रंग प्रितीचा
रंग प्रितीचा
रंग पहिला तो लाल
समृद्धी न् भविष्य उज्वल
शौर्य, संघर्ष, शक्ती प्रबल
नववधू परिवेष पण लाल
वर्ण आरक्त भावे लक्ष्मीला
परी रंग प्रितीचा अलबेला...
रंग दुसरा तो केशरी
दर्शवी क्रियाशक्ती,भरारी
आध्यात्माचे प्रतीक जरी
विरक्ता आवड तयाची भारी
वृद्धींगत करी मनोबला
परी रंग प्रितीचा अलबेला...
तिसरा तो पिवळा रंग
तेजोवलय, संपत्ती,सौभाग्य
पित अष्टपुत्री खुलवी अंग
श्रीहरी मना करीतसे दंग
भंडारा प्रिय मल्हाराला
परी रंग प्रितीचा अलबेला...
रंग चतुर्थ तो हिरवा
एकांत निदर्शक,शितल बरवा
निखळ प्रेमाचा फुले ताटवा
शालू तव नवप्रिये नेसावा
वर्ण शोभे हरीतक्रांतीला
परी रंग प्रितीचा अलबेला...
रंग निळा तव पाचवा
उपनाशक,स्निग्ध, थंडावा
सागर,आकाश तयात देखावा
दैवीशक्ती पाठबळ वर्तावा
अमर्याद खोली अनुभूतीला
परी रंग प्रितीचा अलबेला...
सहावा तो जांभळा रंग
सुरक्षा, राजस, उदात्त,उमंग
गूढ तत्व न् ज्ञानाचा रंग
वैश्विक ऊर्जेचा तो सूचकांग
निदर्शक सहस्रार चक्राला
परी रंग प्रितीचा अलबेला...
वसंत पंचमी सण आला
स्मरल्या राधाकृष्ण लीला
लाल, केशरी व पिवळा
हिरवा, निळा न् जांभळा
रंगीबेरंगी छटा वर्णिल्या
परी ओढ ओल्या मनाला
तो रंग प्रितीचा अलबेला...

