अर्घ्य
अर्घ्य
कधीतरी निवांतच बसावं बघत आकाशात
ऐकू यावी फक्त पानांची सळसळ
दुपारच्या सावल्या हळूहळू उतरत जाव्यात खोल मनात
आणि ऊन उतरत जावं पायरी-पायरीनं
कसलंच व्यवधान राहू नये मग मनाला
'मी' पण सरत जावं
आणि उलगडत जावं नातं - अवघ्या अस्तित्वाचं
-गर्द वनराईशी!
एखाद्या कळीनं उमलावं अलगद
वारा वहावा मोरपिशी!
तळ्यावर उठता तरंग
भ्रमरानं करावं गुंजन - गुलाबी कमळाशी!
चांदण्या उमलाव्यात गर्द निळ्या नभी
आणि शुभ्र-केशरी देठे पारिजातकाची
सावळ्याश्या देह-ओंजळींच मग
अर्घ्य द्यावं जगजेठीं !
अर्घ्य द्यावं जगजेठीं !
