वारी
वारी
ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल॥
असा विठूचा नाम घोष करत सर्व आसमंत दुमदुमत वारी सुरू होते ती थेट विठ्ठलाच्या चरणस्पर्शाने पूर्णत्वास येते. वारी म्हणजे आपल्या विठू माऊलीच्या भक्तांसाठी एक पर्वणी असते. चातक जितक्या आतुरतेने वर्षा ऋतू ची वाट पाहतो तितक्याच आतुरतेने वाट बघतात हे आपले वारकरी.......
घरापासून ते विठूच्या दर्शना पर्यंतचा हा प्रवास इतका सोपा आणि सहज आहे का? पण त्यांच्या मनाने एकदा उभारी घेतली की मग शरीर आपोआप साथ देत. सोपा नसतो हा प्रवास वारीचा, पण आपल्या मनातल्या त्या विठुच्या ओढीने सहज सुखकर आणि सोपा करतात हे वारकरी. वारी ही आपल्या महाराष्ट्राची फार पुरातन काळापासून चालत आलेली ही परंपरा......।
आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीची तर देहू हून तुकाराम महाराजांची पालखी निघते. वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक भक्तगण या दिंडीत सामील होण्यासाठी आलेले असतात. लाखो वारकऱ्यांचा सहभाग असून देखील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा प्रवास पार पडतो कारण त्यामागे त्यांचा व्यवस्थापन संघ काम करते. प्रत्येक दिंडीला त्यांच्या क्रमांक दिलेला असतो त्यात आपले किती वारकरी असणार याची नोंद ठेवली जाते. त्यावेळेस शिवाय आज किती किलोमीटर चालायचे आजचा मुक्काम कुठे उद्याचं नियोजन याचं सारे वेळापत्रक ठरलेलं असतं. इतक्या मोठ्या प्रमाणात निघालेली दिंडी आणि त्याचे नियोजन हे वाखाणण्याजोग आहे.
प्रवासाला निघालेला आपला हा वारकरी काही दिवसांसाठी का होईना पण आपल्या घरातल्या नात्यांचे पाश सोडून सगळ्या जवाबदाऱ्यांचं ओझं टाकून गळा तुळशीमाळ आणि डोईवर वृंदावन घेऊन त्या प्रवासाला निघतो खरा पण वाटेत भेटणारे त्याचे दादा आणि माई यांच्याशी मात्र तो मानवतेने वागायला विसरत नाही अगदी आपल्या घासातला घास सुद्धा तो आपल्या माऊली सोबत मिळून खातो.
असं म्हणतात की आपलं दुःख छोटं करायचं असेल तर इतरांचे दुःख बघावं याची अनेक उदाहरणे आपल्याला वारीत बघायला मिळतात आणि त्यावेळेस जाणवतं परमेश्वराने आपल्याला खूप काही भरभरून दिलंय आपण मात्र आपलंच दुःख कवटाळत बसतो.
ही आपल्या माऊलीची वारी सुखकर करण्यासाठी जसा व्यवस्थापन संघाचा सहभाग आहे, तसाच आपल्या महाराष्ट्र पोलीस विभाग तसेच महानगरपालिका यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते, त्याकाळात वाहतुकीचा कोणताच अडथळा नसतो. अनेक भक्त असे असतात जे प्रत्यक्ष वारीत सहभागी नाही होऊ शकत, पण त्यांच्या अन्न पाण्याची सोय जागोजागी केली जाते ,अल्पोपहार जेवण फळफळावळ ते पाणी वाटप असे आपल्यासारख्या सामान्य पासून ते राजकीय सामाजिक संस्थान मार्फत त्यांना सढळ हाताने मदत केली जाते.
तसेच माऊली च्या तब्येतीची काळजी म्हणून मेडिकल हेल्थ कॅम्प देखील असतात, हा निस्वार्थ अनुभव ह्या वारीतच बघायला मिळतो.
या वारीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दिवस-रात्र जे लोक प्रकल्प त्यांचे अचीवमेंट आणि आपले स्टेटस जपणारी असतात ,त्या म्हणजे आयटी कंपनीतील लोकांची देखील दिंडी यात सहभागी असते, या धावपळीच्या उपक्रमातून एक दिवस माऊली आळंदी जवळ जमतात साधा पोशाख आणि त्यांना मिळालेली आटी टोपी परिधान करून, कुठलीही तमा मनात न बाळगता ते देखील विठुच्या नामात तल्लीन होऊन मनी विठू भाव आणि ओठी माऊलीचा जयघोष करत ते माऊलीमय होऊन दिंडीत समरस होऊन जातात. त्यांना पण वेळेचे व्यवस्थापन , समर्पण, कार्यसंघ समर्थन आणि ध्येय या गोष्टी आपल्या वारकऱ्यांच्या दिंडीत ही बघायला मिळतात. आधुनिकता आणि अध्यात्म यांची सांगड आपल्याला आयटी दिंडीत बघायला मिळते.
वारीचा हा प्रवास भजन-कीर्तन ,रिंगण ,टाळमृदुंगाच्या घोषात पुढे सरकत सरकत जेव्हा दिवे घाटात पोहोचतो तेव्हा वसुंधरा देखील हिरवा शालू पांघरून घेऊन डोक्यावर इंद्रधनुचे मुकुट परिधान करून अभिमानाने हे सांगत असेल हे केवळ माझ्या भारतभूमीत घडू शकतं, इतक सुंदर लोभस रूप डोळ्याचं पारणं फेडणारं असतं.
आषाढी एकादशीला ही पालखी पंढरपुरात दाखल होते तेव्हा तिथला सोहळा तर अवर्णनीय असतो तेथील लोकांची ही त्या काळात जणू दिवाळीच असते, जेथे जागा मिळेल तेथे दुकान मांडायचे आणि त्या दिवसात भरपूर काम धंदा करून घ्यायचा वेळेचे बंधन नाही का खाण्यापिण्याचे भान नाही असा हा भक्तांचा महापूर त्या चंद्रभागेत ही आपल्याला बघायला मिळतो.
अशी अनेक वर्षांपासून चालत आलेली ही वारीची परंपरा मागच्या वर्षापासून करोना च्या संकटांमुळे खंडित झाली मात्र त्या विठू माऊलीला सगळ्या वारकऱ्यांन च्या वतीने हीच विनंती असेल आलेल्या या संकटातून सगळ्यांची लवकर सुटका होवो, आणि मोकळा श्वास आणि विठोबाचे नाम घेत परत ही वारी लवकरच सुरू होवो.
अशी निःस्वार्थ विठूमय वारी आयुष्यात एकदा नक्कीच करावी.
