*शब्दस्पर्श*
*शब्दस्पर्श*
पुन्हा घेऊन कुशीत
कधी गाशील अंगाई
तुझ्या शब्दस्पर्शाला
तोड उभ्या जगी नाही।।धृ।।
केला हाताचा पाळणा
आणि नेत्रांच्या ग ज्योती।
निद्रा लाभली लोचना
किती भयान या राती।
तुझ्या शब्दांची ग उब
देई जीवना आकार।
तुझ्या मायेची पाखर
जशी दुधात साखर।
भिजे अमृताने शब्द
असे अभयाची ग्वाही।
सुखे विसावला जीव
खंत तुफानाची नाही।
शब्द घावाला फुंकर
शब्द जगण्या आधार।
शब्द मखमली चादर
वाहे प्रेमळ निर्झर।
तुझ्या शब्दांची ग सर
चारी वेदांनाही नाही।
अशी सोडून तू जाशी
येई फिरूनी लवलाही।
गेली सोडून आधार
भवपाशाने बेजार ।
घाव बसे घावावर
मन आसुसले फार।

