पाऊस
पाऊस
मी प्रत्येक पाऊस लिहितो,
कारण,
बरसणाऱ्या प्रत्येक थेंबात,
मिलनाची आस,
भेटीची ओढ,
अन्,
मातीतून उगवणारी,
इवलुसे कोंब, हीच मिठीची तृप्ती,
हे सारं असतं,
म्हणून मी प्रत्येक पाऊस लिहितो…
पण हाच पाऊस,
तुला ऑफिसमधून घरी उशिरा आणतो,
सोबत शिंतोडे, चिडचिड, रुखरुख,
चुकलेल्या लोकल्स, बस,
टॅक्सी ड्राईव्हरची भाड्याची मनमानी,
या साऱ्या निरस कहाण्या घरात पेरतो,
त्या कहाण्या निरासच,
तुला या सगळ्यांत मजा वाटते,
पण हा पाऊस तुझ्यावर किती हक्क गाजवतो,
तुला हवं तेव्हा चिंब करतो,
तू ही अलगद मिठीत घेतेस त्याला,
मला तेव्हा तो नकोसाच होतो,
तरीही मी पाऊस लिहितो…
त्याच रात्री,
दोघे खिडकीत असतो,
हातात वाफाळलेला चहा,
बाहेर तो थेंब थेंब बरसत तुलाच शोधत असतो,
आत उस्ताद रशीद खान मारव्यातून बरसत असतात,
आणि आपल्याला काय गं,
एकमेकांच्या मिठीत असायला कारणच लागतं,
म्हणून मी प्रत्येक पाऊस लिहितो.
मी पाऊस लिहितो...

