STORYMIRROR

Suruchi Sable

Tragedy Others

4  

Suruchi Sable

Tragedy Others

व्रण

व्रण

1 min
495

जखम भरल्यावरही व्रण राहतात

तशी तुझी आठवण राहिलीय आयुष्यावर

सुरुवातीला वेदना देणारी जखम 

नंतर सवयीची होऊन जाते..


आधी ठसठसते, रडू आणते

आणि कालांतराने स्थान निर्माण करते 

आपल्याच शरीरावर खपलीसकट..


जणू ठरवूनच आलेली असते ती

की ही जागा,हे शरीर,हे आयुष्य

कधी सोडायचंच नाही...


तसंच जसं तू ही तुझं स्थान ठरवलं होतंस 

माझ्या आयुष्यातलं..

आणि मग अचानक एकदा खपली पडून जावी

तसा तू निघून गेलास..


ती जखम,ती आठवण पुन्हा उघड्यावर पडली

पुन्हा ठसठसू लागली..

आणि पुन्हा सवयीची झाली..


आणि पुन्हा एकदा खपली धरू लागताच 

तू आलास...या वेळी मित्राच्या रूपात

आणि पुन्हा बसला विश्वास 

तुझ्या नव्या रुपावर, नव्या नावावर, नव्या नात्यावर..


आणि पुन्हा घाव हलके होऊ लागले

आणि अचानक तू निघून गेलास

कोणतंही कारण न देता...


आणि पुन्हा ती जखम,ती आठवण उघड्यावर पडली

ठसठसू लागली ...


आणि पुन्हा सवयीची होऊन गेली

आता तुझ्यापेक्षा ही जखमच 

आपलीशी वाटायला लागली आहे

आता तुझ्या आठवणींची जागाही

छोटी वाटायला लागली आहे

म्हणूनच,आता पुन्हा येऊ नकोस

कारण त्यातली शक्तीच संपली आहे..


ठसठसण्याची,वेदना देण्याची ऊर्मीच मिटली आहे

म्हणूनच सांगते, 

तुझ्या कोणत्याही आठवणींवर 

पुन्हा नाही लागणार मन

आता शरीरावर उरलेत

ते फक्त आणि फक्त निर्जीव व्रण...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy