रजनी प्रिया
रजनी प्रिया
येसी मंदगती तुवा
रमणी रजनी प्रिया
उभा तव स्वागता
अतिहर्षे प्राजक्त हा
रेखीव कोर चंद्राची
तव विशाल भाळावरची
पाहता रोमांच फुलती
मम पानापानावरती
मेघांचे कुंतल काळे
स्पर्शता मुखे लडीवाळे
ईर्ष्ये मनी हळहळतो
व्यर्थेची का मज नकळे
उधळता तुषार तव हास्याचे
हलकेच बघ मी टिपतो
लेवून रूप सुमनांचे
सडा धरित्री पडतो

