस्कार केला. नंतर उठून पाहतो तर, वनदेवी अदृश्य झाली होती व वनदेवीच्या जागी ती आधीचीचं विहिर होती.
प्रधानाला तहान लागली असल्याने त्याने पोटभर पाणी पिऊन घेतलं विहिरीचं. ते पाणी खुपचं गोड व रुचकर लागलं प्रधानाला.
ते पाणी पिता-पिताचं मनोमन वनदेवीचे आभार मानून प्रधान विचार करु लागला....,
काही क्षणांपुर्वी याचं विहीरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा विचार करत होतो आपण...!!
बरोबरचं आहे वनदेवीचं..... ,
आत्महत्या म्हणजे पळपुटेपणा...!!
आत्महत्या हे नक्कीच उत्तर असू शकत नाही कोणत्याचं समस्येचं. कितीही मोठं संकट येऊदे , मी धीराने त्याचा मुकाबला करील , आत्महत्येचा वाईट विचार कधीच येऊ देणार नाही मनात...!!
राजाच्या जटील समस्येचा उपाय इतक्या मेहनतीनंतर ,पायपिटीनंतर अखेरीस प्रधानाला सापडला होता , त्यामुळे ही आनंदाची बातमी, कधी एकदा राजाला सांगतोय, असं झालं होतं प्रधानाला....!!
मग त्याच आनंदी , प्रसन्न मनाने तो राजासमोर उपस्थित झाला व तो राजाशी खोटं बोलला होता हे कबूल करुन, घडलेली सर्व हकीकत राजाला कथन केली.
प्रधानाच्या तोंडून ही आनंदवार्ता ऐकून , राजाचा आनंद गगनात मावेना. राजाने प्रधानाला यासाठी एक गाव बक्षीस दिलं, अनेक जड-जवाहीर व आभुषणं , उंची वस्त्रांचा नजराणा प्रधानाला दिला. सोबतचं खानदानी मोत्यांची माळ, जी राजा कधीच आपल्यापासून दूर करत नसे , तीही प्रधानाला दिली.
प्रधान स्वत:ला भाग्यवान समजला, राजाच्या या कौतुकामुळे....!!
मग राजाने आपल्या राण्यांना सर्व हकीकत कथन केली व त्याप्रमाणे वागण्याची सुचना दिली. दोन्ही राण्यांनी भरल्या पहाटे उठून, स्नान करुन, मनोभावे गायीची पुजा केली व नैवैद्य खाऊ घातला. मग दोघींनी एकदमचं गाईच्या दोन्ही कानांत आपली इच्छा सांगीतली. गाईने ते ऐकून हंबरडा फोडला , जणू गाईने प्रसन्न होऊन आशीर्वादचं दिला दोन्ही राण्यांना....!!
मग काही दिवसांतचं राण्यांची कुस उजवली. त्यांचे डोहाळे राजा प्रेमाने पुरवत असे. राजा खुप खुश होता आपल्या नशीबावर.
लवकरचं राज्याला वारस मिळेल या विचारांनी राजा दरबारात ही प्रसन्न मुद्रेने वावरत असे . हे पाहून प्रधानही खुश होत असे...!!
असेचं दिवसामागून दिवस जात होते, प्रजाही खुश होती या बातमीमुळे. मग अचानक एके दिवशी दोन्ही राज्यांना प्रसवकळा सुरू झाल्या....!!
काही वेळातचं दाईच्या मदतीने, दोन्हीही राण्यांनी दोन तेजस्वी बालकांना जन्म दिला. दोन्ही राण्या व राजाला पुत्ररत्नांची प्राप्ती झाली....!!
त्या नवजात राजबिंड्या बालकांना पाहून, राजाला आकाश ठेंगणं झालं. राजाची नजरचं हटत नव्हती त्या बालकांवरून. चंद्राप्रमाणे शीतल व सुर्यासम तेजस्वी भासत होती ती बालकं.
राजाने मोठी दावत दिली प्रजेला या आनंदाप्रीत्यर्थ. हत्तीवरून साखर वाटण्यात आली. राजमहाल सजवण्यात आला.शाही पंचपक्वांनांचा आस्वाद घेतला प्रजेने व प्रसन्न मनाने दोन्ही राजकुमारांना आशीर्वाद दिले.
बाराव्या दिवशी त्यांचा नामकरण विधी ,मोठ्या थाटामाटात पार पडला. राजाने प्रधानाला त्यांची नावं ठरवण्याचा आग्रह केला, अखेर प्रधानामुळेचं ,राजा हा दिवस पाहू शकला होता. प्रधानानेही आनंदाने हा मान स्विकारला व त्यांची नाव जाहीर केली.
सुर्याप्रमाणे तेजस्वी राजकुमार सुर्यभान व चंद्राप्रमाणे शीतल , राजकुमार चंद्रभान. दोन्ही राण्या , राजासह सर्वांनाचं ही नावं आवडली.
सुरतनगर आता पावन झाले होते ,राजकुमार सुर्यभान व चंद्रभान यांच्या आगमनामुळे...!!
दोन्ही राजकुमार हळूहळू मोठे होत होते. त्यांच्या बाललिला पाहताना दोन्ही राण्या व राजा धन्य होत होते....!!
दोन्ही राजकुमार दिसायला देखणे व राजबिंडे होते , नावाप्रमाणेच तेजस्वी होते. राजाने त्यांना शस्त्रपारंगत होण्यासाठी, राजगुरुकडे पाठवले त्यांच्या आश्रमात...!!
वर्षामागुन वर्ष जात होती व राजकुमार शस्त्रविद्येत पारंगत होत होते. सोबतचं सुसंस्कारही घडत होते त्यांच्यावर. बघता बघता राजकुमार सोळा वर्षांचे झाले व सर्व विद्यांमध्ये पारंगत होऊन राजवाड्यात परतले. सर्व प्रजाही देखण्या , राजबिंड्या राजकुमारांना पाहून धन्य पावली...!!
काही दिवस स्वागतसत्कारात गेले व मग एक दिवस प्रधानानेच राजाला सुचविले की आता राज्याचा उत्तराधिकारी घोषीत करण्याची वेळ आली आहे. दोघांपैकी एका योग्य राजकुमाराची निवड " युवराज " म्हणून करायला हवी...!!
राजालाही प्रधानाचे हे म्हणणे पटले व मग त्याने युवराज बनण्यास, कोण अधिक योग्य आहे , हे ठरवण्यासाठी , दोन्ही राजकुमारांची परीक्षा घेण्याचं ठरवलं.
परीक्षेसाठी असं ठरवण्यात आलं की , दोघांपैकी जो राजकुमार जंगलात जाऊन ,तेथील एखाद्या प्राण्याची शिकार करून राजासमोर आधी सादर करेल , तोच युवराज म्हणजे भावी राजा बनण्यायोग्य असेल. दोघांनांही राजा बनण्याची तीव्र इच्छा होती. मग ते दोघेही राजाची आज्ञा पुर्ण करण्यासाठी ,राजाचा निरोप घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले....!!
राजकुमार सुर्यभानला जंगलात एक ससा दिसला , मग क्षणाचाही विलंब न करता त्याने सशाची हत्या केली व विजयी मुद्रेने तो राजवाड्याकडे निघाला.
राजकुमार चंद्रभानही राजवाड्यात परत आला पण रीकाम्या हातानेचं....!!
राजाने त्याला याच कारण विचारताचं तो राजासमोर हात जोडत म्हणाला...,
"क्षमस्व: पिताश्री मी राजाचं काय तर पुत्र बनण्याच्या लायकही नाही. मी तुमच्या आज्ञेचं पालन करू शकलो नाही पिताश्री , माफी असावी."
" नक्की काय झालं आहे, आपण असं का बोलताय राजकुमार चंद्रभान?? " राजाने आश्र्चर्यमिश्रीत चिंतेने विचारले.
" पिताश्री , मला एक हरीण दिसले होते व मी स्वार्थीपणे त्याची हत्याही करणार होतो पण , जसा मी बाण सोडण्यासाठी नेम धरला त्याचवेळी त्या हरीणाचे गोंडस पिल्लू त्याच्याजवळ आले व त्याच्या शरीराला प्रेमाने चाटू लागले, त्याच्या मानेभोवती मान घासू लागले. त्याच्या या लिला पाहण्यात मी इतका दंग झालो की मला स्वत:चाही विसर पडला जणू...!!"
"ईतक्यात माझ्या पायाला मुंगी चावली व मी भानावर आलो.
मग मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला , किती स्वार्थी आहोत आपण ,केवळ राजा बनण्यासाठी , सत्ता मिळवण्यासाठी , एका निष्पाप जीवाची हत्या करणार होतो मी??"
" एकीकडे तुमची आज्ञा तर दुसरीकडे गुरूवर्यांची शिकवण ?? मी दुवीधेत फसलो होतो , शेवटी मी शिकार न करताच परत आलो , मी खरचं योग्य नाही पिताश्री राजा बनण्यासाठी, मला माफ करा...🙏"
( अश्रुभरल्या डोळ्यांनी राजकुमार चंद्रभान बोलला. )
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
" शाब्बास युवराज चंद्रभान , फक्त आपणचं सुरतनगरचे युवराज बनण्यास योग्य आहात. आपण सफल झालात माझ्या परीक्षेत. आपणचं या राज्याचा कारभार योग्य रीतीने पाहू शकाल , मला आनंद होत आहे आपल्याला उत्तराधिकारी घोषीत करताना."
( उठून उभं राहतं, टाळ्या वाजवत राजा म्हणाला. )
राजा उठल्यावर सर्व मंत्रीही उठले व टाळ्यांचा , फुलांचा वर्षाव करण्यात आला युवराज चंद्रभानवर.
" युवराज चंद्रभान यांचा विजय असो...!!"
सर्व दरबारात जयजयकार होऊ लागला युवराज चंद्रभानच्या नावाचा.
प्रधानही म्हणाला....,
" हेच आहेत खरे युवराज , युवराजांचा विजय असो. "
हा जयघोष ऐकुन दरबारात उपस्थित असणारे सगळेचं जण आनंदी व उत्साही होते फक्त एका व्यक्तीला सोडून ...,ती व्यक्ती म्हणजे....,
राजकुमार सुर्यभान...!!
राजकुमार सुर्यभानला खुप महत्वाकांक्षा होती राजा बनण्याची ,त्या नादात तो माणुसकी मात्र विसरला होता. हीचं गोष्ट राजकुमार चंद्रभानसाठी ,चांगली सिद्ध झाली कारण त्यालां जीवनाचं महत्तव कळालं होत. मुक, निष्पाप पर्यावरणाची हत्या करून राजा बनणं त्याच्या मनाला पटलं नाही. याच विचारांमुळे तो हरूनही जिंकला. राजकुमार सुर्यभानपेक्षा श्रेष्ठ ठरला...!!
ही गोष्ट राजकुमार सुर्यभानला मुळीचं आवडली नाही. हा त्याला ,त्याचा अपमान वाटला. वरकरणी, आपल्याला ही गोष्ट मान्य आहे असं दाखवून, त्याने मनोमन राजकुमार चंद्रभानचा काटा काढण्याचं ठरवलं...!!
ही गोष्ट जेव्हा राणी पुष्पलताला समजली, तेव्हा तीच्याही तळपायाची आग मस्तकाला भिडली. ती हे सहन करुचं शकत नव्हती की , तीचा पुत्र राजा न बनता , राणी कमलांगीचा पुत्र राजा बनेल....!!
या विषयावर राणी पुष्पलता व राजकुमार सुर्यभान यांची गुप्त खलबतं झाली व त्यांनी संगनमताने ,राजकुमार चंद्रभानचा अडसर मार्गातुन हटवण्याचं ठरवलं. कारण राजकुमार चंद्रभान जोपर्यत आहे तोपर्यंत सुर्यभान राजा बनत शकत नव्हता.
मग राणी पुष्पलताने त्याच रात्री गुप्तपणे, एका दुष्ट जादूगरणीची भेट घेतली. ही जादूगरीण ,राजवाड्यापासून काही अंतरावर असलेल्या, एका जुनाट झोपडीत राहत होती. अतीशय गुप्तता पाळण्यात आली या भेटीबाबत व ज्यांना याबाबत माहित होतं त्यांची राणी पुष्पलताने हत्या केली नंतर...!!
चेटकिणीला पुष्पलताने आपली सर्व समस्या सांगीतली.
"बसं इतकंच ना , थांब मी चुटकीसरशी ,तुझी समस्या दूर करते बघ राणी , काळजी करु नकोस. "
असं म्हणून जादुगरणीने तिचे बटाट्यासारखे डोळे मिटले व तिच्या विद्रुप ओठांनी जादुई मंत्र पुटपुटू लागली......!!
" || ॐ क्लिम्नं क्लिम्नं , भद्रकाली नमः || "
जादुगरणीने हा मंत्र उच्चारताचं एक जादू झाली तीथे. एक काचेची पारदर्शक छोटी कुपी ( अत्तराच्या कुपीसारखीचं ) हवेत प्रगट झाली व राणी आणि जादुगरणीसमोर गोलाकार फिरु लागली.
जादुगरणीने आपला हात पुढे करताचं ,ती कुपी तीच्या हातावर विसावली. मग जादुगरणीने त्या कुपीतील चमकणाऱ्या हिरव्या द्रवाचा, उपयोग कसा करायचा ??हे राणीला समजावून सांगितले. राणीने लक्षपूर्वक सर्व माहिती ऐकली व आनंदी मनाने जादुगरणीचा निरोप घेऊन ,तसेचं जादूगरणीचे आभार मानून ,राजवाड्यात परत आली. आपली योजना सफल होताना ,तीला दिसत होती. खूप खुश झाली होती राणी पुष्पलता...!!
मग दुसऱ्या दिवशी, राणी पुष्पलताने स्वहस्ते, राजकुमार चंद्रभानची आवडती खीर बनवून ,जादूगरणीने सांगितल्याप्रमाणे त्यात तो काचेच्या कुपीतील ,जादुई हिरवा द्राव मिसळला. आपल्या भरवशाच्या दासी करवी, तीने ती खीर ,युवराज चंद्रभानच्या कक्षात ठेवायला सांगीतलं. दासीने आपली कामगिरी, योग्य रीतीने पार पाडली हे ऐकुन, राणी पुष्पलताचा जीव ,भांड्यात पडला.
युवराज चंद्रभानचा असा समज झाला की, युवराज बनण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ ही खीर ,माता कमलांगीने बनवली असावी.
" आज खुप दिवसांनी मातेच्या हातची खीर खायला मिळणार..."
असं स्वत:शीचं बोलत युवराज चंद्रभानाने एका घोटातचं सर्व खीर संपवली आणी....,
टणण्....ऽऽ
असा आवाज करत चंद्रभानच्या हातातील खिरीचं भांड खाली पडलं , कारण युवराज चंद्रभान.....,
मोरात परीवर्तीत झाला होता...!!
राणी पुष्पलताची दासी लपून हे सर्व पाहत होती , तीने लगेचचं ही आनंदाची बातमी, राणी पुष्पलताला दिली. राणीने इनाम म्हणून आपल्या गळ्यातील सोन्याचा हार दासीला देऊ केला. राणीने स्वहस्ते तो हार ,दासीच्या गळ्यात घातला व आनंदी चेहऱ्याने ,दासीला आलींगन दिलं आणी....
पलंगाच्या बाजुला टेबलवर ठेवलेल्या ,फळांच्या पाटीतून सुरी काढून, दासीच्या पाठीत जोरात खुपसली. हे करताना तीने ,दासीचं तोंड दाबलं होतं त्यामुळे, दासीच्या तोंडातून निघणारी अस्पष्ट किंचाळी, कोणीचं ऐकली नाही....!!
अशाप्रकारे राणी पुष्पलता व सुर्यभानने मिळून हे कृष्णकृत्य पार पाडलं, कोणालाही कानोकान खबर न पडता...!!
मोर बनलेल्या चंद्रभानलाही, त्यांनी शिताफीने जंगलात सोडलं. ईकडे दुसऱ्या दिवशी, युवराज चंद्रभान आपल्या कक्षात नसल्याची वार्ता वाऱ्यासारखी ,आधी राजवाड्यात व नंतर सर्व राज्यांत पसरली. राजासह राज्यातील सर्व लोक शोकाकुल झाले.
दु: खसागरात बुडाली सर्व प्रजा....!!
राजाने आपले शिपाई सगळीकडे ,युवराज चंद्रभानचा शोध घेण्यास पाठवले ,परंतु काहीचं उपयोग झाला नाही. इनामही जाहीर केला ,राजकुमाराला शोधून आणणाऱ्या व्यक्तीस ,पण दुर्दैवाने युवराज चंद्रभानचा शोध, काही केल्या लागला नाही.
राजाने सतत दोन वर्ष प्रयत्न केले, पण यश मिळाले नाही. दोन वर्ष उलटूनही ,युवराज चंद्रभानबद्दल काहीचं माहीती मिळाली नाही. मग निराशेने व दु:खी अंतःकरणाने राजाने युवराज चंद्रभानला मृत घोषित केले...😔😔😔
राणी पुष्पलताने शोकाकुल असल्याचं भासवत , राजकुमार सुर्यभानला ,युवराज घोषीत करण्याचं सुचवलं राजाला.राजालाही काहीचं सुचत नसल्याने, त्याने या गोष्टीला होकार दिला व दुसऱ्याचं दिवशी ,काळजावर दगड ठेवून राजाने, राजकुमार सुर्यभानला सुरतनगरचा युवराज घोषीत केलं....!!
ही वार्ता राजकुमारी सुनैनाला समजताच ,तीही दु:खी झाली. सावत्र भाऊ असुनही , खूप माया लावली होती चंद्रभानने सुनैनाला. दोन वर्ष ती फक्त ,जगायचं म्हणून जगत होती. ही घोषणा तीला मुळीचं आवडली नव्हती, म्हणून ती याबद्दल चर्चा करण्यासाठी तिची माता , राणी पुष्पलता हीच्या महालाच्या दिशेने येतच होती ,ईतक्यात....
ती दरवाजाबाहेरचं घुटमळली कारण...,
राणी पुष्पलता व राजकुमार सुर्यभान आपण रचलेलं षडयंत्र यशस्वी झाल्याची खूशी मनवत होते. सुनैनाने लक्षपूर्वक त्यांचं बोलणं ऐकलं व तिच्या पायाखालची जमीनचं सरकली .ती तशीचं ,आल्यापावली मागे फिरली. आपल्या कक्षात जाऊन तीने सर्व दास्यांना बाहेर पाठवलं, व उशीत तोंड खुपसून रडू लागली.बराच वेळ ती तशीच रडत राहीली . मग रडता रडताचं तीला झोप लागली.
तीला जाग आली, ते मोराच्या सुंदर कुजनाने. ती त्या मोराच्या आवाजाचा कानोसा घेत, राजवाड्याच्या सज्जात आली व खाली डोकावून पाहू लागली. तीला आवाज तर येत होता ,पण मोर मात्र दिसत नव्हता. "हा आपला भाऊ तर नसेल ??"हा विचार मनात येऊन राजकुमारी सुनैना गाणे गाऊ लागली.
तीचे गाणे ऐकताचं ,एक मोर तीच्या नजरेसमोर येऊन, नाचू लागला. ती त्या मोराला पाहण्यासाठी, खाली त्या मोराजवळ आली व त्या मोराला पाहून ,तीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले कारण ...
तो मोर साधारण मोर नसून ,राजकुमार चंद्रभानचं होता..!!
त्याच्या गळ्यातील सोनसाखळी ,व तीच्यात गुंफलेली राजमुद्रा ,याची साक्ष देत होते, शिवाय तो मोराच्या रुपात असला तरी अतीशय तेजस्वी दिसत होता...!!
राजकुमारी सुनैना आनंदीत होऊन, त्या मोररुपी राजकुमार चंद्रभानच्या ,गळ्यात पडून रडू लागली. तीला तीच्या आईचा व बंधू राजकुमार सुर्यभानचा खूप राग येत होता व राजकुमार चंद्रभानसाठी आपण काहीचं करू शकत नाही, याबद्दल वाईट वाटत होते....!!
ती डोळे बंद करून ईश्वराचे स्मरण करू लागली.
"काहीतरी चमत्कार किंवा जादू होऊदे आणी माझा लाडका भाऊ ठिक होऊ दे देवा...🙏🙏🙏 "
असं म्हणून तीने डोळे उघडले तोचं.....,
तीच्यासमोर सोनेरी कपडे परीधान केलेली, सोनपरी उपस्थित झाली. सोनपरी ची कांतीही सोनेरीचं होती. तीला पाहून, राजकुमारी सुनैना खूप खुश झाली. तीने सोनपरीला आपली अडचण सांगितली व आपली मदत करण्याची विनंती केली.
सोनपरीसुद्धा राजकुमारी सुनैनाचं आपल्या भावावरील प्रेम पाहून, प्रसन्न झाली व तीने तीची सोनेरी रंगाची जादुई छडी फिरवली, व त्या छडीचा स्पर्श त्या मोराला केला.
हे करताना ती जादुई मंत्र पुटपुटत होती.
" अपलम् , चपलम् रुप बदलम् नमामी नमः "
सोनपरीने हा जादुई मंत्र म्हणायचा अवकाश , तो मोर त्याच्या खऱ्या रूपात आला , म्हणजेचं तो मोर पुन्हा राजकुमार चंद्रभान बनला....!!
राजकुमारी सुनैना व राजकुमार चंद्रभानच्या, आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी सोनपरीचे खूप आभार मानले व सोनपरी निघुन गेली ,कोणा दुसऱ्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीची, मदत करायला....!!
दुसऱ्या दिवशी सकाळी ,राजकुमार सुर्यभानचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार होता. धोका लक्षात घेऊन राजकुमारी सुनैनाने, राजकुमार चंद्रभानला आपल्या पलंगाखाली ,लपण्यास सांगीतले. आता थोडाच वेळ बाकी होता ,पहाट होण्यास....!!
राजकुमारी सुनैना आपल्या कक्षात झोपून राहीली , तीने कोणालाचं, काहीही कळू दिले नव्हते, राजकुमार चंद्रभानबद्दल....!!
अखेरीस तो क्षण आला ,ज्या क्षणाची खूप वर्षांपासून वाट पाहत होता ,युवराज सुर्यभान.....!!
सुगंधी द्रव्यमिश्रीत दुधाने अंघोळ करून , ऊंची वस्त्र लेवून व सुवासीक अत्तराचा शिडकाव करून, युवराज सुर्यभान तयार झाला होता, राज्याभिषेक सोहळ्यासाठी. राजवाडा व राजदरबारही सुवासिक व सुंदर फुलांनी, सजविण्यात आला होता. सर्व आमंत्रीत राजअतीथींचा यथोचीत, आदरसत्कार केला जात होता.
फुलांच्या वर्षावात ,युवराज सुर्यभान व महाराज देवव्रत यांचे आगमन होताच ,उपस्थीतांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला ,व त्या दोघांच्या नावाचा जयघोष केला. राणी पुष्पलता, राणी कमलांगी व राजकुमारी सुनैनासुद्धा, उपस्थित होत्या दरबारात.
युवराज सुर्यभान यांना ,पुजेसाठी बसण्याचं आवाहन करण्यात आलं. सर्व धार्मीक विधी पार पडल्यानंतर वेळ आली, युवराजांच्या मस्तकी राजमुकुट चढवण्याची....!!
महाराज देवव्रत काहीशा उदास मनानेचं ,आपल्या डोक्यावरील राजमुकुट काढून ,युवराज सुर्यभानच्या डोक्यावर ठेवणारचं होते ईतक्यात....,
" थांबा पिताश्री , घोर अनर्थ...,"
" युवराज चंद्रभान जीवीत असताना, आपण राजकुमार सुर्यभान यांचा राज्याभिषेक कसा करु शकता...??"
" युवराज चंद्रभान जीवंत आहेत , सुखरुप आहेत. "
राजकुमारी सुनैना ऊत्तरली. तीच्या या बोलण्याने, युवराज सुर्यभान व राणी पुष्पलता रागमिश्रीत आश्चर्याने, तिच्याकडे बघू लागले तर राणी कमलांगी व राजा देवव्रत तसेचं बाकी उपस्थीत आनंदी झाले.
" कुठे आहे माझा लाडका पुत्र , कुठे आहे...?? "
राणी कमलांगीने अधीरपणे प्रश्न केला सुनैनाला.
" हे सर्व खरं आहे का राजकुमारी सुनैना ?? खरं असेल तर ,आमच्यासमोर त्वरीत उपस्थित करा युवराज चंद्रभान यांना. "
प्रसन्न मुद्रेने महाराज म्हणाले.
" हो पिताश्री हे अगदी खरं आहे , मी आताच तुमच्या समोर माझे बंधु व युवराज चंद्रभान यांना उपस्थित करते. "
आनंदाने राजकुमारी सुनैना म्हणाली व काही क्षणांतचं युवराज चंद्रभान यांना ,आपल्यासमवेत घेऊन आली.
राणी कमलांगीने धावत जाऊन ,चंद्रभानला मिठी मारली व आनंदाश्रुंनी त्यांच्या खांद्याला स्नान घातलं....!!
राजा देवव्रतनेही प्रेमाने आलींगन दिलं चंद्रभानला.
राजा देवव्रतने "ईतके दिवस आपण कुठे होतात??" असं विचारताचं त्याने सांगीतलं की, तो फेरफाटका मारण्यास त्याच्या लाडक्या घोड्यावर स्वार होऊन निघाला होता, तेव्हा घोडा अचानक सैरावरा धावू लागला व त्यामुळे, राजकुमार चंद्रभान घोड्यावरुन खाली पडला व घरंगळत, दरीत जाऊन पडला. डोक्याला मार लागल्याने त्याचा स्मृतीभ्रंश झाला . तेथील एका गावकऱ्याने, त्याची सेवा-सुश्रुषा केली. त्याच्याच मेहनतीमुळे मी बरा झालो व काल राजकुमारी सूनैना, त्याला शोधत त्याच ठिकाणी पोहचल्या."
राजकुमार सुर्यभान व राणी पुष्पलता यांच्या कृष्णकृत्यांबद्दल ठाऊक असूनही ,खरं सांगणं टाळलं युवराज चंद्रभान यांनी. कारण आपल्या भावाला व आईला सजा होताना पाहु शकत नव्हते ते. पण...,
राजकुमारी सुनैनाला मात्र हे अजीबात आवडलं नाही, की राणी पुष्पलता व राजकुमार सुर्यभान यांच एवढं मोठं षडयंत्र असचं लपवलं जाव. म्हणून तीने युवराज चंद्रभानची क्षमा मागून ,सत्य परीस्थीती राजापुढे कथन केली. ते सर्व ऐकून राजाच्या तळपायाची आग मस्तकात गेली व राजाने राणी पुष्पमती व राजकुमार सुर्यभानला आजीवन कारावासाची सजा सुनावली.
आपल्यामुळेच हे सर्व घडत आहे असं वाटून, युवराज चंद्रभानला खुप दु:ख झालं व त्याने एक प्रण घेतला की, "जर माता पुष्पलता व बंधु सुर्यभान यांची सजा माफ करण्यात आली तरचं तो राजपदाचा स्वीकार करेल , अन्यथा वनवास स्विकारेल."
हे ऐकून राजाचा नाईलाज झाला व त्याने, राणी पुष्पलता व राजकुमार सुर्यभान यांची सजा माफ केली. हे सर्व पाहून राणी पुष्पलता व युवराज सुर्यभानला, पश्र्चाताप झाला व त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले....!!
युवराज चंद्रभानने पुढे होऊन त्यांचे अश्रू पुसले व प्रेमाने त्यांना आलींगन दिले. हे पाहून राजाला, चंद्रभानचे खूप कौतुक वाटले. राजा आपल्या सिंहासनावरून ,उठून खाली आला व युवराज चंद्रभानला म्हणाला...,
" युवराज चंद्रभान , आपणचं आहात सुरतनगरसाठी...."
"योग्य भावी राजा....!!"
मग विधीवत ,युवराज चंद्रभानचा राज्याभिषेक झाला. राजकुमार सुर्यभानला "सरसेनापती" ही पदवी बहाल करण्यात आली.
काही दिवसांनी राजकुमारी सुनैनासाठी, सुयोग्य वर शोधण्यात आला व शाही थाटामाटात तीचा विवाह पार पडला....!!
राजा चंद्रभानने देवव्रतच्या पावलांवर पाऊल ठेवून छान राज्यकारभार केला व प्रजेचे मन जिंकुन घेतले.
प्रजेचा तोंडात एकचं वाक्य असायचं महाराज चंद्रभान यांच्यासाठी....!!
" राजा असावा तर असा...!!"
