माझा बाप
माझा बाप
आशेवर जगतो चंदनावानी झिजतो
देह झाला काडीवानी तरीही ना थकतो
त्याच्या कष्टाला नाही मोजमाप
सालोसाल राबतो इथे माझा बाप .....
बापाने माझ्या कधी केली नाही वारी
काळ्या ढेकळातच त्याला दिसे पंढरी
कधी नाही माहीत त्याला कसली चैन
नेहमीच ओझं त्याच्या डोक्यावर रीन
सावकारी कर्ज त्याचं होत नाही माफ.....
अंगावरी त्याच्या जागोजागी ठिगळे
लेकरांना जपतो हट्ट पुरवूनी सगळे
आई करत नाही नाही कधीही हट्ट
धन्याच्या सुखातच ती राहते संतुष्ट
कष्टानेच विनला त्याने आयुष्याचा गोफ....
माझ्या बापाला आहे समाजाचे भान
माझा पदरी दिले त्याने शिक्षणाचे दान
माझ्यासाठी बाप आहे माझं विद्यापीठ
त्याच्या विचाराने मज बनविले धीट
लाविले त्याने मजठायी सद्गुणाचे रोप
सालोसाल राबतो इथे माझा बाप.......