नदीस पूर आलेला पाहून
नदीस पूर आलेला पाहून
विरहोत्सुक सागर झाला। प्रियसखीस भेटायाला ॥ मज गमे ॥
निजमित्र मेघ पाठविला । गिरिराज श्वशुर-सदनाला ॥ मज गमे ॥
सरिता ही सागरजाया । त्यासवे निघाली जाया॥ मज गमे ॥
आकांत । करित अत्यंत। ठेवितां तात। तिजसी उतरोनी। भूवरती तटकटिवरुनि ॥ मज गमे ॥१॥
तो प्रसंग जणु बघवेना । म्हणुनी रवि झांकी नयनां॥ मज गमे ॥
घन गाळिती अश्रूधारा। दुःखें नच वाहे वारा॥ मज गमे ॥
शिवमंदिरि भगिनी गिरीजा। भेटे तिस सागरभाजा॥ मज गमे ॥
यापरी। सिंधुमंदिरी। जात सुंदरी। पुर्ण जलसरिता । शिवगिरिजा दर्शनमुदिता ॥ मज गमे ॥२॥
