कळी उमलताना
कळी उमलताना
पत्र लिहिणे ही संकल्पनाच कुठेतरी लुप्त झाली आता तुम्ही म्हणाल काय हे हल्ली कोण लिहितय पत्र, एस. एम. एस.आणि व्हाट्सअप च्या जगात पत्र वगैरे काय?पण खरं सांगू का; पत्र लिहिणे ही एक कला तर आहेच पण आपल्या मनातले भाव उलगडणारे ते एक साधन म्हणू शकतो आणि हो पत्र परत परत वाचण्याची मजा काही औरच असते नाही का!!
असंच एक पत्र एका आईने आपल्या लेकीसाठी लिहिलेलं....
प्रिय गौरी स,
आईचे अनेक उत्तम आशीर्वाद
बाळा किती दिवसापासून विचार करत होते की तुझ्याशी जरा बोलावे माझ्या म्हणजे प्रत्येक आईला आपल्या लेकी बद्दल वाटणारे भाव तुला सांगावे ते प्रत्येक आईला असे शब्दात व्यक्त करताच येईल असे नाही पण भावना मात्र तशाच काहीशा असणार हे नक्कीच!!!!
गोंधळलीस का काहीच अर्थ उमलत नसेल ना माझ्या या बोलण्याचा खरं सांगू मला पण ते शब्दबद्ध करताना जरा अवघड जाते काही गोष्टी नुसत्या अनुभवायच्या असतात कदाचित तेच मी तुझ्या आणि माझ्या नात्यात अनुभवते आणि सुखावते.. अगं हो सांगते सांगते !!!
हे बघ आपण एखादं रोपटं लावतो त्याला जपतो त्याचं संगोपन करतो, त्याला गोंजारत तो मग एके दिवशी त्या छान रोपट्याचे रुपांतर एका छानशा झाडात होतं आणि त्याला मग कळ्या यायला लागतात आणि त्या कळ्यांचे रुपांतर फुलात होताना मन कसं भरून येतं..
सध्या माझी अवस्था अशीच काहीशी झाली आहे तुला फुलताना बघून..,
छोटीशी सानुली माझी बाळ माझं मला बिलगणार माझं बोट धरून चालायला शिकणार आज आयुष्याच्या एका वेगळ्याच सुंदर वळणावर तू उभी आहेस हे तुला देखील जाणवत असेल तुझ्या होणारे हे अंतर्बाह्य बदल तुला देखील जाणवत असतील.
तू तुझ्या धाकट्या बहिणी सोबत भातुकली खेळणारी अचानक आरशासमोर नकळतच सारखी सारखी उभी राहणारी तू ,पण खरं सांगु तर तु मुळातच अंतर्बाह्य सुंदर आहेस तुला या औपचारिक मेकअपची गरजच नाही... पण हे वयच असतं असं
आता आई म्हणून एक सांगते आपल्या आयुष्यातला प्रत्येक काळ सुखाचा असतो तो आपण एन्जॉय करावा आणि जपूनही ठेवावा...
आता तुझं सुरवंटाचं सुंदर फुलपाखरात रूपांतर होणार आहे तेव्हा तुला पंख मिळणार आहेत, पण या पंखाचा उपयोग तु योग्यच करणार याची मला खात्री आहे. तुला चांगल्या आणि वाईट यातला फरकही कळतो ते तू जाणतेस.
झाड कितीही उंच गेलं तरी त्याची मूळ मात्र जमिनीला घट्ट धरून असतात, आपल्यात होणारे बदल नैसर्गिकच असतात तो बदल आनंदाने स्वीकारायचा असतो; तो आपल्याला पूर्णत्वाकडे नेणारा असतो.
कुठल्याही गोष्टीचा एका बाजूने न विचार करता त्याच्या दोन्ही बाजूंस समजून मगच निर्णय घ्यावा एवढी सक्षम तू नक्कीच होशील आणि तुझ्या विचारातला स्थैर्य जपताना स्वतःच्या मनाला ही तु जप आयुष्य खूप सुंदर आहे; या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत; त्यांचा तू आस्वाद घे आणि तशी रसिक काही तुझ्यात आहे. छान छान ऐक आणि छान वाच, स्वतःला डेव्हलप करत जा.
हल्ली तुझा स्वभाव थोडा बदलतोय कधी चिडते रागवतेस तर कधी हळवी होते पण बाळा हे अगदी स्वाभाविक आहे हो या काळात,त्यामुळे काळजी करू नकोस आणि तुझी काळजी घ्यायला घरात तुझी आपली माणसं आहेतच.
तुझीच
आई...
पत्र जरा वेगळ्या विषयावर आणि भावनिक आहे हे प्रत्येक आईच्या मनातले भाव येथे व्यक्त झालेले आहेत.
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती घरात आजी आत्या मावशी काकू यांचा वावर असायचा पण आता पूर्वीसारखा राहिलेला नाहीये विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात कमी माणसं असतात आणि मग आईला च सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, आणि आपल्याला वाटतं की ती गोष्ट नैसर्गिक आहे पण एका मुलीच्या आयुष्यात घडणारा हा बदल तिच्यासाठी सहज नक्कीच नसतो.
अशावेळेस अनेक संवाद ऐकायला देखील ऐकायला मिळतात घराघरात," त्यात काय आमच्या वेळेस पण असंच होतं नवीन काही विशेष नाही"
, पण प्रत्येकाची मानसिकता ही वेगवेगळी असते आणि हीच मानसिकता जपणे म्हणजेच माणुसकी जपणे असे मला वाटते...
कळीचे फूल उमलताना चा सोहळा साजरा करणं सोपे पण ते फुल जपण त्याहून अधिक कठीण आहे आणि ते प्रत्येकाने जपलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे...
वास्तविक एका स्त्रीनेच दुसऱ्या स्त्रीचं मन जपलं पाहिजे तिच्या वेदना, तिच्या भावनातिला कळल्या पाहिजेत आणि तरच आपल्या समाजाचा विकास निश्चित आहे.
