स्त्री आणि सरी...
स्त्री आणि सरी...
ताण धरणीचा दूर होई
झेलून पर्जन्याच्या सरी
दूर होण्या ताण मनीचा
वाहे नेत्रातून सरी ।
कडकडाट तो वादाचा
अन घाव लागे जिव्हारी
मलम होण्या घावावरती
वाहे नेत्रातून सरी।
दुःखाचे ढग मनी दाटले
आला अंधार दाटून उरी
अंतरंग मग शोधी प्रकाशा
वाहे नेत्रातून सरी!
तळ मनाचा धूसर होई
दुःख साचे डोहापरी
निचरा करण्या त्या दुःखाचा
वाहे नेत्रातून सरी!
घोंगवून ते वादळ गेले
करून मना मनात दरी
क्षमले सर्वां जरी मनातून
वाहे नेत्रातून सरी ।
