तेजोदीप
तेजोदीप
‼️जळावेत दीप नित्य
दूर सारीत अंधार
पणत्यांना अभय
खूप सोसला संहार. ‼️१‼️
‼️पांच दिवस दिवाळी
बारशीला सुरुवात
वसू गोवंश सन्मान
माया ममतेचा हात. ‼️२‼️
‼️धनत्रयोदशी करी
बरसात आरोग्याची
प्रार्थू धन्वंतरी देवा
करी सोबत नित्याची. ‼️३‼️
‼️यमराजा विनवणी
टाळी मृत्यूस अकाळी
यमदिप करु दान
दक्षिणेस सायंकाळी. ‼️४‼️
‼️चतुर्दशी अभ्यंगाला
सुवासिक उटणेही
कणकेचे लावू दिवे
आयुवृध्दी चिंतणेही. ‼️५‼️
‼️आश्विनाची अमावस्या
दिपावली मुख्य दिन
महालक्ष्मी पुजूनिया
होऊ मनोभावें लीन. ‼️६‼️
‼️सन्मानित गृहलक्ष्मी
महालक्ष्मी अधिष्ठान
जिथे स्वच्छता,प्रकाश
असे लक्ष्मी अनुष्ठान. ‼️७‼️
‼️दिवाळीच्या पाडव्याला
कार्तिकाचे आगमन
गीत संगीत पर्वणी
मैफिलीचे आयोजन. ‼️८‼️
‼️तेवतच रहावेत
अखंडची ज्ञानदीप
प्रकाशाव्या उजळीत
वाटा,व्हाव्या तेजोदीप.‼️९‼️
‼️प्रेम,मैत्री,मानवता
नित्य व्हावी वृध्दिंगत
सुख समृद्धी सुयश
लाभो सदा अविरत. ‼️१०‼️
