गृहलक्ष्मी
गृहलक्ष्मी
ट्रिंग ट्रिंग ......
सकाळच्या धावपळीत फोनची बेल वाजली एकीकडे डब्बे भरत भरत रेवाने फोन उचलला सासुबाई चा फोन होता. यावेळेस आमचे गणपती महालक्ष्मी ला येणे होणार नाही तेव्हा तुम्ही करून घ्या आणि रेवाच्या पायाखालून जमिनच सरकल्यासारखे झाले फोन तसाच ठेवून तिथेच खाली बसली तिला काहीच सुचत नव्हते.
लग्न झाल्यापासून 16 17 वर्ष हा सण ती सासू-सासरे यांच्या देखरेखीखाली करत होती आणि अचानक आलेल्या फोन ने ती जरा बावचळून गेली, महालक्ष्मी हा सण त्यांच्यासाठी दिवाळीपेक्षा मोठा सोवळ्या ओवळ्याचा सगळं कसं व्यवस्थित झालं पाहिजे.
तिने दिर्घ श्वास घेतला ,मन घट्ट केले अजून पंधरा वीस दिवस अवकाश होता त्यातच तिच्या दोन्ही मुलींच्या परीक्षा व तिचे स्वतःचे ऑनलाईन क्लासेस करोनाच्या संकटामुळे घरकामाला बाई नव्हती अशा अनेक प्रश्न मधून वाट काढून तिला तो सण-समारंभ करायचा होता.
पण स्त्रीने जर मनात आणलं तर ती एव्हरेस्ट पण सहज पार करू शकते, आणि अशा तिच्या मनातल्या विश्वासाने रेवा उभी राहिली नवऱ्याचा डबा भरून त्याला ऑफिसला पाठवलं ;मुलींना ब्रेकफास्ट देऊन त्यांना शाळेला बसवलं; आणि मग हातात पेन आणि डायरी घेऊन ती बसली प्लॅनिंग करायला तिने सगळी पूर्वतयारी ची यादी तर केलीच शिवाय पूजेच्या दिवशी ची तयारी, सामानाची यादी, स्वयंपाकाची पूर्वतयारी महालक्ष्मीचा मेनू हे सारं काही तिने लिहून काढलं काही विसरायला नको म्हणून.
दुकान बंद म्हणून कापूस निवडून वस्त्रमाळा पासून सुरुवात होती सासुबाई मुळे कधी तिने कापूस
हातात ही घेतला नव्हता; पण इट्स ओके! असं म्हणत वळवट ,मालत्या, वस्त्रमाळा हे सारं तिला करायचं होतं. सगळी कामे आटपून मुलांना अभ्यास देऊन दुपारी ती पूर्व तयारी करायची बघता बघता हरितालिका गणपती हे सगळे सण तिने थाटात केले. महालक्ष्मी बसणार त्याच्या आदल्या दिवशी सगळी फुलोऱ्याची तयारी झाली सगळ्या प्रकारचे कूट ,पुडी तिने करून ठेवल्या होत्या त्यामुळे तिचे निम्मे काम सोपे झाले मुखोटे रंगवण्यात तिच्या मुली देखील सहभागी झाल्या.
दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीला आणण्यासाठी घरासोबत ती व तिच्या मुली देखील सजल्या होत्या त्यांच्यासाठी केलेली सगळी खरेदी साड्या दागिने बाळांचे कपडे व महालक्ष्मी यांचे थाटात पूजा करून दुसऱ्या दिवशी चे आमंत्रण दिले आणि दुसर्या दिवशी सकाळी लवकरच लवकर सगळं आटपून स्वयंपाक व एकीकडे पूजेची तयारी तातू काढणे ,आघाडा केना ,पाळणा वाती फुलवाती भिजवणे ,ओटी ची तयारी आणि सोवळ्यातला स्वयंपाक अशी एका वेळेस अनेक कामे ती करत होती जणू अष्टभुजा दुर्गेचे रूप तिने धारण केले होते, पण तिच्या दोन्ही मुली तिला खूप खंबीरपणे साथ देत होत्या तर डेकोरेशनची धुरा तिच्या नवऱ्याने सांभाळली होती. संध्याकाळच्या वेळेस ती देखील गौरी प्रमाणे नटून पूजा नैवेद्य आरती सारे काही वेळेत केलं. दुसरे दिवशीची उत्तर पूजा नैवेद्य गाठी पडणे संध्याकाळी जेमतेम चार-पाच बायकांना हळदीकुंकू करून हा सण पार पाडला
या सणाच्या निमित्ताने युनिटी ऑफ स्ट्रेंथ हे पुन्हा सिद्ध झाले होते पण प्लॅनिंग आणि टाईम मॅनेजमेंट त्यामुळे कितीही कठीण गोष्टीला आपण सहज पार पाडू याचे मानसिक समाधानाचे तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होते कारण तिच्या महालक्ष्मी अगदी समाधानाने तृप्त होऊन तिला आशीर्वाद देऊन परत येण्याचा निरोप त्यांनी घेतला होता.
गोष्ट साधीच पण स्त्रीच्या कर्तृत्वाला खरी उतरणारी कस असतं वर्किंग वुमन बाहेर कार्यरत असतात ,टारगेट पूर्ण करतात ,प्रोजेक्ट सक्सेसफुली लॉन्च करतात, तेव्हा त्यांच्य भरभरून कौतुक होतं पण घरातली स्त्री जेव्हा सक्षम पणे एखादं कार्य पार पडते तेव्हा तिला गृहीत न धरता तिच्या पाठीवर कौतुकाची थाप जर दिली तर तिचा उत्साह द्विगुणित होतो व तिला परत स्फूर्ती मिळते कारण घरच्या लक्ष्मी चे मोल हे कशातच तोलता न येण्यासारखे आहे.
आकाशात सूर्य असतो तो दिवसभर काय करतो तर तो फक्त असतो त्याच्या असण्यानेच खूप काही होत असतं, तशीच ही फेमिनाइन स्त्री ऊर्जा आहे स्त्रीचं अस्तित्व घरात स्नेह, ओलावा, चैतन्य, उत्साह, सौंदर्य तिच असणच एक समाज देणे व घरासाठी वरदान आहे. हे प्रत्येकाने जाणून तिचा आदर हा केलाच पाहिजे......!!!
