शोध - रवि लबडे
शोध - रवि लबडे
दरवळणार्या मधाच्या सुगंधात
मी 'गोडवा' शोधत होतो
आपुलकीचा, प्रेमाचा अन भावनेचा....
चिघळलेल्या जखमेच्या रक्तात
मी 'त्रास' शोधत होतो
वेदनेचा, तिरस्काराचा अन विरहाचा....
अथांग समुद्राच्या सळसळणार्या लाटेत
मी 'संघर्ष' शोधत होतो
त्यागाचा, परिश्रमाचा अन वैफल्याचा....
वाटेवरच्या वाटसरुच्या चालण्यात
मी 'प्राण' शोधत होतो
मार्गक्रमणाचा, धीराचा अन पैलतीराचा....
आसुसलेल्या लहान बाळात
मी 'जीव' शोधत होतो
मायेचा, तृप्तीचा अन निरागसतेचा....
देवाच्या विशाल गाभार्यात
मी 'देव' शोधत होतो
आनंदाचा, कैवल्याचा अन माणुसकीचा....
आणि,
काहुरलेल्या मनात माझ्या
मी 'मीपण' शोधत होतो
अस्तित्वाचा, खंबीरतेचा अन निर्भयतेचा....
