गुंतता हृदय हे...!!
गुंतता हृदय हे...!!
मनाली धावत- पळतचं बस स्टॉपवर पोहोचली...!!
रोज तिला फक्त ५ मी. उशीर व्हायचा व तिची बस सुटायची . मग १५ मी. नंतरचं पुढची बस यायची ज्यामुळे तिला रोज काॅलेजला पोहोचायला उशीर व्हायचा...!!
मनालीने आज मनाशी चंगच बांधला होता की आज वेळेवर बस गाठायचीचं. त्याप्रमाणे ती व बस एकाचवेळी बस स्टॉपवर पोहोचले. बसमध्ये चढणारांची गर्दी झाली होती . मनालीसुद्वा त्याच गर्दीत घुसून चढण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली. त्या गडबडीत तिचा पाय तिच्याचं ओढणीत अडकला व ती तोल जाऊन खाली पडणारचं होती ईतक्यात....,
अचानक तिला एका तरुणाने तिचा हात धरून पडण्यापासून वाचवले. मनाली अर्धी बस बाहेर लटकलेली होती. एका हाताने तिने बसचा रॉड पकडलेला होता तर दुसरा हात त्या तरुणाच्या हातात होता. दोघे एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेले होते . जणू पाहताक्षणी एकमेकांच्या प्रेमात पडले होते दोघे.
पाहता क्षणी वाटे कुणी आपुलं...!!
हे वेड जे स्वप्नांतुनी जपलं...!!
अशीच भावना होती दोघांच्या मनात आता...!!
मनालीच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांमुळे आधीच गोरी असणारी तिची कांती सोन्याप्रमाणे चमकत होती. तिचे मोकळे सोडलेले केस वाऱ्यावर उडत होते व तिच्या कानातील झुमके तिच्या चेहऱ्याचं सौंदर्य अजून वाढवत होते. आकाशी रंगाच्या पंजाबी सूट मध्ये ती खूप सुंदर दिसत होती...!!
तो तरुणही दिसायला काहीचं कमी नव्हता , एखाद्या चित्रपटाच्या हिरोला लाजवेल , अशी पिळदार शरीरयष्टी व राजबिंडा चेहरा , ज्याच्या वरून काही केल्या मनालीची नजरचं हटत नव्हती. पिवळ्या रंगाचा शर्ट मध्ये तो उठून दिसत होता. त्याची आश्वासक नजर आणि ते जीवघेणं मधाळ हास्य....!!
मनाली व त्या तरुणाच्या नजरेचा हा खेळ सुरू असतानाचं...,
"चला, आता राहिलेली प्रेमकहाणी बस मध्ये पूर्ण करा "
असं म्हणून , कंडक्टरने खाडकन बेल वाजवली तेव्हाचं ते दोघे भानावर आले...!!
मनाली तर लाजून गोरीमोरी झाली व हसू दाबतचं बसमध्ये शिरली , पायरी चढून वर जाताना तिने एक कटाक्ष त्या तरुणाकडे टाकला .अजूनही त्याच्या चेहऱ्यावर ते मधाळ हास्य कायम होतं.
ते पाहून व बसण्यास जागा न मिळाल्यामुळे मनाली खाली मान घालून उभी राहिली. तिचा चेहरा लाजून गुलाबी झाला होता . एक अनोळखी मुलगा ज्याचं नावही माहीत नाही , त्या मुलाबद्दल अचानक इतकी ओढ , आपुलकी कशी काय वाटत असेल ?? यालाच प्रेम म्हणत असावेत का ?? असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले....!!
त्या तरुणाचीही काही वेगळी अवस्था नव्हती , आजपर्यंत त्याला कोणत्याचं मुलीबद्दल , असं आकर्षणं वाटल नव्हतं जे मनालीला पाहून वाटत होतं. काय होत होतं हे त्यालाही कळत नव्हतं पण , मी प्रेमात तर पडलो नाही ना ह्या अनोळखी मुलीच्या ?? असा प्रश्न त्यालाही पडला व आपल्याला तीच नावही माहीत नाही या विचाराने त्याला हसू आलं...!!
दोघे बस मध्ये एकामागोमाग ऊभे होते. त्याने तिला तिचं नाव विचारण्याचे ठरवले व तो तिला नावचं विचारणार इतक्यात ,
"तिकीट , तिकीट , पुढे कोण बाकी आहे ,तिकीट काढून घ्या "
असं कर्णकर्कश आवाजात ओरडत , कंडक्टर त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला.
" एक भवन्स कॉलेजचं तिकीट द्या "
दोघेही एकाच वेळेला कंडक्टरला म्हणाले , आता त्या दोघांसह कंडक्टरलाही त्या दोघांचे गोंधळलेले चेहरे पाहून आश्र्चर्य वाटलं.
अनुभवी कंडक्टरने त्या तरुणाच्या हातातील पैसे घेऊन दोन तिकीट दिले , मनालीने पैसै द्यायचा प्रयत्न केला त्या तरुणाला तर तिला अडवत तो म्हणाला...,
" असुदे , आता तर रोज मलाचं तुमचं तिकीट काढावं लागेल मिस् ...??..."
" नाव काय म्हणालात तुमचं ?? "
त्याच्या या बिनधास्तपणावर मनोमन खुश होत , पण तसं न दाखवता मनाली त्या तरुणाला म्हणाली...,
" मनाली , माझं नाव मनाली आहे ...मीस्टर.....??? "
" मितेश , माझं नाव मितेश आहे मिस मनाली. " दीलखेचक हास्य फेकत मितेश म्हणाला.
तर अशी झाली होती मितेश व मनालीची पहिली भेट.
दोघे एकाचं काॅलेजला तर होते पण वेगवेगळ्या शाखेत . त्यामुळे आतापर्यंत त्यांची भेट झाली नव्हती ( एकाच कॉलेजमध्ये असूनही.) पण आज मात्र योगायोगाने त्यांची भेट घडून आली व दोघे पहील्याच भेटीत एकमेकांच्या ईतके प्रेमात पडले , जणूकाही त्यांचं जन्मोजन्मीचं नातचं होतं...!!
या भेटीनंतर ते एकमेकांच्या खूप जवळ आले. ते वेगळ्या शाखेत असले , तरीही त्यांचं रोज भेटणं चालु असायचं . दोघांनी प्रेमाची कबुली मात्र बर्याच दिवसांनी दिली. त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या घरच्यांनी संमतीने त्यांच लग्नही लावून दिलं. त्यांच्या लग्नानंतर दोन वर्षांनी एका गोड परीच त्यांच्या आयुष्यात
आगमन झालं. तिचं नाव त्यांनी मोहिनी ठेवल...!!
अशाप्रकारे मनाली व मितेशचं हृदय बस स्टॉप वरील भेटीनंतर , एकमेकांमध्ये गुंतलं ते कायमचंच....!!

