मृत्यू सुंदर आहे....!
मृत्यू सुंदर आहे....!
जगण्यासाठी लाख बहाणे,
जरी निरंतर आहे।
जगण्याचे पण कारण एकच,
मृत्यू सुंदर आहे।।
किती जगावे कुणी कुठे?
कसे जगावे कुणी कुठे?
ज्याला त्याला रान मोकळे,
जगण्यासाठी जिथे तिथे।
जीवनानंतर जगण्याची पण...
ओढ अनावर आहे….
त्या ओढीचे कारण केवळ,
मृत्यू सुंदर आहे।।
दुःख वेदना संपून जाती,
संपून जाते तृष्णा।
वैर-भावही जळून जातो,
पुरुन टाकी प्रश्ना।
मानवतेचे दर्शन जेथे,
असे खरोखर आहे…
म्हणून कारण जगण्याचे…
मृत्यू सुंदर आहे।।
कधी कुणाच्या मनात काही,
सुख-दुःखांच्या क्षणात काही।
असेच जाते राहून सारे,
सावलीत अन् उन्हात काही।
घालमेल ही स्मृतीपटलावर
अशी निरंतर आहे।
स्मरणामधुनी जगण्यासाठी
मृत्यू सुंदर आहे।।