पोटाच्या भुकेसाठी
पोटाच्या भुकेसाठी
पोटाच्या भुकेसाठी राबतो आहे
भंगलेल्या सपनांना बांधतो आहे॥धृ॥
असे जरी फाटका संसार माझा
असे जरी थोडका प्रपंच माझा
लाज सारी आज सोडली आहे
पोटाच्या भुकेसाठी राबतो आहे ॥१॥
नसेल मजकडे पैसा अन अडका
नसेल जरी हात डोक्यावरी पक्का
मनगटा मध्ये धमक तशीच आहे
पोटाच्या भुकेसाठी राबतो आहे ॥२॥
घेऊनी साथीला कारभारणीला
साद घालीन त्या काळ्या मातीला
मातीतून मोती पिकवणार आहे
पोटाच्या भुकेसाठी राबतो आहे ॥३॥
घामाचा अभिषेक घालूनी आता
नाही टेकणार कोणापुढे माथा
धगधगता अंगार हाती घेणार आहे
पोटाच्या भुकेसाठी राबतो आहे ॥४॥
असे येतील किती जातील किती
आहे कोणाला संकटांची भिती
या संकटाशी चारहात करणार आहे
पोटाच्या भुकेसाठी राबतो आहे॥५॥
आशिर्वाद असता आईबापाचा
सामना करेन त्या परिस्थितीचा
परीस्थितीशी पुरता झगडणार आहे
पोटाच्या भुकेसाठी राबतो आहे ॥६॥
