कृष्ण बंध
कृष्ण बंध
तुझिया श्याम वर्णाचे
मी किती करू कौतुकें
दर्पणी स्वतःला बघता
प्रतिबिंब सावळे हांसे ..
तुझिया वेणुनादाने
भूल जीवाला पडते
मोहरतो देह सुखाने
खूण अंतरी पटते
तुझिया नाम रसाची
ही कशी चटक लागते
माझिया नामा जागी
मी कृष्ण सखी म्हणते
तुझिया प्रेम धाग्याने
तू पहा जोडली मने
भेदाभेद विसरता
हर्षे नाचती उन्मने !
तुझिया भक्ति बंधाने
भवसागर तो तरला
जीवा- शिवाच्या भेटी
मोक्षही मज लाभला...
मोक्षही मज लाभला...!
