संध्याकाळ
संध्याकाळ
आता डोळ्यासमोर आहे ती फक्त एक रम्य संध्याकाळ..
घरट्याकडे परतणारे पाखरांचे थवे... तो ढळणारा सूर्य...
आणि अगदी धिम्या गतीने सरणारा काळ....
क्षितिजाजवळ पसरलीये एक रंगांची छटा...
सूर्याची ती अखेरची किरणं तिला तेज देणारी...
जीव जणू वरखाली होतोय त्या रंगांचा, टिकून राहण्यासाठी कायमचं...
स्वतःला पाहतोय मी त्या रंगांच्या पसाऱ्यामध्ये...
सकाळी किती खुलला होता रंग...
प्रकाशित झालं होतं मन जशा सूर्याने प्रकाशित कराव्यात दाही दिशा..
प्रेमाची पाखरं किलबिल करत उडत होती मनाच्या या फांदीवरून त्या फांदीवर..
तुझ्या आठवणींचे दवबिंदू सूर्याच्या पहिल्या किरणांच्या स्पर्शाने चमकून उठत होते..
पण अगं वाटलं नव्हतं इतक्या लवकर संध्याकाळ होईल..
आनंदाचा तो तेजोगोल इतक्या लवकर बुडून जाईल..
मनाला बोचणारा सांजवारा फक्त तुझीच गाणी गाईल..
विरहाच्या त्या काळोखाची जाणिव इतक्या लवकर मनाला होईल..
पण ही सांजवेळ आहे अजून मावळला नाहीये सूर्य..
त्या रंगांच्या छटांसारखं माझं मन ही तात्कळलंय क्षितिजावर..
भीती वाटतेय प्रेमाचा सूर्य बुडून जाण्याची.. आणि जीवनातला तो आनंदमय प्रकाश लोप पावण्याची..
काळोखाची सावली पसरत चाललीये.. मनामधला प्रेमाचा प्रकाश दूर करू लागलीये..
भीती वाटतेय गं मला आता या विरहाच्या काळोखाची..
कसलीच आशा दिसत नाही आता प्रेमाच्या किरणांची..
माहीत आहे अंधारातून चालायची सवय झाली होती मला..
मग का असं परत व्हावं ?... कसा विसरलो मी या वाटेवरून चालायला....?
पण होईल सवय... आणि नाही झाली तरी करुन घ्यावी लागेल..
अंधारात कसे जगायचे ते पुन्हा आठवावे लागेल..
शेवटी ही रीतच आहे निसर्गाची.. उगवणारा सूर्य हा कधी तरी मावळतोच..
आणि नेमकं हेच लक्षात ठेवायला विसरलो मी..
म्हणून आता पाहत बसलोय ती फक्त एक पुसट होत जाणारी संध्याकाळ..
घरट्याकडे परतणारे पाखरांचे थवे... तो ढळणारा सूर्य...
आणि अगदी धिम्या गतीने सरणारा काळ....
