STORYMIRROR

Mohan Chavan Gurjar

Inspirational

2  

Mohan Chavan Gurjar

Inspirational

पोशिंदा

पोशिंदा

1 min
14K



क्षणो क्षणी नाडला जाईल

जमिनीत गाडला जाईल

कारण

मला फक्त

बैलाची

अन

जमिनीत

पेरल्या जाणाऱ्या बियाण्याचीच

वृत्ती आदर्श वाटते.


मायेची सावली धरणारं

भरलं आभाळ

ऐनवेळी

हुलकावणी देऊन जातं

अन

इमानदारीचं घोंगडं

पांघरून आलेले बेईमान

ऋतुही

मला फसवून जातात...

शेवटी

शेतीच्या चक्राव्यूहातून

बाहेर पडावं माझ्या

अभिमन्यूनं

म्हणून महानगरात शिक्षणासाठी

पाठवलं माझ्या पुढच्या

पिढीला

तर

शेतं सोडून

इथं का आलात

झक मारायला..


तुमी शिकायला लागलेत तर

आमी कुठं जायचं?

भुवया उंचवीत

राजसत्तेचे पिढीजात मांडलिक

लागले प्रश्न विचारायला...


कधी कधी नजरेस आले

आमचे एकलव्यही

पण

गुरुदक्षिणेत अंगठा मागणाऱ्या

द्रोणांनी कुटीलतेन त्यांनाही

संपवलं..


जगाला न्याय मिळवून देणारे

आमचे न्यायशास्त्री..

तेही..हतबल...


आता तर आमचीच

पिलावळं

सत्तेला शरण

जाऊन फितूर झालीत..


म्हणून

हे घामेजलेलं यातनाचं गठुळं

घेवून

कर्जाच्या महारोगांत

शरभंगासारखं जख्मा जोपासत

सर्वेत्र सुखिनः सन्तुची साधना

अपूर्ण न सोडता

मोक्ष प्राप्तीसाठी

गळ्याशी फास न आळविता

खितपत राहू बळीच्या परंपरेचं

निष्ठेने पालन करत

कारण…


देर हैं अंधेर नही...

काळ्या आईची

अन तिच्या लेकरांची

अवहेलना करणाऱ्यांना

येणारा काळही माफ

करणार नाही

वामनाने कितीही गाडले

जमिनीत

तरी

वासुदेवाला सुपाने..


अन जगाला नित्यनेमाने

शिधा देण्यासाठी

स्वतःच नव्हे पण

चन्द्र सुर्याचंही गिऱ्हाण सुटण्यासाठी

दान देण्यासाठी

अन अमावशेच्या बापोया

देण्यासाठी

आणि सोबतच

मोकाट गाय कुत्रा अशा

मुक्याप्राण्यांसाठी

रोज मायेचा घास

भरवण्यासाठी

कोंबा कोंबातून उगवून येईल


कारण

मी ...शोषिन्दा नाही.

मी...साऱ्या विश्वाचा

पोशिंदा आहे..

पोशिंदा...


Rate this content
Log in

More marathi poem from Mohan Chavan Gurjar

Similar marathi poem from Inspirational