गाव अजून तसांच आहे
गाव अजून तसांच आहे
गाव अजून तसाच आहे
पार फक्त ढासळला आहे
काठी टेकत म्हातारा
कधी शेतात जुंपलाय
कधी ढोरांमागे धडपडलाय
नको तेवढा खंगलाय
पण गाव अजून तसाच आहे
पार फक्त ढासळला आहे
गुंतामायच्या डोक्यावर
बायको सोडून गेलेल्या
पोराचं ओझ आहे
पोराला सावरता सावरता
घर कधीच ढासळलय
पाऊस मात्र कोसळतोय
पण गाव अजून तसाच आहे
पार फक्त ढासळला आहे
गढीवर गवऱ्या थापायच्या
तेवढे मात्र बंद झाले
कारण अंगण गोठा
सारे सारे मुक झाले
गावठाणातील झाडांचा
कधीचाच धूर झाला
डोळ्यांदेखत माळरान
चकणाचूर झाला
पण गाव अजून तसाच आहे
पार फक्त ढासळला आहे
