आई
आई
आई वात्सल्याची मूर्ती
आई तेजाची कीर्ती
आईआभाळ लेकराच
आई कोंदण काळजाच।
"आई" हा शब्दच असा आहे की जो उच्चारला की मन अगदी भरून येतं आणि अलगदच ओठावर हसू फुलतं. ज्या माउलीने आपल्याला जन्माला घातलं जिने आपल्याला अक्षरांची ओळख करून दिली तिच्याच बद्दल लिहिणं हे मी माझं भाग्य समजते. आपल्या आयुष्यातील ती एकमेव अशी व्यक्ती आहे जिच्या बद्दल लिहिण्यासाठी कुठे सुरुवात करावी आणि कुठे थांबावं हे खरच कळत नाही. आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई सुद्धा कमी पडेल तिच्याबद्दल लिहिण्यासाठी,अशी असते आई.
आई म्हणजे माहेर।
आई म्हणजे विसावा।
आई म्हणजे आधारवड।
आई म्हणजे सार जीवनाचा।।
आई ही आई असते , मुलांसाठी ती देव असते मग ती आत्ताच्या युगातली मॉडन असो अथवा पूर्वीच्या काळातली नऊवारी तली आई. काळ बदलत जातो वेळ धावत जाते पण आढळते ती आईच्या मनातील आपल्या मुलांबद्दलची माया. आता हेच बघाना पुर्वीच्या काळी स्त्रियांना चूल आणि मूल एवढेच बंधन कारक होतं पण त्यातही आपल्या अनुभवाचे धडे द्यायला ती कुठेच कमी पडत नव्हती. तिच्या संस्कार आणि तिच्या अनुभवाने तिने शिवबाला घडविले.आईच्या मनातील दृढ संकल्प तिच्या मनातील इच्छाशक्ती ही मुलांची ताकद बनते आणि तिच्या डोळ्यातली स्वप्न पूर्ण करण्याची एक ऊर्जा मुलांना मिळते.
अशी ती थोर जिजामाता केवळ आपल्या शिवबाचीच माता नव्हती ,तर आपल्या अतूट प्रेमाने तिने अख्ख्या जनतेला आपल्या ममतेने त्यांच्या मनात,' राजमातेचे 'स्थान निर्माण केले.आई हे मुलांचे सुरक्षाकवच असते, हे महाभारतातील एका प्रसंगावरून नक्कीच दिसून येतं म्हणून तर श्रीकृष्ण देव सुद्धा त्या मातेच्या शक्तीला घाबरून कपटाने दुर्योधनाला आईसमोर जाताना वस्त्र परिधान करून जा असे सांगतो कारण त्या श्रीकृष्ण नाही माहित होतं, आईच्या नजरेतील तेज जे आपल्या मुलाला लोहा सारखं बलवान बनवू शकतं.
आई जितकी प्रेमळ मायाळू तेवढीच वेळप्रसंगी कठोर आणि धाडसी म्हणून तर ती आपल्या तान्हुल्या बाळासाठी हिरकणी सारखा इतका अवघड कडा जीवाची पर्वा न करता सर करू शकली सलाम तिच्यातल्या धाडसाला सलाम तिच्यातल्या मातृत्वाला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी पूर्वीची आई जी जात्यावर ओव्या म्हणायची आणि आपल्या अनुभवाच्याशिदोरी तून मुलांवर संस्काराचे बीज पेरायची आणि त्यातूनच भारतभूमीला साने गुरुजी व वीर सावरकरांसारखे शूर पुत्र जन्माला आली. म्हणूनच"श्यामची आई" हे पुस्तक वाचकांना आजही प्रिय आहे.
वेळेनुसार आईची भूमिका देखील बदलत गेली आणि स्वरूपही नऊवारी, साडी, पंजाबी, जीन्स तसेच माय, आई, मॉम्स, मम्मा, हा तिचा प्रवास केवळ बाह्य स्वरूप बदलणे इतकाच मर्यादित न राहता तिने स्वताला ही स्वावलंबी बनविले. चूल आणि मूल या चौकटीबाहेर जाऊन तिने स्वतःचे विश्व निर्माण केलं, पण त्याच बरोबर घरची जबाबदारी तिने सुयोग्य पद्धतीने पेलली आर्थिक रित्या तर ती स्वावलंबी झालीच शिवाय मुलांच्या प्रगतीसाठी ती त्यांची प्रशिक्षक, मैत्रीण, त्यांची गुरु अशी विविध रूपे तिने समर्थपणे पार पाडली अथवा ती पार पाडत आहे.
आईसाठी लिहितांना हे आवर्जून म्हणावसं वाटतं तिचं आपल्या मुलांसाठीच झिजण हे चंदनासारखा असतं. आई ही जगातली एकमेव अशी व्यक्ती आहे जी आपल्या मुलांवर ती निस्वार्थपणे प्रेम करते ,आणि त्यांच्या सुखासाठी अहोरात्र झटत आहे.
. आई मायेचा सागर ।
आई पाखराची पखरण।
आई जीवनाचा आधार।
आई जीवनाचा आधार।।
अशा तिच्या मातृत्वाला माझा कोटी कोटी प्रणाम!
