करु हीच जागा तक्तास
करु हीच जागा तक्तास
नयन आसुसलेले होते रायगडा
तुझे भव्य रूप पाहण्यास
जे तुझे भारदस्त रूप पाहुनी
शिवरायही उद्गारिले 'करु हीच जागा तक्तास'.
फडकविण्या उंच नभी भगवा
उभारिलें लोहस्तंभ
अर्पुनी लाखो मावळ्यांनी प्राण
उभारिलें किर्तीस्तंभ
तुझ्या गोमुखी महाद्वाराचा
गनीम नाही करू शकला पराजय
कारण तुझ्या स्थापत्याचा
उत्तम नमुना म्हणजे जय-विजय
उत्तरेतून निघालेली गंगा
रायगडी येऊन अवतरली
आमच्या श्री क्षेत्र काशीला
गंगासागर नामक गंगा मिळाली
मुघल रूपी महिषासुरांचा
केला वध ती महिषासुरमर्दिनी
रायगड रक्षिण्यास समर्थ
आहे आपली आई शिरकाई
रायगडा, हिंदुस्थानातील तेरावे
ज्योतिर्लिंग म्हणजे आपले जगदीश्वर
आणि साक्षात तोच कैलासाचा शिव
पातशाही उलथून झाला सिंहासनाधिश्वर
इथेच निजला आमुचा ज्वलंत भास्कर
देऊनी आम्हा शिवविचारांची शक्ती
ज्याने आपल्या स्वराज्यात
स्थापिली ज्ञान- कर्म- भक्ती
म्हणुनी रायगडा, आमच्या साठी हीच पंढरी
हेच तीर्थक्षेत्र नी हेच चार धाम
जिथे साक्षात वास करितो कैलासाचा शिव,
जगदिपता ब्रम्हा आणि लोकोत्तर राम
