सुंदर इवले गाव माझे
सुंदर इवले गाव माझे
ढोरा पोरांनी गजबजलेले
सांजोरी जयाचे नाव
हिरव्या झाडीमध्ये वसले
सुंदर इवले माझे गाव ।
दो बाजूंनी गावाच्या या
असे भरुनी वाहती पाट
वैभव आणि मांगल्याचा
उभ्या पिकांचा थाट
डोंगर वसे बाजूला
अन भरलेला तलाव
हिरव्या झाडीमध्ये वसले
सुंदर इवले माझे गाव ।
शेतामध्ये घाम गाळती
शेतातले शिपाई
अविरत कष्ट चालत असते
जिंकण्या दुष्काळाची लढाई
भल्या भल्यांच्या दुख; वरती
माणुसकीचा करी भराव
हिरव्या झाडीमध्ये वसले
सुंदर इवले माझे गाव !
बोर ,बाभूळ,कडूनिंबाची
गावठाणी नुसती दाटी
आता मुले ही शिकलेली
शेती सोबत घेऊन पाटी
अज्ञानाचा फोडून कातळ
भविष्याचा घेतील ठाव
हिरव्या झाडीमध्ये वसले
सुंदर इवले माझे गाव
