त्या रात्री तीन वाजता..!!
त्या रात्री तीन वाजता..!!
दिवसभराच्या धावपळीनंतर मी खूप थकलो होतो . कामावरून घरी आल्यावर फ्रेश झालो व मुलाशी थोड खेळल्यानंतर मी टीव्हीवर बातम्या पाहू लागलो . बातम्या पाहतचं मी जेवण उरकलं. मला आज घरी यायला थोडासा उशीर झाला होता , त्यामुळ माझ्याच सांगण्यावरून पत्नी व मुलाने जेवण केलं होतं.
आज-कालच्या बातम्या म्हणजे काय सांगायचं ?? लोक इतके विकृतपणे कसे वागू शकतात?? हेच समजत नाही..?? स्त्रियांची अवस्था तर ,विचारूचं नका..!! आपल्याही घरात आई ,बहीण आहे याचा विचार का करत नाहीत हे लोक ??असं वाईट कृत्य करताना. असो...!!
आधीच दमलो होतो मी, ती बातमी पाहून मन सून्न झालं अगदी, व मी लगेच शयनकक्षात झोपण्यासाठी निघून गेलो. मुलगा आणि पत्नी आणि झोपी गेले होते, मग मीही बेडवर अंग टाकलं. पण इतका दमलेला असूनही रोजच्याप्रमाणे मला झोपच येईना. सारखा टीव्हीतील मुलीचा चेहराचं, डोळ्यासमोर दिसत होता , फार वाईट वाटत होतं तिच्यासाठी , जणू काहीतरी नातच होतं माझं तिच्याशी . मागच्या जन्मी माझी बहीण असावी बहुतेक ती. तिचाच विचार करत होतो मी , त्यामुळे मला झोपचं येत नव्हती.
कुस बदलत होतो ईकडून तिकडे सारखा , पण काही केल्या झोप येत नव्हती . डोळे बंद केल्यावर त्या ताईचा चेहरा डोळ्यासमोर येऊन अस्वथ होतं होतं , अचानक मला पंखा सुरु असताना, घाम फुटला , घसा कोरडा पडला...!!
अश्या बातम्या तर नेहमी पाहत असतो आपण , वाईटही वाटत आपल्याला ,पण आज असं काय होतं होतं अचानक ?? मला कळतच नव्हतं. शेजारी निद्राधीन असलेल्या बायकोला ,माझ्या या मनोवस्थेचा थांगपत्ताही नव्हता. दिवसभर काम करून तीही दमली असेल, असा विचार करून तीला उठवणं मी टाळलं.
खुप तहान लागली असल्याने, मी पाणी पिण्यासाठी उठलो. त्याचवेळेस आमच्या घड्याळात, तीनचा टोला पडला.
बापरे..!!
म्हणजे मध्यरात्र झाली तरी आज मला झोप नाही लागली , का बरं असं विचीत्र घडतंय आज ?? कोणती वाईट गोष्ट तर घडणार नाही ना?? असे संकेत आपल्याला वेळोवेळी मिळत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो , कळत नकळत....!!
हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत असं स्वत: ला समजावत ,मी पुन्हा झोपण्याचा असफल प्रयन केला पण आज निद्रादेवी, बहूतेक नाराज होती माझ्यावर. इतक्या रात्री एकट्याने काय करावं बरं ?? पत्नी आणी मुलगा गाढ झोपेत होते . चंद्रप्रकाश दोघांच्या चेहऱ्यावर पडून, दोघांचही रुप खुलून आलं होतं , मी तर दोन क्षण पाहत बसलो त्यांच्याकडे . किती सुखी कुटुंब आहे आमचं...,असा विचार मनात येऊन हलकसं स्मीतहास्य उमटलं माझ्या गालावर. स्वतःचाच हेवा वाटू लागला क्षणभर , ईतक्यात...,
कसला तरी आवाज आला बाहेरून. इतक्या रात्री कशाचा आवाज आला असेल ?? कोण बरं जाग असेल?? असा विचार करून मी माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी गॅलरीत येऊन उभा राहिलो आणी , समोरचे दृश्य पाहून मला घामच फुटला...,
एक मुलगी धावत येत होती व तीच्या मागे ५ शस्त्रधारी पुरुष धावत होते. त्यांचा इरादा काय आहे ,हे समजण्याइतका मी लहान नक्कीच नव्हतो , पण एक तर रात्रीची वेळ , त्यात मी एकटा ते पाच जण व तेही गावठी कट्टा , चाॅपर , हॉकी स्टिक , साखळी ई. शस्त्रांनी सुसज्ज असलेले , मला त्या तरुणीची मदत करण्याची इच्छा असुनही , आपण अशा परिस्थितीत काहीच करू शकत नाही , याची खुप खंत वाटली...!!
इतक्यातचं ती मुलगी धावता-धावता, एका खड्ड्यात अडखळून पडली , आता त्या नराधमांची हिम्मत वाढली. ते पाचही जण तीच्या भोवती गोलाकार फिरू लागले. आता काहीतरी करणं गरजेचं होतं , नाहीतर....
हा अत्याचार घडत असताना हतबलपणे ,आणी दुर्दैवाने याची देही याची डोळा पहावा लागला असता . खूप घृणा वाटत होती स्वतःची , काहीच करू शकत नाही का आपण ?? हे विचार चक्र सुरुचं होते डोक्यात आणी , अचानक डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. कॉलेजला असताना मिमिक्री करायचो मी , ऐनवेळेला ते आठवून , मी पोलिस व्हॅनचा आवाज काढला व त्या आवाजाने घाबरून ते नराधम , क्षणार्धात तिथून दिसेनासे झाले आणि पुढे घडण्याची शक्यता असलेला अतिप्रसंग टळला....!!
मला झोप न येणं , माझं अस्वस्थ होणं , ऐनवेळेला मला ही कल्पना सुचणं हे विधिलिखित असावं बहूतेक...!!
अचानक आलेल्या पोलिस व्हॅनच्या आवाजाने ,ते राक्षसी मनोवृत्तीचे लोक खूपचं घाबरले होते व वाट फुटेल तिकडे पळून गेले होते ,आणि ती तरुणीही कावरीबावरी होऊन, इकडे तिकडे पाहू लागली. अचानक तीचं लक्ष समोर गेलं. माझ्याकडे पाहून तिने हात जोडले. मीही माझ्या उजव्या हात उंचावून अंगठा तिला दाखवला व खुणेनेचं आमच्या घरी आज रात्री मुक्काम करणार का?? असे विचारले ??
तिने होकारार्थी मान डोलावली ,कारण बहुतेक मी काही क्षणांपुर्वी केलेल्या कृतीमुळे, तीला माझ्यावर विश्वास बसला असावा.ती आमच्या घरी मुक्काम करण्यास तयार झाली.
मग मी बिल्डींगच्या गेटजवळ जाऊन, फार आवाज न करता, तीला आमच्या घरी घेऊन आलो. दरवाजाच्या आवाजाने , पत्नी जागी होऊन बाहेर आली होती. त्या तरुणीची अवस्था पाहून ,ती सर्व काही समजून गेली. तिने मला एकही प्रश्न विचारला नाही. तशी समजूतदार होती माझी पत्नी , माझ्या स्वभावाची तिला माहिती होती , विश्वास होता माझ्यावर तिला , आणि मी तो जपतही आलो होतो आतापर्यंत . त्यामुळे मी काहीही न बोलता ,ती सर्व समजून गेली.
त्या तरुणीची दुसऱ्या दिवशी सकाळी चौकशी केली असता , ती अनाथ असल्याचं कळालं , लहानपणापासून ती एका अनाथाश्रमात राहिली होती व वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ,तिला तो आश्रम सोडावा लागला होता. ती कामाच्या शोधात खूप फिरली ,पण आपल्या समाजात एकट्या मुलींची अवस्था खूपचं बिकट आहे , काम मिळणे तर दूरचं , काल रात्री तर तीच्यावर..भयानक संकट कोसळलं होतं...!!
सकाळी नाश्ता झाल्यावर , ती तरुणी घरातून जाऊ लागली ,तेव्हा माझ्या पत्नीने तीला हात धरून थांबवलं ,व तिला म्हणाली ,
" आता तुम्ही इथून कुठे जायचं नाही , ताई . आमच्या यांना बहीण नव्हती , मला ननंद नव्हती , आजपासून हे तुमचे भाऊ व मी तुमची वहिनी , आता इथेच रहा. "
" ठीक आहे वहिनी , तुम्ही म्हणाल तसं ". अतिशय आनंदाने ती म्हणाली.
आधीचं समाधानी असणारं आमचं कुटुंब , आता पूर्णही झालं होतं . न बोलताच मला बहीण दिली होती देवाने. हो म्हणजे त्यासाठी ,एका रात्रीची झोप गमावली होती मी ,पण त्या रात्री बहिणीच्या रूपात मिळालेली, ही दैवी भेट अनमोल होती माझ्यासाठी...!!
