आधारवड
आधारवड
आज जरा वेगळा विषय लिहिण्यासाठी हातात पेन घेतली तेव्हा या विषयाचं नाव डोक्यात होतं त्यापलीकडे काही नाही; पण विश्वास नक्कीच होता की स्वामी हा विषय पूर्णत्वाकडे नक्की नेतील.
मनुष्य जन्माला येतो लहानाचा मोठा होत असताना त्याच्यावर जी जडणघडण होत असते ती त्याला त्याच्या आयुष्यात कामाला येते. त्याच्या आजूबाजूला अनेक त्याच्यावर प्रेम करणारी माणसं असतात किंबहुना तो त्या समजाच्या कोषात असतो. फार कमी लोकांच्या नशिबात नि:स्वार्थ आणि भरभरून प्रेम करणारी माणसं असतात.
म्हणून काय माणसं खचत नाहीत. नव्या जोमाने नव्या उमेदीने तीही उभी रहातात..... आणि मुक्ताई उभी राहिली...
हो ही गोष्ट आहे मुक्ताईची!!!! जिने जीवापाड आपल्या जिवलगा वर प्रेम केलं पण तिच्या वाट्याला त्याच्या बदल्यात कटुता आणि तिरस्कारच आला.... समाज काय म्हणले या किंवा तोडण हा आपला संस्कारच नाही या जाणीवेतून निर्जीव नातं ती जगत होती......
नुसतच सोबत राहणं किंवा कर्तव्य करणे म्हणजे ते नात रूजत असं मुक्ताईला कधीच अपेक्षित नव्हतं, तर दोघांनी मिळून एकत्र स्वप्न बघणे तसेच एकमेकांना प्रोत्साहन देत प्रगती करणे व एकमेकांच्या आनंदासाठी जगणे हे सुंदर स्वप्न तिने पाहिले होते. किंबहुना मुक्ताई सारख्या अनेक स्त्रियांचं हे स्वप्न असतं पण सगळ्यांचं पुर्ण होतं असं नाही.
या निर्जीव नात्यातून उमललेल्या फुलाला मात्र ती तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होती याला साथ लाभली ती तिच्या स्वामींची....
कारण स्वामी तिच्यासोबत कायमच होते पण तिला याची अनुभूती आली ज्यावेळेस ती मानसिक वेदनेच्या खोल दरीत फेकली गेली होती मात्र त्यावेळेस तिचा हात तिच्या स्वामींनी म्हणजेच ब्रम्हांडनायक दत्त स्वरूप श्री स्वामी समर्थांनी घट्ट धरून ठेवला होता.
देव तारी त्याला कोण मारी याचा अनुभव अनेक वेळा घेतला होता. ज्या ज्या क्षणाला तिचा धीर तुटायचा त्या त्या क्षणाला स्वामी तिला धीर द्यायचे.
घर ती उत्तम पद्धतीने चालवायची त्याच्या बदल्यात तिला अपेक्षा होती ती मायेच्या कौतुकाच्या शब्दांची पण तेही तिला पोरके व्हायचे; ज्यावेळेस आत्मविश्वास डगमगायचा आणि तिचे स्वतःशी द्वंद्व सुरू असायचं त्यावेळेस स्वामी वरील अपार श्रद्धा आणि विश्वास त्यामुळे मुक्ताईची जीवन नौका पार व्हायची.
आयुष्यातली ती वाईट पेज तर निघून गेली नंतर तिच्या आयुष्यात अचानक उत्तम गोष्टी घडायला लागल्या समाजाचे आपण देणे लागतो आणि आपण समाजासाठी काहीतरी करू या हेतूने तिने तिच्याकडून समाजप्रबोधनाचे कार्य सुरू केले.
मुक्ताईची आणखीन एक गोष्ट वाखणण्याजोगी ती म्हणजे तिचा कर्म सिद्धांतावर प्रचंड विश्वास होता.
भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भर्मा ते संगोस्त्व कर्माणि ||
अशा पद्धतीने ती आपले कर्म करीत असे आणि आपल्या मनातली इच्छाशक्ती दृढ असली की आपले प्रयत्नही त्या दिशेने होतात आणि ती गोष्ट साध्य होते.
स्वतःचे दुःख बाजूला सारून आपण इतरांचा आधार व्हावं इतरांच्या दुःखावर फुंकर घालावी अशी विचारसरणी मुक्ताईने केली आणि त्यातूनच जन्म झाला तो "मुक्तांगण" या संस्थेचा.
मुक्तांगण नावाची एक संस्था तिने सुरु केली जात निराधार स्त्री ला तिने आधार तर दिलाच शिवाय त्या स्त्रियांचा गेलेला आत्मविश्वास तिने त्यांना मिळवून दिला त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळवून त्यांना तिने आत्मनिर्भर देखील केले.
मुक्ताईला जी अनुभूती आली होती, तिने परमेश्वराशी ते स्वामीमय होणे किंवा त्या निर्गुण-निराकार रूपाशी एकनिष्ठ होणे हा प्रवास मुक्ताई साठी काही सहज सोपा नव्हता....
पण त्या दिव्य स्वरूप त्रिगुणात्मक यांनी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेत ती यशस्वी होत होती कारण तिचा विश्वास आणि श्रद्धा व संयम यामुळे खडतर प्रवास सोपा होत गेला तिला माहित होतं परीक्षा घेणारेही तेच आणि त्यातून तिला तारणारे ही तेच.
सोन्याची खरी किंमत त्याला चटके दिल्यानंतरच समजते.
प्रत्येक घरात जर स्त्रीचा तिच्या भावनांचा सन्मान झाला तर आपल्या देशाचं भविष्य खरच खूप सुंदर आणि देखण असेल.
"मुक्तांगण" आणि अशा अनेक समाज संस्था यामुळे निराधार बालक वृद्धापकाळाने त्रस्त झालेले ज्येष्ठ नागरिक अनेक निराधार स्त्रिया यांच्यासाठी या संस्था "आधारवडाचे" कार्य करतात यात शंकाच नाही अशा सगळ्या समाजात संस्थेला आमचा मानाचा मुजरा.....
