प्रीतरंग
प्रीतरंग
हा प्रीत रंग गहिरा अचानक पाहिला अन्
कित्येक वर्षांनी पुन्हा
हसण्यास मी सुरवात केली
रंगले होते जरा ते क्षण सुगंधी जाहले
राग लटका दावूनी
रुसण्यास मी सुरवात केली
श्रावण ही नव्हता नभातून मेघ बरसू लागले
आणि स्वच्छंदे पुन्हा
भिजण्यास मी सुरवात केली
पाखरा पंखास थकल्या बळ दिले तू कोठले?
आज आकाशी पुन्हा
उडण्यास मी सुरवात केली
वृक्ष वठला आणि कटला जल जरासे शिंपले
पालवी बनूनी पुन्हा
फुटण्यास मी सुरवात केली
सांज सरली रात उरली तारकांशी बोलले
अन् दिव्याच्या संगती
जळण्यास मी सुरवात केली.

