STORYMIRROR

Jayashree Ambaskar

Inspirational

3  

Jayashree Ambaskar

Inspirational

कोरे पान

कोरे पान

1 min
171

ते कोरे पान वहीचे, आतूर कधीचे आहे

हातात लेखणी घे तू, जणु आर्जव करते आहे

गोंदवून शरिरावरती, लेवुन नव अक्षर लेणे

मिरवेन साज शब्दांचा, जणु स्वप्न सजवते आहे 


पण शब्द हरवले माझे, उतरेल कशी मग कविता

कासाविस तगमग माझी, तो कोरा कागद बघता 

कल्लोळ भावनांचा पण, झाकोळ आत शब्दांचा

मी हताश होउन बघते, श्वासांची तडफड आता 


हे असे वांझपण हट्टी, हटकुन येतेच अताशा

मन व्याकुळ व्याकुळ होते, पसरवते गर्द निराशा

येतिल का हव्याहव्याशा, सृजनाच्या प्रसवी वेणा

वैराण मनाच्या खपल्या, पण होतिल काय पुरेशा 


दुर्वास कुठे मी शोधू की करू पुत्रकामेष्टी

आहुतीस समिधा कुठल्या, अर्पून करू संतुष्टी 

हे यज्ञकुंड पेटावे, धडधडुन उठावी ज्वाळा

लेखणीत होउन सळसळ, शब्दांची व्हावी वृष्टी 


मी विचार करुनी दमले, अन कागद तसाच कोरा 

उचलुनी लेखणी घेता, ओघळला शब्द टपोरा

मग शब्दामागुन ओळी, आल्या अन धुंद बरसल्या

त्या चिंब कागदावरती, दरवळला शब्द फुलोरा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational