STORYMIRROR

Ranjana Lasane

Others

4  

Ranjana Lasane

Others

उपेक्षा

उपेक्षा

1 min
26.7K



नका करू उपेक्षा

या गरीब जीवाची ।

लाभू द्या की संधी

मला ही शिकण्‍याची ।।धृ।।


आहेत असा कुरूप थोडा

मलीन फाटके कपडे ।

बुट टाय स्कूल बॅग

मला न मुळी घडे।

वाढलेल्या झिपऱ्यांना

सदाच वाण तेलाची ।

लाभू द्या की संधी,...।१।।


रस्तोरस्ती गल्लोगल्ली

भंगार आम्ही वेचतो।

रस्त्यावरच्या उकिरड्यात

मीठ-मिरची शोधतो।

सांगा कशी लागेल

संगत वही पेणची।

लाभू द्या की संधी....।२।।


दिस रात राबून माझी

माय पुरती थकून जाते।

रिकामी गाडगी-मडकी

तिची भूकच मरून जाते

सांगा कशी सापडेल तिला

शिदोरी संस्काराची।

लाभू द्या की संधी...।३।।


पाहून सारं बाबा माझा

पुरता कोलमडून गेला

ऐन उमेदीतच कसा तो

जीवच हरवून बसला ।

सांगा कशी सोय लागेल

आता माझ्या होम वर्कची ।

लाभू द्या की संधी ....।४।।


नाही दिला आधार तरी

तसंच थोडे शिकेन ।

उकिरडा तर सुटेल माझा

चांगलं काम करेन।

मिळूद्या मला तरी संधी

जीवन सुधारण्याची।

लाभू द्या की संधी....।५।।


Rate this content
Log in