प्रेम विरह
प्रेम विरह
कधी रे येशील तू परतुनी?
थकले हे नयन वाट पाहुनी.
आतुरली ही तुझी ललना
साजणा ये ना एकदा फिरुनी.
रात्र रात्र मम डोळा न लागे
विरह तुझा मज सहन होईना
डोळ्यातील अश्रू गेले सुकून
क्षण एक तुझ्या विना जाईना.
तुझ आठवत नाही का रे?
तिन्ही सांज नदीकाठची
पाण्यात प्रतिबिंब पाहुनी,
घेतली होती शपथ प्रेमाची.
घालवल्या मी कित्येक रात्री
आठवुनी त्या वेळेच्या स्मृती
सारखा लागला तुझा ध्यास
तुज मात्र झाली त्याची विस्मृती.
सहन होत नाही तुझा विरह
तुझ विन अडतो माझा श्र्वास
चातका परी पाहते तुझी वाट
तव मिठीत यायची लागली आस.
आशा साऱ्या कोलमडून गेल्या
नाही राहिली जगण्याची जिज्ञासा
फिरून जन्म घेईन मी साजणा
तुझी प्रियतमा होण्याची ठेऊन आशा.

