आधुनिक काळात माणूस
आधुनिक काळात माणूस
आधुनिक काळात माणूस स्वतःच एक यंत्रमानव बनला आहे. मन मारून जगतो आहे. दिवसेंदिवस संवेदना हरवून बसतो की काय अशी भीती वाटू लागली आहे. काँट्रॅक्ट बेसिसवर एकत्र येणाऱ्या समान हितसंबंधी गटासारखे कुटुंबात केवळ गरज म्हणून वावरताहेत. का कुणास ठाऊक नात्यांमधला दुरावा वाढतच चालला आहे. मग ते नाते कुठलेही असो, पूर्वीसारखा भावनांचा ओलावा दिसून येत नाही. परस्परातील प्रेम, विश्वास, जिव्हाळा, आपुलकी हरवून बसला आहे. बेगडी प्रेम तोंडावर नावापुरतं तेवढं व्यक्त होणं. नको असलेल्या गोष्टी बळजबरीने करण्यास लावल्यासारखा दिवसेदिंवस कुटुंबात लोक वावरताहेत. संयुक्त कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धतीचे हे गंभीर परिणाम असावेत बहुदा.
पण कामधंद्याच्या निमित्ताने लोक पूर्वीही जात होते. पण गावाशी, कुटुंबाशी, नातेवाईकांची, मातीशी त्यांची नाळ कायमची जोडलेली असायची. अर्थात आजही काही लोक अपवादात्मक आहेतही म्हणा. पण ते बोटावर मोजण्याइतकेच यंत्रयुगात माणूस का इतका रुक्ष झाला ? त्याचं आयुष्य हे घड्याळाच्या काट्यावर धावतय हेही मान्य परंतु नात्यामधले अनुबंध अजिबात तुटता काम नये. निकोप समाजासाठी, नात्याची घट्ट वीण असणे आवश्यक आहे. हे रेशमीबंध प्रीतीचे तुटू पाहताहेत ते अत्यंत चुकीचे आहे. पूर्वी चार पिढ्या सुखाने एकत्र नांदायाच्या त्यातून जे संस्कार होत होते ते आयुष्यभर कामी येत होते. आज आपण सुधारलो, आधुनिक झालो, साक्षर झालो. पण सुशिक्षित झालो आहोत असं अजिबात म्हणता येणार नाही हे अलीकडील वर्तमानपत्रातील, टीव्ही चॅनलवरील बातम्यांमधून काही घटनांमधून दिसून येतात. आपण पक्षासाठी, सत्तेसाठी एवढे बेभान झालो आहोत की आपणास जन्मदात्या आई वडिलांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही की आमची वाटचाल विनाशाकडे झुकलेली दिसत आहे.
पूर्वी कुटुंबातील सर्वजण एकत्र जेवायचे, बसायचे, चर्चा व्हायची, परस्परांचे दुःख वाटून घ्यायचे, सुखात सहभागी व्हायचे. आता तर हा संवादच बंद होतो की काय अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. व्हाॅट्सअप, फेसबुक, क्रिकेट, टीव्ही सारख्या माध्यमामुळे माणूस जवळ आला आहे. ही प्रभावी माध्यमे चांगलीच आहेत परंतु त्यांच्या अतिरेकी वापरामुळे माणूस आत्मकेंद्रित, एकलकोंडा होत आहे. हे विसरून चालणार नाही. यावर मर्यादा घातल्या गेल्या पाहिजेत किंवा आपणहून विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण त्याचा वापर कमी केला पाहिजे. जेणेकरून कुटुंबासाठी आपणास वेळ देता येईल आणि कुटुंबातील परस्परांचे स्नेहबंध टिकून राहतील.